चालू घडामोडी : २२ एप्रिल
संयुक्त राष्ट्रांच्या उपसमितीवर भारताची निवड
- संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक सामाजिक परिषदेचा कार्यक्रम व समन्वय उपसमितीवर भारताची निवड करण्यात आली. भारतासोबत इतर १२ देशांनाही या समितीवर निवडण्यात आले.
- भारताला ५० पैकी ४९ मते मिळाली असून, आशियाई समूहात भरलाच सर्वाधिक मते मिळाली.
- या उपसमितींचे सदस्यत्व तीन वर्षांसाठी राहणार असून, जानेवारी २०१८ पासून कालावधी सुरू होणार आहे.
- या उपसमितीवर भारत व्यतिरिक्त बर्किना फासो, इराण, जपान, पाकिस्तान, बेलरूस, बुल्गारिया, मालदिव, ब्राझिल, चिली, क्यूबा, ब्रिटेन व अमेरिका निवडून आले आहे.
- याशिवाय भारतासह अन्य १९ देश इंटरनॅशनल नाटकोटिक्स कंट्रोल बोर्डसाठी निवडून आले. या मंडळाचा कार्यकाळ चार वर्षांचा असून, तो जानेवारी २०१८ पासून सुरू होणार आहे.
- संयुक्त राष्ट्रामधील भारताचे स्थायी प्रतिनिधी: सैयद अकबऊद्दीन
डॉ. नरसिंह मूर्ती यांना पुदुरू गुरुराज भट स्मृती पुरस्कार
- नामवंत इतिहासकार, नाणीशास्त्रातील जाणकार आणि पुरातत्त्वशास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा. ए व्ही नरसिंह मूर्ती यांना प्रतिष्ठेचा पुदुरू गुरुराज भट स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- शालेय जीवनापासून मूर्ती यांना इतिहास या विषयाची आवड होती. पुढे त्यांनी याच विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
- पदव्युत्तर परीक्षेत सुवर्णपदक मिळाल्याने ७०च्या दशकात ते म्हैसुरू विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. पुढे डॉ. मूर्ती विद्यापीठात इतिहास विभाग प्रमुख बनले.
- पुढे १९७८मध्ये प्राचीन इतिहासावरील पहिले पुस्तक लिहिताना मूर्ती यांनी त्यात भारतीय संस्कृती, परंपरा आणि वारसा यांच्याविषयी मूलगामी चिंतन केले.
- इतिहासाबरोबरच नाणीशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्राचाही त्यांनी अफाट व्यासंग केला. ‘द कॉइन्स ऑफ कर्नाटका’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या व्यासंगाची साक्ष देते.
- तिरुपतीच्या मंदिरात जमा होणाऱ्या प्राचीन नाण्यांचे वर्गीकरण करण्याचे महत्त्वाचे कामही मूर्ती यांनी केले आहे.
- ‘इण्डियन एपिग्राफी’, ‘हेमकुटा’, ‘द सेव्हरन्स ऑफ देवगिरी’ यांसारखी इतिहासावरील अनेक क्रमिक पुस्तके त्यांनी लिहिली, जी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहेत.
- विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर भारतीय विद्या भवनच्या म्हैसुरू शाखेत त्यांना निमंत्रित करण्यात आले. आज ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
- इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात मोलाची भर घातल्याबद्दल त्यांना पुदुरू गुरुराज भट स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
न्यूझीलंडमध्येही नोकरीविषयक व्हिसाचे नियम कठोर
- अमेरिका आणि आॅस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडनेही विदेशी नागरिकांसाठी नोकरीविषयक व्हिसाचे नियम कठोर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
- न्यूझीलंडमधील विदेशी कर्मचाऱ्यांची संख्या सध्या सार्वकालिक उच्च पातळीवर गेली आहे. ही संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भारतीय नोकरदारांना फटका बसणार आहे.
- काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने कुशल कामगारांचा व्हिसा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाचे नियम कठोर करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली.
- त्यानंतर आता न्यूझीलंड सरकारने विदेशी नागरिकांच्या नोकऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी व्हिसा नियम कठोर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
- नव्या नियमानुसार कुशल कामगार या संज्ञेला पात्र होण्यासाठी विदेशी कामगारांना न्यूझीलंडमध्ये किमान सरासरी वेतन देणारी नोकरी मिळवावी लागेल.
- उच्च कुशल कामगार या संज्ञेला प्राप्त होण्यासाठी विदेशी कामगारांना किमान सरासरी वेतनाच्या १५० टक्के वेतन देणारी नोकरी मिळवावी लागेल.
- फेब्रुवारीतील आकडेवारीनुसार, न्यूझीलंडमधील विदेशी कामगारांची संख्या ७१,३०० आहे. न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण १.५ टक्के आहे.
- न्यूझीलंडमध्ये चीन, भारत आणि ब्रिटन येथील कामगारांची संख्या अधिक आहे. त्यातही विदेशी कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये भारतीयांचे प्रमाण ७५ टक्क्यांच्या आसपास आहे.
तुषार आरोठे यांना भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद
- बडोद्याचे माजी फलंदाज तुषार आरोठे यांच्याकडे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्याच्या प्रशिक्षक पूर्णिमा राव यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे.
- आरोठे २००८ ते २०१२ या कालावधीत महिला संघाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक होते.
- महिलांची विश्वचषक स्पर्धा जून व जुलैमध्ये होणार असून या स्पर्धेसाठी आरोटे यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा