देवगड हापूसला स्वत:ची ओळख प्राप्त करून देणारे जीआय मानांकन (भौगोलिक उपदर्शन) मिळाले असून देवगड हापूसच्या नावावर आता अन्य कोणत्याही आंब्याची विक्री केली जाणार नाही.
गेल्या पाच वर्षांच्या प्रयत्नांनंतर देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने केलेल्या जी. आय. मानांकनाच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे.
जी. आय. मानांकनासाठी मुंबई येथे सुनावणीमध्ये देवगड हापूसला मान्यता देण्यात आली असून ‘देवगड हापूस’ हा स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण झाला आहे.
देवगड हापूस हा जगप्रसिद्ध आंबा असून, या आंब्याची चव व दर्जा देशात कुठल्याही आंब्याला नाही. त्यामुळे देवगड हापूसला चांगला भाव आहे.
त्यामुळेच कर्नाटक, मद्रास व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधील आंबा देवगड हापूसच्या नावाखाली विक्री केला जात होता. यामुळे देवगड हापूसची एकप्रकारे बदनामी होत होती.
देवगड हापूसला जीआय मानांकन मिळाल्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली केली जाणारी आंबा ही विक्री रोखली जाणार आहे. देशाबाहेरही आता देवगड हापूस या नावानेच हा आंबा विकला जाणार आहे.
देवगड हापूस आंब्याच्या नावावर अन्य कुणी विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा ठरू शकतो.
हापूस आंब्याच्या जी. आय. मानांकनासाठी कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट या राष्ट्रीय संस्थेकडे रत्नागिरी हापूस, दापोली कृषी विद्यापीठामार्फत हापूस व देवगड तालुका आंबा उत्पादक संघाच्यावतीने देवगड हापूस असे तीन अर्ज दाखल करण्यात आले होते.
हॉटेलमध्ये सेवा शुल्क (टिप) देणे ऐच्छिक
केंद्र सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयने गेल्या काही दिवसांपूर्वीच सेवा शुल्काबाबत तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी मिळाली आहे.
त्यामुळे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थांवर लावण्यात येणारे सेवा शुल्क (टिप) देणे सक्तीचे असणार नाही.
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये किती सेवा शुल्क द्यायचे, हे ग्राहकच ठरवणार असून, सेवा शुल्क ठरवण्याचा अधिकार हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना असणार नाही.
हाफिज सईदला पाकिस्तानने दहशतवादी म्हणून घोषित केले
मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानने अखेर दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
हाफिझ सईदला ३० जानेवारीपासून लाहोर येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हे अवैध असल्याची याचिका जमात-उद-दावा या संघटनेने न्यायालयात केली होती.
परंतु पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने लाहोर हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हाफिज सईदचा दहशतवाद आणि दहशवादी कारवायांशी संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे.
अमेरिकेने हाफिजचा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. शिवाय त्याच्या अटकेसाठी मदत करणाऱ्या व्यक्तीला एक कोटी डॉलरचे बक्षीस देण्याचेही जाहीर केलेले आहे.
सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी घालण्यात आल्यानंतर या यादीत आगामी काळात पाकिस्तानाचाही समावेश होणार असल्याचे संकेत अमेरिकेकडून देण्यात आले होते.
त्यामुळे अमेरिकेच्या दबावाखाली पाकिस्तानने हाफिजला दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा