जलयुक्त शिवार अभियानासाठी सोलापूरला प्रथम पुरस्कार
महाराष्ट्रात राज्यशासनाने ५ डिसेंबर २०१४पासून सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जिल्हा-तालुका-गावांच्या पुरस्काराची घोषणा शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने केली.
या अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार जाहीर झाले.
सोलापूर जिल्ह्याला राज्यातील पहिला पुरस्कार जाहीर झाला. ५० लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
गांव पातळीवर बार्शी तालुक्यातील मळेगावने या अभियानात केलेले काम राज्यात उत्कृष्ट ठरले. यासाठी २५ लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
तर तालुकास्तरावर पुण्यातील पुरंदर तालुक्याला प्रथम क्रमांकाचा ३५ लाखांचा पुरस्कार जाहीर झाला.
जलयुक्त शिवारसाठी जिल्हा, तालुका, गाव, व्यक्ती/वैयक्तिक संस्था, अधिकारी/कर्मचारी, पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी राज्यस्तरावर हे पुरस्कार देण्यात आले.
राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, तर जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावे हे पुरस्कार जाहीर झाले.
जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्कारांची निवड केली. हे पुरस्कार २०१५-१६ या वर्षासाठी आहेत.
पुरस्कार विजेते:-
गावे
प्रथम: मळेगांव (ता.बार्शी, जि. सोलापूर) २५ लाख रु
द्वितीय: वेळू (ता. कोरेगांव, जि. सातारा) १५ लाख रु
तृतीय: कर्जत (ता. कर्जत, जि. अहमदनगर) ७.५ लाख.
तालुके
प्रथम: पुरंदर, जि. पुणे, ३५ लाख रु
द्वितीय: कोरेगांव, जि. सातारा, २० लाख रु
तृतीय: चांदवड, जि. नाशिक, १० लाख रु
जिल्हे
प्रथम: सोलापूर, ५० लाख रु
द्वितीय: पुणे, ३० लाख रु
तृतीय : अहमदनगर, १५ लाख रु
बीबीसीवर भारताकडून पाच वर्षांची बंदी
काझीरंगा अभयारण्याची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर (बीबीसी) भारताकडून पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
या बंदीमुळे आता बीबीसीला पुढील पाच वर्षे भारतामधील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करता येणार नाही.
काही दिवसांपूर्वी बीबीसीकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या एका माहितीपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिष्ठेची न भरुन येणारी हानी झाल्याचे सरकारने म्हटले आहे.
या माहितीपटात काझीरंगा अभयारण्यातील शिकार रोखण्यासासंदर्भातील धोरणाविषयी भाष्य करण्यात आले होते.
त्यामुळे १० एप्रिल २०१७पासून बीबीसीला भारतात माहितीपट किंवा वार्तांकनासाठी चित्रीकरण करू न देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) काझीरंगा अभयारण्यातील परिस्थितीचे चुकीचे पद्धतीने वार्तांकन केल्याप्रकरणी बीबीसीचे दक्षिण आशियातील प्रतिनिधी जस्टीन रॉवलाट यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
तसेच बीबीसीवर बंदी टाकण्याची शिफारसही केली होती. केंद्रीय वनमंत्रालयाने एनटीसीएचा हा निर्णय उचलून धरला आणि त्यामुळे बीबीसीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
साई प्रणीतला सिंगापूर ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद
भारताच्या साई प्रणीतने भारताच्याच किदाम्बी श्रीकांतला पराभूत करत सिंगापूर ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावले आहे.
सिंगापूर ओपन सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत यंदा दोन्ही खेळाडू भारतीय होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही भारतीय खेळाडूंनी खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.
अंतिम सामन्यात प्रणीतने श्रीकांतचा १७-२१, २१-१७, २१-१२ असा तीन गेममध्ये पराभव केला. साई प्रणीतचे हे पहिले सुपर सीरिज विजेतेपद आहे.
प्रणीतने याआधी श्रीकांतला ४ वेळा पराभूत केले होते, तर केवळ एकदा पराभव पत्करला होता.
प्रणीत सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी श्रीकांतने सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेत उपांत्य फेरीत श्रीकांतने इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंगला, तर साई प्रणीतने कोरियाच्या ली डाँग केयूनवर मात केली.
अहमदनगरच्या एसीसीएस संस्थेला राष्ट्रपती मानक बहाल
अहमदनगर येथील आर्मर्ड कार्प सेंटर अॅण्ड स्कूल या लष्करी प्रशिक्षण संस्थेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती मानक देऊन गौरविण्यात आले.
सन १९४८पासून देशसेवेत समर्पित आर्मर्ड कोअर सेंटरने त्याग, समर्पण, व्यावसायिक कौशल्य आणि नि:स्वार्थ सेवेचा आदर्श घातला आहे.
एक शांतताप्रिय देश म्हणून राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय ऐक्य कायम ठेवण्यासाठी आपल्या क्षमतेचा त्यांनी उत्तम रीतीने उपयोग केला आहे.
राष्ट्रपतींचे मानक मिळणे हे कोणत्याही सैनिक तुकडीचा सर्वोच्च सन्मान व दुर्मीळ क्षण असतो. सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम हे निशाण करते.
६९ वर्षांच्या कामगिरीच्या आधारे या संस्थेला हा सर्वोच्च बहुमान पहिल्यांदाच मिळाला आहे.
या संस्थेला यापूर्वी २ व्हिक्टोरिया क्रॉस, २ परमवीर चक्र, १६ महावीर चक्र तसेच ५२ वीर चक्रांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अर्जुन, टी ९०, टी ७२, भीष्म, अजेय आदी अनेक भेदक रणगाडे एसीसीएसच्या ताफ्यात आहेत. भारतीय लष्कराबरोबरच मित्रराष्ट्रांच्या अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा