चालू घडामोडी : २३ एप्रिल
देशाच्या नियोजनबद्ध व वेगवान विकासासाठी १५ वर्षांचा रोडमॅप
- नीती आयोगाच्या २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत देशाचा नियोजनबद्धरित्या आणि वेगाने विकास घडवून आणण्यासाठी १५ वर्षांचा रोडमॅप सादर करण्यात आला.
- यात पुढील सात वर्षांसाठीचे रणनीती ठरवणारा दस्तऐवज आणि तीन वर्षांचा कृती कार्यक्रम समाविष्ट आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अधिकारी, नीती आयोगाचे सदस्य आणि विशेष निमंत्रित पाहुणे उपस्थिती होते.
- मात्र या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अनुपस्थित राहिले. केजरीवाल यांच्याऐवजी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया बैठकीत सहभागी झाले.
- नव्या भारताचे स्वप्न तेव्हाच साकार होईल जेव्हा राज्य सरकारे आणि त्यांचे मुख्यमंत्री मिळून प्रयत्न करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
कॅबिनेट सचिव प्रदीपकुमार सिन्हा यांना मुदतवाढ
- केंद्र सरकारने ६१ वर्षीय कॅबिनेट सचिव प्रदीपकुमार सिन्हा यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. पुढच्या जून महिन्यापर्यंत ते या पदावर राहणार आहेत.
- कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने सिन्हा यांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या समितीचे अध्यक्ष आहेत.
- सिन्हा यांनी १३ जून २०१५ रोजी अजीत सेठ यांच्याकडून या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. कॅबिनेट सचिवांचा कार्यकाळ साधारण दोन वर्षांचा असतो.
- सिन्हा यांना मुदतवाढ मिळाल्याने ते आता एकूण तीन वर्षे या पदावर सेवा देणारे अधिकारी ठरणार आहेत.
- उत्तर प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी सिन्हा याआधी ऊर्जा सचिव होते. १९७७च्या बॅचच्या सचिवांमध्ये ते सर्वात जेष्ठ अधिकारी आहेत.
- सिन्हा यांनी अलाहाबादमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. २०१३ ते २०१५ या काळात ते ऊर्जा सचिव होते.
कावेह मदानी यांना ह्य़ुबेर नागरी अभियांत्रिकी संशोधन पुरस्कार
- इराणचे नागरी अभियंता डॉ. कावेह मदानी यांना अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनीयर्सचा (एएससीई ) ह्य़ुबेर नागरी अभियांत्रिकी संशोधन पुरस्कार जाहीर झाला आहे.
- मध्यमवयीन संशोधकांसाठी नागरी अभियांत्रिकीत ह्य़ुबेर पुरस्कार हा सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो.
- डॉ. मदानी यांनी पाण्याचे कमी स्रोत असताना त्याचे वाटप वेगळ्या पद्धतीने तर केले आहेच, शिवाय गेम थिअरीवर आधारित संकल्पना पाण्याच्या जटिल समस्येवर वापरल्या आहेत.
- जलस्रोतांचे नियोजन व गेम थिअरी यांचा संबंध त्यांनी जोडला आहे. त्या क्षेत्रात मोठे काम केले आहे.
- त्याचा वापर ऊर्जा क्षेत्रातही होत असून अप्रत्यक्ष फायदा हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी होत आहे.
- गेल्या वर्षी मदानी यांना अर्नी रिश्टर पुरस्कार हा युरोपीय जिओसायन्सेस युनियनकडून देण्यात आला होता. अशाप्रकारे जगातील दोन प्रतिष्ठित संस्थांनी आतापर्यंत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
- पर्यावरण-ऊर्जास्रोतांचे वाटप व व्यवस्थापन, अभियांत्रिकी प्रणालींचा वापर, सिस्टीम डायनॅमिक्स, पाण्याच्या वाटपाचे प्रारूपीकरण तसेच सादृश्यीकरण हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत.
- कावेह मदानी यांचा जन्म १९८१मध्ये तेहरान येथे झाला. त्यांनी ताब्रिझ विद्यापीठातून नागरी अभियांत्रिकीत बीएस्सी पदवी घेतली.
- नंतर ते स्वीडनला गेले व तेथे जलस्रोत विषयात पीएचडी केली, नंतर डेव्हिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकीची डॉक्टरेट पदवी घेतली.
- सध्या ते लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये सिस्टीम अॅनॅलिसिस व पॉलिसी या विभागात रीडर आहेत. त्यापूर्वी ते पर्यावरण व्यवस्थापनाचे व्याख्याते होते.
- फेब्रुवारी २०१७मध्ये हवामान बदल विषयावर इराणमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती, त्याचे ते सचिव होते.
- अमेरिकेत एएससीई ही नागरी अभियांत्रिकीतील प्रख्यात संस्था १८५२मध्ये स्थापन झाली. त्याचे १७७ देश सदस्य आहेत. त्या संस्थेचा प्रतिष्ठित पुरस्कार आता त्यांना मिळाला आहे.
मलेरियावरील पहिली लस चाचणीसाठी तयार
- मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेली जगातील पहिली लस घाना, केनिया आणि मलावी या आफ्रिका खंडातील तीन देशांमध्ये दिली जाणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) जाहीर केले आहे.
- या तीन देशांमध्ये मलेरियाचा धोका अधिक असून, पुढील वर्षीपासून या लसीची प्रायोगिक स्तरावर चाचणी सुरू होणार आहे.
- ग्लॅक्सो स्मिथ क्लीन या कंपनीने आरटीएस (अथवा मॉस्क्युरिक्स) ही लस तयार केली आहे.
- ही लस हा मलेरियावरील अंतिम उपाय नसला तरीही योग्य काळजी घेत त्याचा वापर केल्यास हजारो जणांचे आयुष्य वाचविण्याची लसीची क्षमता आहे.
- पुढील वर्षीपासून दिली जाणारी मलेरियावरील ही लस पाच ते सतरा महिन्यांपर्यंतच्या मुलांना दिली जाणार आहे.
- प्रयोगशाळांमधील चाचणीवेळी लसीचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष दिसून येतात का, हे या वेळी तपासले जाणार आहे.
- ही लस तयार करण्यासाठी गेली अनेक वर्षे संशोधक प्रयत्न करत होते आणि यासाठी कोट्यवधी डॉलर खर्च आला आहे.
- केनिया, घाना आणि मलावी या देशांमध्ये चांगले प्रतिबंधात्मक उपाय योजिले जात असूनही रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कायम असल्याने या तीन देशांची चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे.
- अद्यापही डॉक्टरांपुढे मलेरियाचे मोठे आव्हान असून, जगभरात या रोगामुळे दरवर्षी वीस कोटी जण आजारी पडतात. यापैकी पाच लाख जणांचा मृत्यू होतो.
- मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात झालेल्या विविध प्रयत्नांमुळे गेल्या १५ वर्षांमध्ये या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत ६२ टक्क्यांनी घट झाली आहे.
- २०४०पर्यंत जगभरातून मलेरियाची समस्या दूर करण्याचे डब्लूएचओचे लक्ष्य आहे.
युनिस खानच्या कसोटीत १० हजार धावा
- वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यामध्ये पाकिस्तानचा फलंदाज युनिस खान याने १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
- याबरोबरच तो पाकिस्तानचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानकडून यापूर्वी जावेद मियांदाद यांच्या नावे हा विक्रम होता.
- मियांदाद यांनी ८८३२ धावा केल्या होत्या. युनिसने अबूधाबी येथे इंग्लड विरुद्धच्या कसोटी सामन्यात हा विक्रम मोडला होता.
- ५३च्या सरासरीने त्याने २०८व्या डावात हा टप्पा पार केला. आतापर्यंत १३ फलंदाजांनी दहा हजार धावा फटकावण्याची किमया साधली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा