चालू घडामोडी : ७ एप्रिल
प्रा. डेव्हिड सिम्लिह केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी
- ईशान्य भारतातील प्रा. डेव्हिड आर. सिम्लिह हे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनले म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- २२ जानेवारी १९५३ रोजी जन्मलेल्या डेव्हिड यांचे शालेय शिक्षण कलिम्पाँग येथील डॉ. ग्रॅहॅम होम्स शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण शिलाँग येथील प्रसिद्ध सेंट एडमंड्स कॉलेजमध्ये झाले.
- शालेय जीवनापासूनच इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय असल्याने नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीतून (एनईएचयू) त्यांनी इतिहास विषयात एमए तसेच नंतर एमफिल व पीएचडी पदवी मिळवली.
- १९७९मध्ये एनईएचयूमधील इतिहास विभागात अधिव्याख्याता म्हणून ते रुजू झाले. विद्यापीठात अध्यापनाबरोबरच विविध उपक्रमांत ते कायम सक्रिय असत.
- पुढे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार सुधारण्यासाठी प्रा. डेव्हिड यांना मग परीक्षा विभागाचे नियंत्रक म्हणून नियुक्त करण्यात आले.
- काही वर्षांत मग विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या इच्छेमुळे ते आधी कुलसचिव आणि नंतर प्र-कुलगुरू बनले.
- ईशान्य भारताच्या इतिहासाचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. या विषयावर त्यांची अनेक पुस्तके तसेच लेख लिहिले.
- मेघालयातील खासी जमातीचा प्रमुख असलेले तिरोथ सिंग यांनी ब्रिटिशांच्या साम्राज्यविस्ताराला कडाडून विरोध केला. या तिरोथ सिंग यांच्या मृत्यूची तारीख तसेच त्यांच्या अखेरच्या दिवसांतील घडामोडींवर त्यांनी संशोधन केले.
- ईशान्य भारताच्या इतिहासात हे संशोधन खूप महत्त्वाचे मानले जाते. प्रा. डेव्हिड यांचा इतिहास विषयातील कामगिरीचा वेळोवेळी गौरव झाला.
- ब्रिटनमधील संशोधनासाठी त्यांना चार्ल्स वॉलेस गौरववृत्ती तर अमेरिकेत संशोधन करण्यासाठी फुलब्राइट फेलोशिप मिळाली होती.
- भारतीय इतिहास काँग्रेसच्या ‘आधुनिक भारताचा इतिहास’ या विभागाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
- हिस्टरी काँग्रेसच्या २०१२मध्ये मुंबईत भरलेल्या अधिवेशनात त्यांचे बीजभाषण झाले होते.
- लोकसेवा आयोगात येण्यापूर्वी त्यांनी पाच वर्षे राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरुपद यशस्वीपणे सांभाळले आहे.
मानसिक आरोग्य जोपासण्यासाठी वेलनेस क्लिनिक
- आरोग्य विभागाने यावर्षी जागतिक आरोग्य दिनानिमित्त (७ एप्रिल) महाराष्ट्रातील २३ जिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातून तरुण तसेच वृद्धांचे मानसिक आरोग्य जोपासण्याचा व्यापक उपक्रम हाती घेतला आहे.
- यासाठी ‘चला बोलू या, नैराश्य टाळू या’ अशा संकल्पनेवर आधारित योजना राबविण्यात येणार आहे.
- या योजनेअंतर्गत मोठय़ा प्रमाणात समुपदेशन तसेच उत्तम आरोग्य कसे राखावे यासाठी ‘वेलनेस क्लिनिक’ सुरू करण्यात येणार आहे.
- जगातही मनोरुग्णांची संख्या वेगाने वाढत असून जागतिक आरोग्य संघटनेनेही यंदाचे वर्ष हे ‘डिप्रेशन लेट्स टॉक’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.
- देशात व राज्यात लोकसंख्येच्या दहा टक्के लोकांना मानसिक आजाराने ग्रासले असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे.
- प्रामुख्याने तरुणांमध्ये व वृद्धांची वाढती संख्या लक्षात घेता पुरेसे मनोविकारतज्ज्ञ व समुपदेशक नसल्यामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.
- ‘मेंटल हेल्थ अॅक्ट’नुसार मनोरुग्णालयात शंभर खाटांमागे एक मनोविकारतज्ज्ञ असणे बंधनकारक आहे.
- महाराष्ट्रात आरोग्य विभागाअंतर्गत ठाणे, पुणे, नागपूर व रत्नागिरी अशा चार ठिकाणी मनोरुग्णालये असून तेथे ५६९५ खाटा आहेत.
- या चारही मनोरुग्णालयांत ५६ मनोविकारतज्ज्ञांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ ३० मंजूर पदे असून त्यापैकी केवळ २२ पदे भरण्यात आली आहेत.
- यातून ‘मेंटल हेल्थ अॅक्ट’चेच उल्लंघन होत असून याहून भयावह परिस्थिती २३ जिल्हा रुग्णालयांमध्ये आहे.
सीरियन शायरत हवाई तळावर अमेरिकेचा हल्ला
- सीरियन नागरीकांवर रासायनिक हल्ला करण्यासाठी ज्या शायरत हवाई तळाचा वापर झाला त्याच तळाला ६ एप्रिल रोजी रात्री अमेरिकेने लक्ष्य केले.
- पूर्व भूमध्यसागरात तैनात असलेल्या अमेरिकन नौदलाच्या जहाजांवरुन शायरत तळावर ६० टॉमाहॉक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यात धावपट्टी, कंट्रोल टॉवर आणि दारुगोळायाचे भांडार उद्धवस्त झाले.
- हा हल्ला करुन अमेरिकेने पहिल्यांदाच थेट सीरियन सरकार विरोधात कारवाई केली आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेचा ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
- भविष्यात निष्पाप नागरीकांवर पुन्हा विषारी गॅसने हल्ला होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असे ट्रम्प यांनी सांगितले.
- सीरियाने या हल्ल्याचा निषेध केला असून अमेरिकेच्या हल्ल्यामुळे जागतिक पातळीवर पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
- सीरियातील असाद प्रशासनाला रशियाचा पाठिंबा आहे. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चांगले संबंध आहे.
- पण अमेरिकेने केलेला हवाई हल्ला हा बेकायदेशीर असून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोपच रशियाने केला आहे.
- ४ एप्रिल रोजी सीरियाने आपल्याच नागरीकांवर लढाऊ विमानांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. यात बहुतांश बालके होती.
- सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बाशर अल असाद यांनीच आपल्या नागरिकांवर रासायनिक हल्ला केल्याचा आरोप अमेरिका तसेच ब्रिटननेहीकेला आहे.
- रासायनिक हल्ल्यानंतरचे भीषण चित्र समोर येताच जगभरात संतापाची लाट उसळली होती. संयुक्त राष्ट्रानेही या रासायनिक हल्ल्याचा निषेध केला होता.
पत्रकारांना संरक्षण देणारे विधेयक मंजूर
- पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण देणारे विधेयक अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.
- पत्रकार हल्लाविरोधी विधेयकानुसार तसेच पत्रकारांवरील हल्ला दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहे.
- पत्रकार वा माध्यमांवर हल्ला करणाऱ्यास ३ वर्षांचा कारावास किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होणार आहे.
- या कायद्याचा गैरवापर केला गेल्यास संबंधित पत्रकार व संस्थेलाही तेवढीच शिक्षा भोगावी लागणार आहे.
- याबरोबरच संबंधिताची अधीस्वीकृती पत्रिका कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल व कोणतेही शासकीय लाभही मिळण्यास तो पात्र नसेल.
रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी उठविली
- शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घालण्यात आलेली विमान प्रवासबंदी एअर इंडियाने ७ एप्रिल रोजी उठविली आहे.
- दोन आठवड्यापूर्वी विमान प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चप्पलेने मारहाण केल्याप्रकरणी एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी घातली होती.
- या घटनेचे पडसाद संसदेत सुद्धा उमटले होते. रविंद्र गायकवाड यांनी नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपति राजू यांना पत्राद्वारे एअर इंडियाच्या विमानात झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.
- तसेच, एअर इंडियाकडून त्यांच्यावर घालण्यात आलेली विमान प्रवासबंदीही हटवण्याची विनंती केली होती.
- मात्र, त्यानंतर जोपर्यंत रविंद्र गायकवाड विनाशर्त एअर इंडियाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावरील निर्बंध कायम ठेवावेत, अशी मागणी ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशनने केली होती.
- अखेर, एअर इंडियाने त्यांच्यावरील प्रवासबंदी मागे घेत त्यांचा विमान प्रवासाचा मार्ग मोकळा केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा