अमेरिकेने १३ एप्रिल रोजी अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतातील अचीन जिल्ह्यातील इसिसच्या आश्रयस्थानावर जीबीयू-४३बी या अतिशय मोठ्या अण्वस्त्रविरहित (नॉन न्यूक्लिअर) बॉम्बने हल्ला केला.
नांगरहार भागातील इस्लामिक स्टेट अर्थात इसिसचे बोगदे आणि बंकरला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात सुमारे ९४ दहशतवादी ठार झाले.
इसिसमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांचे प्रशिक्षण या भागात दिले जात असल्याचा संशय आहे. पाकिस्तान सीमेलगतच असलेल्या या भागात इसिसचे एक ते पाच हजार दहशतवादी असण्याचा अहवाल आहे.
अमेरिकेच्या विशेष हवाई पथकाने एमसी-१३० या विमानातून जीपीएसच्या साह्याने हा बॉम्ब टाकला.
या हल्ल्यात नागरिकांचे मृत्यू टाळण्यासाठी अमेरिकेने हल्ल्यापूर्वी आवश्यक ती सर्व सावधानता बाळगली होती, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले.
जीएसटीला राष्ट्रपतींची मंजुरी
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकाशी संबंधित एकूण चार विधेयकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी देत त्यावर स्वाक्षरी केली आहे.
या विधेयकांना ६ एप्रिल रोजी राज्यसभेत २९ मार्च रोजी लोकसभेत मंजुरी देण्यात आली होती. १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे.
अवाजवी कर गुंता टाळून सुटसुटीतपणा आणणारा जीएसटी हा एक-सामाईक अप्रत्यक्ष कर संपूर्ण देशस्तरावर सारख्याच दराने लागू होईल.
जीएसटीमुळे सर्व देशात वस्तूंचे एकसमान दर राहतील. देशभरात एकसमान करप्रणाली तयार होईल आणि त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल.
एका मर्यादेपेक्षा जास्त नफा कंपन्यांना मिळविता येणार नाही. हा जास्तीचा नफा किमती कमी करून ग्राहकांपर्यंत पोहोचवावा लागेल, अशी व्यवस्था जीएसटीमध्ये करण्यात आली आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून सध्या विविध कर आकारले जातात. हे सर्व कर एका छत्राखाली आणून कररचना सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने जीएसटी आवश्यक आहे.
जीएसटी लागू झाल्यानंतर भाववाढ आणि चलन फुगवटा होऊ शकतो. १ जुलै पासून काही काळ ही भाववाढ अनुभवास येऊ शकते. नंतरच्या काळात किमती स्थिर देखील होतील.
भविष्यात जीएसटीमुळे किमती कमी होऊन कार्यक्षमता वाढेल. परिणामी सकळ देशांतर्गत उत्पादनात १ ते २ टक्के वाढ होईल, असे जाणकारांचे मत आहे.
जीएसटी परिषदेने ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के अशी चार टप्प्यांतील कररचना निर्धारित केली आहे.
कोणती वस्तू कोणत्या टप्प्यात बसवायची याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या १८ व १९ मे रोजी होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल.
जीएसटी संदर्भातील शेवटची मंजुरी १७-१८ मे रोजी मिळेल असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे.
आलिया, दीपा आणि साक्षी यांना फोर्ब्सच्या यादीत स्थान
फोर्ब्सने नुकत्याच जारी केलेल्या आशियातील ३० वर्षाच्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री आलिया भट्टचा समावेश जाहीर केली आहे.
आलियाने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले. यानंतर तिने आतापर्यंत जवळपास १० चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
उडता पंजाब या चित्रपटातील अनोख्या भूमिकेसाठी तिला सर्वोकृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आलिया भट्ट शिवाय खेळाचे मैदान गाजविणाऱ्या दीपा कर्मारकर आणि साक्षी मलिकला यांनादेखील फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळाले आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावणारी दीपा ऑलिम्पिकमध्ये ५२ वर्षांच्या कालावधीत सहभागी होणारी भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली होती.
तर साक्षीने ५८ किलो फ्रीस्टाईलमध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले होते. भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी ती पहिली महिला मल्ल ठरली होती.
गोव्यात लेट नाईट पार्टी करण्यास बंदी
संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले मनोहर पर्रिकर यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गोव्यात रात्री १०च्या पुढे पार्टी करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्रिकर मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री विनोद पालियेकर यांनी गोव्यातील लेट नाईट आणि रेव्ह पार्टीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पर्रिकरांनी हा निर्णय घेतला आहे.
राज्यात सुरू असलेल्या अमली पदार्थ व देहविक्री व्यवसाय आणि अवैध जुगार संपुष्टात आले पाहिजे, अशी सक्त ताकीद पर्रिकर यांनी पोलिस विभागाला दिली आहेत.
उत्तर गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांची येथे सातत्याने गर्दी असते. परंतु, सरकारने सूचना करूनही गोव्यातील लेट नाईट पार्टी बंद झाल्याचे दिसत नाही.
गाण्यांच्या कर्णकर्कश आवाजात पहाटे ३ ते ४ पर्यंत येथे पार्ट्या सुरू असतात. याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांना तसेच परिसरातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असल्याचे सांगण्यात येते.
बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांचे निधन
भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने १३ एप्रिल रोजी निधन झाले. ते कॉंग्रेसचे नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री होते.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणी व्ही के वर्मा यांना अटक झाल्यानंतर गुप्ता यांनी २०१२मध्ये बॅडमिंटन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
२०१४मध्ये त्यांची चार वर्षांसाठी एकमताने फेरनिवड झाली होती. गेल्या वर्षी आशियाई बॅडमिंटन महासंघाच्या अध्यक्षपदीसुद्धा त्यांची निवड झाली होती.
त्यांच्या पुढाकारामुळे भारताने २०१४मध्ये थॉमस-उबेर करंडक, सुपर सीरिज अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे आयोजन केले.
तसेच सय्यद मोदी स्मृती स्पर्धेचा दर्जाही आंतरराष्ट्रीय पासून ग्रांप्री गोल्डपर्यंत वाढविण्यात आला.
२०१३मध्ये भारतीय बॅडमिंटन लीगच्या संयोजनात त्यांचा मोठा वाटा होता. २०१५मध्ये प्रिमीयर बॅडमिंटन लीगमध्ये याचे रूपांतर झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा