उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार शेतकऱ्यांचे १ लाख रुपयापर्यंत घेतलेले कर्ज माफ करण्यात येणार आहे. यासाठी ३६,००० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
सरकारने सरसकट कर्जमाफी न देता गेल्या दोन हंगामांत विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे जे कर्जफेड करू शकले नाहीत अशा ८६ लाख अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचीच फक्त कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कर्जमाफीसही प्रत्येकी एक लाख रुपयांची कमाल मर्यादा घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची थकित कर्जे एकूण ६२ हजार कोटी रुपयांची आहेत.
१ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या उत्तर प्रदेशात अडीच कोटी आहे. या निर्णयाने ३०,७२९ कोटी रुपयांची कर्जे माफ होतील.
३ लाख २७ हजार ४७० कोटी रुपयांच्या कर्जांचा बोजा डोक्यावर असलेले उत्तर प्रदेश हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे कर्जबाजारी राज्य आहे.
याशिवाय योगी सरकारने शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल हमीभावापेक्षा क्विंटलला १० रुपये जास्त देऊन खरेदी करण्याचाही निर्णय घेतला आहे.
विस्डेन वार्षिकांकाच्या मुखपृष्ठावर विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्रिकेटमधील बायबल अशी ओळख असलेल्या विस्डेनच्या २०१७च्या वार्षिकांकाच्या मुखपृष्ठावर स्थान देण्यात आले आहे.
हा मान मिळविणारा विराट हा वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरनंतरचा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
‘विस्डेन’ क्रिकेटर्स अलमनॅक पुस्तिकेने विराट कोहलीला २०१६ या वर्षातील जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून जाहीर केले आहे.
विराटने २०१६मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्राकारात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळून २,५९५ धावा केल्या आहेत.
२०१६ या वर्षातच कोहलीने सलग ४ कसोटी सामन्यांत ४ द्विशतके केली. त्याच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत अग्रस्थानही प्राप्त केले.
विस्डेनकडून ऑस्ट्रेलियाच्या एल्स पेरी हिला जगातील सर्वोत्तम दर्जाची महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
मिसबाह-उल-हक, युनूस खान, बेन डकेट, ख्रिस वोक्स, रोलैंड जोन्स यांनाही क्रिकेटर ऑफ द इअर म्हणून घोषित करण्यात आले.
२००३पासून विस्डेनने वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून तीन भारतीयांनी हा मान पटकावला आहे.
त्यात विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने २००८ आणि २००९ अशा सलग दोन वर्षांमध्ये विस्डेनचा सर्वोत्तम क्रिकेटपटू बनण्याचा मान मिळवला होता.
प्रतिबंधित औषध सेवनात भारताला तिसरे स्थान
जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (वाडा) अहवालानुसार प्रतिबंधित औषध सेवनात भारताने सलग तिसऱ्या वर्षी तिसरे स्थान पटकावले आहे.
वाडाने २०१५मध्ये झालेल्या उत्तेजक प्रकरणांचा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यानुसार भारताचे ११७ खेळाडू उत्तेचक चाचणीत दोषी आढळले आहेत.
वाडाने २०१५मध्ये बंदी घातलेल्या भारताच्या ११७ दोषी खेळाडूंपैकी ७८ पुरुष खेळाडू असून ३७ महिला खेळाडूंचा समावेश आहे.
या दोषी ११७ खेळाडूंपैकी सर्वाधिक ५६ खेळाडू (३२ पुरुष व २४ महिला) वेटलिफ्टिंगमधील आहेत.
२०१५मध्ये रशियाचे १७६, आणि इटलीचे १२९ खेळाडू दोषी आढळल्याने ही दोन्ही राष्ट्रे अनुक्रमे पहिल्या दोन स्थानावर आहेत.
२०१३मध्ये भारताच्या ९१ खेळाडूंवर, तर २०१४मध्ये भारताच्या ९६ खेळाडूंवर बंदीची कारवाई झाली होती. या दोन्ही यादीत भारताचे तिसरे स्थान होते.
वाडाने उत्तेजक विरोधी नियमावली तयार केली असून त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बंदी व आर्थिक दंडाची कारवाई करण्यात येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा