केंद्रीय मंत्रिमंडळाने मोटार वाहन कायदा २०१६च्या सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. लवकरच हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी संसदेत सादर जाणार आहे.
भारतातील मोटार वाहन प्रवास अधिक सुरक्षित आणि नियमबद्ध करण्यास हे विधेयक उपयुक्त ठरणार आहे.
या विधेयकात अपघात मोबदल्यात वाढ तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या दंडात केलेली वाढ असे काही महत्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत.
रस्ते अपघातांचे प्रमाण निम्म्याहून अधिक कमी करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी भारतात होणाऱ्या ५ लाख अपघातात दीड लाखांहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागत आहेत.
हरियाणा सरकारची आपकी बेटी, हमारी बेटी योजना
जर एखाद्या परिवारामध्ये तिसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास संबंधित कुटुंबाला २१ हजार रुपयांची मदत हरियाणा सरकारकडून देण्यात येणार आहे.
‘आपकी बेटी, हमारी बेटी’ या योजनेअंतर्गत सर्व धर्म, जात आणि उत्पन्न गटातील लोकांना ही मदत करण्यात येणार आहे.
हे अनुदान २४ ऑगस्ट २०१५नंतर जन्मलेल्या मुलींसाठी देण्यात येणार आहे. जर कुटुंबामध्ये अगोदरच दोन मुले असतील आणि जरी तिसरी मुलगी जन्माला आली तरी हे अनुदान देण्यात येणार आहे.
राज्यातील लिंग गुणोत्तरात वाढ करणे आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
यापूर्वी अनुसूचित जाती, जमाती आणि कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांमध्ये पहिली मुलगी जन्माला आल्यास हे अनुदान देण्यात येत असे.
हरियाणाचे मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर
विख्यात नाटककार पद्मश्री अरुण शर्मा यांचे निधन
आसामी भाषेतील विख्यात नाटककार आणि कादंबरीकार पद्मश्री अरुण शर्मा यांचे २९ मार्च रोजी निधन झाले.
दिब्रुगढ येथे १९३५मध्ये जन्मलेल्या अरुण यांचे वडील तिलकचंद्र शर्मा हे ‘द टाइम्स ऑफ आसाम’ या वृत्तपत्राचे संपादक होते.
अरुण यांचे शालेय शिक्षण तेजपूरमध्ये झाले. नंतर ते गुवाहाटी येथील कॉटन महाविद्यालयातून बीए झाले. त्यानंतर त्यांनी वर्षभर ‘आसाम ट्रिब्यून’ येथे पत्रकारिता केली.
यानंतर त्यांनी ‘जिंती’, ‘परशराम’, ‘पुरुष’, ‘कुकुरेनिचा मुह’ ही काही नाटके लिहिली. ‘श्री निबारन भट्टाचार्य’ हे त्यांचे नाटक आसामी रंगभूमीवर लोकप्रिय ठरले.
बाल दिनानिमित्त त्यांनी लिहिलेले ‘द सेल्फिश प्रिन्स’ हे बालनाटय़ तर बीबीसी नभोवाणीवरूनही प्रसारित झाले होते.
‘बुरुंजीपथ’ या पुस्तकाद्वारे आणीबाणीच्या काळ्याकुट्ट पर्वाचा त्यांनी उपरोधिक शैलीत समाचार घेतला.
नाटय़क्षेत्रात त्यांचे नाव गाजू लागल्यावर त्यांना आकाशवाणीमध्ये नोकरीची संधी मिळाली. या काळात त्यांनी ४०हून अधिक नभोनाटय़े लिहिली.
त्यांच्या ‘आसिरबादर रंग’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. आसामच्या तत्कालीन ग्रामीण जीवनाचे चित्र त्यांनी या कादंबरीत मांडले.
आसामी रंगभूमीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार तसेच पद्मश्री किताबही मिळाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा