चालू घडामोडी : ९ एप्रिल
एडनच्या आखातात भारत, चीन आणि पाकची संयुक्त कारवाई
- एडनच्या आखातात सोमालियन चाच्यांकडून एका मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आल्यानंतर भारत, चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजांनी संयुक्त कारवाई केली.
- ८ एप्रिल रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. ओएस ३५ हे १७८ मीटर लांब मालवाहू जहाज मलेशियातील केलांगमधून निघाले असताना एडनच्या आखातात त्यावर हल्ला झाला.
- यानंतर धोक्याचा संदेश मिळाल्यानंतर भारतीय नौदलाची आयएनएस मुंबई आणि आयएनएस तरकश जहाजे ज्या भागात हल्ला झाला, त्या ठिकाणी पोहोचली.
- भारतीय नौदलाची जहाजे हल्ला झालेल्या ठिकाणी पोहोचताच चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाची जहाजेदेखील संबंधित ठिकाणी आली.
- चीनने ओएस-३५ या जहाजाच्या मदतीसाठी १८ जणांचे पथक पाठवले. तर भारतीय नौदलाने या जहाजासाठी कम्युनिकेशन लिंक उपलब्ध करुन दिली.
- यासोबतच या संपूर्ण मोहिमेला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई मदत देण्याची कामगिरीदेखील भारतीय नौदलाने पार पाडली.
- चिनी नौदलाच्या युलीन या जहाजाने या कारवाईत सहभाग घेतला. युलीनवरुन क्षेपणास्त्र डागण्यात आली. त्यामुळे मालवाहू जहाजाची सुखरुप सुटका होण्यास मदत झाली.
- गेल्या काही महिन्यांपासून एडनच्या आखातात चाच्यांकडून जहाजांवर हल्ले केले जात नव्हते. मात्र सोमालियन चाचे पुन्हा एकदा सक्रीय झाल्याने मालवाहू जहाजांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
आशा खेमका यांना ‘एशियन बिझनेस वूमन ऑफ द ईयर’ पुरस्कार
- ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीय वंशाच्या महिला शिक्षणतज्ञ आशा खेमका यांना ‘एशियन बिझनेस वूमन ऑफ द ईयर’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- खेमका या मूळ बिहारमधील सीतामढी गावातील असून, वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी शाळा सोडून दिली होती.
- त्यांच्या विवाहानंतर आपल्या पती आणि मुलांसह त्या ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाल्या. त्यावेळी त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नव्हते. नंतर त्यांनी ही भाषा आत्मसात केली.
- सध्या त्या वेस्ट नॉटिंगहॅमशायर महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शिक्षणक्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
- २०१३मध्ये त्यांना ‘डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा ब्रिटनमधील अत्यंत प्रतिष्ठेचा नागरी सन्मान प्राप्त झाला.
- हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या १९३१नंतरच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला होत. १९३१मध्ये हा पुरस्कार धार संस्थानच्या महाराणी लक्ष्मीदेवीबाई साहिबा यांना मिळाला होता.
- एशियन मीडिया अँड मार्केटिंग ग्रुपतर्फे ब्रिटनमधील श्रीमंत आशियाई व्यक्तींची यादीही या वेळी जाहीर करण्यात आली.
- या यादीमध्ये बोपारन कुटुंब (संपत्ती सर्वाधिक ९० कोटी पौंड), लॉर्ड स्वराज पॉल (८० कोटी पौंड), संजीव गुप्ता (२५ कोटी पौंड) यांच्या नावांचा समावेश आहे.
आसाममध्ये दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी नाही
- आसाम सरकारने ९ एप्रिल रोजी लोकसंख्या धोरणाच्या मसुद्याची घोषणा केली. या मसुद्यात दोनपेक्षा अधिक मुले असल्यास त्या व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाणार नाही, असे सूचवण्यात आले आहे.
- त्यामुळे सरकारच्या या मसुद्यानुसार दोनपेक्षा अधिक मुले असल्यास सरकारी नोकरीला मुकावे लागणार आहे.
- ही अट पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवणाऱ्या व्यक्तींना ती आपल्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पाळावी लागणार आहे.
- याशिवाय ट्रॅक्टर देणे, घरकुल योजनेचा लाभ मिळवणे याशिवाय इतर सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास दोन अपत्यांची अट लागू असणार आहे.
- पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषदा तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवारांनाही लोकसंख्या धोरणाच्या मसुद्यातील ही अट लागू असणार आहे.
चीन-अमेरिका व्यापार संबंध सुधारण्यासाठी १०० दिवसांची योजना
- चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील शिखर बैठकीत दोन्ही देशातील व्यापार संबंध सुधारण्यासाठी १०० दिवसांची योजना तयार करण्यात आली.
- या नेत्यांच्या शिखर बैठकीवर सीरियातील हल्ल्यांची छाया होती. ट्रम्प यांचे सहकारी दोन दिवसांच्या चर्चेत सहभागी होते.
- या बैठकीत चीन सरकारने आर्थिक बाबीत केलेल्या हस्तक्षेपांमुळे केलेल्या आव्हानांचा प्रश्न ट्रम्प यांनी उपस्थित केला होता.
- चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून दोन्ही देशात गेल्या वर्षी ५१९.६ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे. १९७९मध्ये हा व्यापार २.५ अब्ज डॉलर्सचा होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा