सर्वाधिक भ्रष्टाचारी राज्यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या स्थानी
‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार देशभरात सर्वाधिक भ्रष्टाचार असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे.
या यादीत कर्नाटक पहिल्या स्थानी असून त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि पंजाब या राज्यांचा क्रमांक लागतो.
हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. हिमाचल प्रदेश नंतर केरळ आणि छत्तीसगडमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार आहे.
देशभरातील २० राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. शहरी आणि ग्रामीण भागातील ३ हजारहून अधिक लोकांशी चर्चा करुन हा अहवाल तयार करण्यात आला.
सरकारी कामांसाठी देण्यात येणारी लाच आणि भ्रष्टाचाराच्या आधारे लाचखोर राज्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
२० राज्यांमधून २०१७या वर्षात सुमारे ६,३५० कोटी रुपयांची लाच दिल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
२००५ च्या तुलनेत हा आकडा कमी आहे. २००५ मध्ये सुमारे २०,५०० कोटी रुपयांची लाच दिल्याचे समोर आले होते.
नोटाबंदीनंतर नागरी सेवेतील भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले असे मत अनेकांनी मांडल्याचे अहवालात म्हटले आहे.
सरकारी कामातील भ्रष्टाचार, लाचखोरी कमी करण्यासाठी खूप काही करण्याची गरज असल्याचे सर्व्हेत सांगण्यात आले आहे.
आशियाई ग्रांप्री स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताला सहा पदके
आशियाई ग्रांप्री ॲथलेटिक्स स्पर्धेतील दुसऱ्या टप्यात भारताच्या व्ही नीना हिने लांब उडीत सुवर्णपदक जिंकले. पहिल्या टप्प्यात नीनाला रौप्यपदक मिळाले होते.
तसेच भारताच्या ज्युनिअर विश्वविजेत्या नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक मिळवत लंडन येथे होणाऱ्या विश्व ॲथलेटिक्स स्पर्धेची पात्रता गाठली आहे.
नीरजने चौथ्या प्रयत्नात ८३.३२ मीटर भाला फेकला आणि लंडनसाठी असलेली ८३ मीटरची पात्रता पार केली.
पहिल्या टप्प्यातील विजेता तैवानच्या चेंग चाओने विजयी मालिका कायम ठेवत ८६.९२ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले.
गोळाफेकमध्ये पहिल्या टप्प्यात सुवर्णपदकासह लंडनची पात्रता गाठणाऱ्या मनप्रीत कौरला दुसऱ्या टप्प्यात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत टिंटू लुकाने २ मिनिटे ६.३२ सेकंदात रौप्य तर १०० मीटर शर्यतीत द्युती चंदने ११.५७ सेकंदात रौप्यपदक जिंकले. ओमप्रकाश करानाने गोळाफेकमध्ये ब्राँझपदकाची कमाई केली.
भारत बनणार जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
२०२२मध्ये भारत जर्मनीला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्तवला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार वाढल्यामुळे आता ब्रिटन जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमधील आपले स्थान गमावणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाग्यलक्ष्मी योजना
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आली की ५० हजार रुपयांचा बॉंड देण्याचे जाहीर केले आहे.
भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात येणार असून. मुलीच्या आईलाही ५,१०० रुपये मिळणार आहेत.
उत्तर प्रदेश सरकारच्या महिला कल्याण विभागातर्फे या योजनेसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा