चालू घडामोडी : ४ एप्रिल

‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांचे निधन

  • हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांचे ३ एप्रिल रोजी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. आदराने त्यांना ‘गानसरस्वती’ असे संबोधले जात असे.
  • किशोरीतार्इंचा जन्म मुंबईत १० एप्रिल १९३२मध्ये झाला. त्यांच्या आई प्रख्यात गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्यामुळे घरातच त्यांना गायनकलेचा समृद्ध वारसा मिळाला होता.
  • मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे पती रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या. 
  • किशोरीतार्इंनी १९५०मध्ये कारकिर्दीस प्रारंभ केला. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजन गायनात त्यांनी आपल्या शैलीची मुद्रा उमटवली.
  • गीत गाया पत्थरोंने (१९६४) या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. १९९१मध्ये ‘दृष्टी’ या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले.
  • मात्र नंतर त्या शास्त्रीय संगीतातच रमल्या. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव व अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीतार्इंचे गाणे कसदार झाले.
  • त्यांनी स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त हा संगीत शास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरु ज्जीवित केला, असे मानले जाते.
  • ज्ञानेश्वरीवर आधारित ‘तोचि नादु सुस्वर जाला’ तसेच संत मीराबाईच्या जीवनावर आधारित ‘मगन हुई मीरा चली’ हे त्यांचे प्रचंड कार्यक्रम गाजले. या दोन्ही कार्यक्रमातील सर्व गाण्यांच्या हृदयस्पर्शी चाली तार्इंच्या स्वत:च्या होत्या.
  • किशोरीताईंनी देशविदेशात शेकडो मैफीली गाजवल्या. भारतातल्या सर्व संगीत महोत्सवात त्यांना आवर्जुन आमंत्रित केले जात असे.
 गाजलेली गाणी 
  • अवघा रंग एक झाला
  • बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
  • माझे माहेर पंढरी
  • हे श्यामसुंदर राजसा
  • अवचिता परिमळु
  • कानडा विठ्ठल
  • अवघा तो शकुन
  • जनी जाय पाणियासी
  • जाईन विचारित रानफुला
  • पडिलें दूरदेशीं
  • पाहतोसी काय आता पुढे
  • मी माझें मोहित राहिलें
  • या पंढरीचे सुख
  • सोयरा सुखाचा विसांवा
 पुरस्कार 
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९८५
  • पद्मभूषण पुरस्कार, १९८७
  • संगीत सम्राज्ञी पुरस्कार, १९९७
  • पद्मविभूषण पुरस्कार, २००२
  • संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, २००२
  • संगीत नाटक अकादमी फेलोशिप, २००९
  • राज्य शासनाचा पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, २०१३
 शिष्य 
  • माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, मीना जोशी, नंदिनी बेडेकर, विद्या भागवत, माया उपाध्याय, तेजश्री आमोणकर, व्हायोलिन वादक मिलिंद रायकर

भारताच्या टीएएल कंपनीचा रोबोट आंतरराष्ट्रीय विक्रीसाठी पात्र

  • टाटा मोटर्सच्या मालकीच्या असलेल्या टीएएल कंपनीने ब्राबो हा मेक इन इंडिया संकल्पनेखाली तयार केलेला यंत्रमानव (रोबोट) आंतरराष्ट्रीय विक्रीसाठी योग्य ठरला आहे.
  • या रोबोटला युरोपातील बाजारपेठेसाठी सीई प्रमाणपत्र मिळाले असून त्यामुळे युरोपातील आरोग्य, सुरक्षा, पर्यावरण मानकानुसार या रोबोटची विक्री करता येणार आहे.
  • ब्राबो हा रोबोट मेक इन इंडिया सप्ताहात गेल्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता व तो सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात स्वयंचलीकरणासाठी योग्य आहे.
  • कच्चा माल हाताळणे, पॅकेजिंग करणे यासाठी या रोबोटचा उपयोग होणार असून सुटे भाग जोडणे, कॅमेरा व दृष्टीशी संबंधित इतर कामे अशा अनेक बाबी तो करू शकतो.
  • ब्राबो हा किफायतशीर म्हणजे कमी किमतीत जास्त काम देत असल्याने बाजारपेठेत या रोबोटची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.

गुजरातच्या पोलीस महासंचालकपदी गीता जोहरी

  • गुजरातच्या पहिल्या आयपीएस अधिकारी गीता जोहरी यांची गुजरातच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • गीता जोहरी यांचं रूपाने गुजरातच्या पोलिसांच्या महासंचालकपदी पहिल्यांदाच एक महिला पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे.
  • याआधीचे पोलीस महासंचालक पी पी पांडे या पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी गीता जोहरी यांची नेमणूक झाली आहे.
  • सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या याचिकेमुळे पांडे यांना या पदावरून दूर व्हावे लागले होते. इशरत जहाँ एन्काउंटर केसमध्ये पांडे हे आरोपी आहेत आणि सध्या जामिनावर बाहेर आहेत.
  • २००४साली झालेलं हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप आहे. तत्कालीन पोलीस प्रशासनाने मात्र याचा इन्कार करत इशरत दहशतवादी असल्याचे म्हटले होते.
  • गीता जोहरी १९८२बॅचमधील आयपीएस अधिकारी आहेत. त्या सध्या गुजरात पोलीस हाऊसिंग बोर्डाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी असून नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होत आहेत.
  • बहुचर्चित सोहराबुद्दीन-तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणात जोहरी आरोपी होत्या. मात्र, सीबीआय न्यायालयाने मार्च २०१५मध्ये त्यांना निर्दोष ठरविले.

एच-वनबी व्हिसाची प्रक्रिया अधिक कठीण होणार

  • अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-वनबी व्हिसाला मंजुरी देण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी सुरु केली आहे.
  • ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात  अमेरिकेन नागरीकांचे रोजगार वाचवण्यासाठी एच-वनबी व्हिसावर मर्यादा आणण्याचे आश्वासन दिले होते.
  • यूएससीआयएस ही अमेरिकन संस्था व्हीसा जारी करते. यापुढे एच-वनबी व्हिसा धारकांना कठोर निकषांमधून जावे लागेल असे यूएससीआयएसने आपल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.
  • यापुढे फक्त पदवी दाखवून व्हिसा मंजूर होणार नाही तर, अर्जदाराला तो त्या नोकरीसाठी कसा पात्र आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करावे लागेल असेही यूएससीआयएसने म्हटले आहे.
  • एच-वनबी व्हीसासाठीच्या नियमाची कठोरपणे अंमलबजावणी न झाल्याने नोकरीसाठी पात्र नसतानाही अनेकांनी नोकऱ्या मिळवल्या असे अमेरिकन न्याय खात्याने म्हटले आहे.
  • भारतातून मोठया प्रमाणावर आयटी तज्ञ एच-वनबी व्हीसावर अमेरिकेत नोकरी करत आहेत. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा भारतीय आयटी तज्ञांना फटका बसू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा