छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २६ जवान शहीद
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात २४ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) २६ जवान शहीद झाले.
तसेच काही जवान या हल्ल्यात जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सीआरपीएफच्या ७४व्या बटालियनमधील ९० जवानांची तुकडी नक्षलवाद्यांनी बंद केलेला रस्ता पूर्ववत करण्याच्या काम करत होती.
बुरकापाल चिंतागुफा दरम्यानच्या परिसरात हे काम चालू असताना ३०० पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
नक्षलवाद्यांशी झालेल्या या चकमकीत सीआरपीएफचे २६ जवान शहीद झाले तर ५ नक्षलवादी मारले गेले आहेत.
गेल्यावर्षी सुकमा जिल्ह्यात कोट्टाचेरू येथील घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २१९व्या बटालियनचे १२ जवान शहीद झाले होते.
यापूर्वी २०१०मध्ये छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले होते. हा भारतीय सुरक्षा दलांवरील सर्वात भीषण हल्ला होता.
कसिनाधुनी विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते कसिनाधुनी विश्वनाथ यांना २०१६चा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
सुवर्ण कमळ, शाल व १० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विश्वनाथ यांना ३ मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
विश्वनाथ यांना आत्तापर्यंत पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्यांना दहा वेळा फिल्मफेअर पुरस्कारही प्रदान करण्यात आले आहेत.
‘स्वाथी मुथायम’ हा त्यांचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ५९व्या अकादमी पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीसाठी पाठविण्यात आला होता.
याशिवाय, संकरभरणम या त्यांच्या चित्रपटासदेखील भारतासहित जगभरातून वाखाणण्यात आले होते.
नवज्योतसिंग सिद्धू यांची शेतकऱ्यांना २४ लाखांची मदत
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये शेतीचे नुकसान भरुन काढण्यासाठी स्वत:च्या उत्पनातून शेतकऱ्यांना २४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंजाबमधील ओठीया परिसरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीमध्ये ३०० हेक्टर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले होते.
सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे मंत्री सिद्धूनीं स्वत:च्या खिशातून शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.
यापूर्वी आगीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी पंजाब सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ८ हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
काँग्रेसचे नवज्योतसिंग सिद्धू पंजाबच्या अमृतसर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत.
अफगाणच्या संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमूखांचा राजीनामा
अफगाणिस्तानमधील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अफगाणचे संरक्षणमंत्री अब्दुल्ला हबीबी आणि लष्करप्रमूख कादम शाह शाहीम यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
उत्तर अफगाणिस्तानमध्ये मझर-इ-शरिफ या शहराजवळील लष्करीतळावर १० सशस्त्र दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी हल्ला केला होता.
तालिबानी दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात १६०हून अधिक जवानांचा मृत्यू झाला होता.
सैन्याचे जवान नमाज अदा करत असताना हा हल्ला झाल्याने जीवितहानीचे प्रमाण जास्त होते. यामध्ये नव्याने सैन्यात भरती झालेल्या जवानांचे प्रमाणही लक्षणीय होते.
हा हल्ला ज्या तळावर झाला त्यानंतर तळावरील कमांडर यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस हे काबूल दौऱ्यावर दाखल झाले आहेत.
अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमधील इसिसच्या तळावर मोठा बॉम्ब हल्ला करुन अनेक दहशतवादी ठार केले होते. या कारवाईनंतर तालिबानी संघटनेने हा हल्ला केला होता.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष: अश्रफ घनी
रॉनी स्क्रूवाला यांच्याकडून ऑनलाइन स्कॉलरशिप निधीची स्थापना
ऑनलाइन एज्यूकेशन स्टार्ट अपचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी आता ऑनलाइन स्कॉलरशिप निधीची स्थापना केली आहे. आशिया खंडात अशा स्वरुपाचा निधी सुरु केल्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतीय तरूणांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे करिअर घडविण्यासाठी मदत करणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
भविष्यात डिजिटल क्षेत्रातील वाढत्या संधी आणि महत्त्व लक्षात घेता भारतीय तरूणांना त्यासाठी मदत तयार करण्यासाठीही या उपक्रमाची मदत होईल.
या उपक्रमाच्या माध्यमातून सुरुवातीला १०० कोटी आणि भविष्यात ३०० ते ४०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा स्क्रूवाला यांचा मानस आहे.
भारतात उच्चशिक्षित तरुणांची मोठ्या प्रमाणात गरज असून त्या तुलनेत देशात उच्चशिक्षित तरुणांचे प्रमाण नगण्य आहे.
कमी वयात नोकरीला लागल्याने अनेकांचे उच्चशिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहते. पण अशा विद्यार्थ्यांना आता रॉनी स्क्रूवाला यांनी मदतीचा हात दिला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून २५ हजारांपासून ते २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
शिष्यवृत्तीसाठी पात्र न ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. नोकरी लागल्यानंतर त्यांना हे कर्ज फेडता येईल.
याशिवाय, आर्थिक गरज असलेल्यांना या निधीतून मदत पुरवली जाईल. मात्र, ही शिष्यवृत्ती देताना गुणवत्ता हाच प्रमुख निकष असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा