चालू घडामोडी : १४ एप्रिल

न्या. करणन यांनी सरन्यायाधीशांना समन्स बजावले

  • कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी एस करणन यांनी आपल्याविरोधात अवमानता नोटीस जारी करणारे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे एस खेहर आणि इतर सहा न्यायाधीशांना समन्स बजावले आहेत.
  • या सर्वांनी २८ एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर राहावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत. या ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाने मुद्दाम आपला अपमान केला, असा दावा न्यायमूर्ती करणन यांनी केला आहे.
  • मी दलित असल्यामुळे भेदभाव केला जात आहे, असे न्यायाधीश करणन ठामपणे सांगत आहेत.
  • अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी किती शिक्षा व्हावी, यावर आपले मत नोंदवावे, असेही त्यांनी नमूद केले.
 पार्श्वभूमी 
  • न्यायमूर्ती करणन यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या २० विद्यमान न्यायाधीशांवर २३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
  • आता त्यांनी याबाबत सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीचा अहवाल संसदेला सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
  • त्यावर सरन्यायाधीशांनी हा न्यायालयाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली.  त्यानंतर ७ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करून करणन यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई सुरू करण्यात आली.
  • सर्वोच्च न्यायालयाने कारवाई सुरू करून न्यायाधीश करणन यांना दोन वेळा सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, करणन यांनी त्याकडे दुर्लक्ष करून न्यायालयात अनुपस्थित राहिले.
  • त्यानंतर १० मार्चला करणन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. ३१ मार्चपूर्वी न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही करणन यांना देण्यात आले होते.
  • न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याप्रकरणी करणन यांनी माफी मागण्यास नकार दिला. तुरुंगात पाठवले तरी चालेल पण माफी मागणार नाही, असा पवित्रा करणन यांनी घेतला होता.

भारतीय वंशाचे अरविंद सिन्हा यांना एरोस्पेस इंजिनीयर पुरस्कार

  • ऑस्ट्रेलियात राहणारे भारतीय वंशाचे हवाई अभियंता निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ अरविंद सिन्हा यांना अमेरिकन हेलिकॉप्टर सोसायटी इंटरनॅशनल (एएचएस) या संस्थेचा एरोस्पेस इंजिनीयर पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • त्यांनी ऊर्ध्व उड्डाण तंत्रज्ञानात म्हणजे व्हर्टिकल फ्लाइट टेक्नॉलॉजीत मोठे काम केले आहे.
  • सिन्हा यांना आतापर्यंत अनेक मानांचे पुरस्कार मिळाले असून डिझाईन प्रकल्प व अध्यापन क्षेत्रातही त्यांनी मोलाचे काम केले आहे.
  • हेलिकॉप्टर हवाई उड्डाण क्षेत्रात मार्गदर्शक कामगिरी करणाऱ्या सोसायटी सदस्यांना हा पुरस्कार दिला जातो.
  • या सोसायटीचे फेलो म्हणून त्यांना मे २०१६मध्ये गौरवण्यात आल्यानंतर आता एरोस्पेस अभियंता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
  • सध्या सिन्हा ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागात हेलिकॉप्टर सिस्टम डिव्हिजनचे अभियांत्रिकी संचालक आहेत.
  • ऑस्ट्रेलियन लष्करासाठी व नौदलासाठी ते एव्हिएशन प्लॅटफॉर्म अँड सिस्टम्स याबाबतचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर आहेत.
  • सामरिक हवाई प्रणाली तयार करण्यात त्यांचे विशेष नैपुण्य आहे. यात हेलिकॉप्टर्स व मानवविरहित विमाने यांचा समावेश होतो.
  • याआधी ते रॉयल मेलबर्न इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या एरोस्पेस अँड अ‍ॅव्हिएशन रिसर्च सेंटरचे संचालक तसेच प्राध्यापक होते.
  • सध्या ते मेलबर्न येथील एरोस्पेस डिझाईन या मोनाश विद्यापीठाच्या संस्थेत मानद प्राध्यापक आहेत.
  • भारतीय लष्करातही त्यांनी काम केले असून इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र) व एअरबोर्न स्पेशल फोर्सेस या विभागांची धुरा त्यांनी सांभाळली आहे.
  • मेजर म्हणून काम करताना त्यांनी सियाचीन हिमनदी परिसरात १९८४मध्ये ऑपरेशन मेघदूतअंतर्गत अभियांत्रिकी विभागाचे नेतृत्व केले होते. तेथे त्यांच्या चमूला ‘स्पेशल ऑपरेशन्स ऑर्डर’ हा सन्मान मिळाला होता.
  • आयआयटीत हेलिकॉप्टर डिझाइन विषयातील पदव्युत्तर पदवीमुळे त्यांना ऑस्ट्रेलियात याच विषयात डॉक्टरेट करण्याची संधी मिळाली.
  • सातारा सैनिकी शाळेचे ते माजी विद्यार्थी असून, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत त्यांचे आधीचे शिक्षण झाले आहे.

पंचायत राज पुरस्कार २०१७

  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे यशवंत पंचायत राज अभियान २०१६-१७ अंतर्गत पंचायत राज संस्था व गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
  • यावेळी लातूर, सोलापूर व जळगाव या जिल्हा परिषदांना अनुक्रमे ३० लाख, २० लाख व १७ लाख रुपये तसेच प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह अशा राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
  • तसेच खानापूर-विटा (जि. सांगली), देवगड (जि. सिधुदूर्ग) व अचलपूर (जि. अमरावती) या पंचायत समित्यांना अनुक्रमे २० लाख, १७ लाख व १५ लाख रुपये तसेच प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह अशा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

बसपच्या उपाध्यक्ष पदी आनंद कुमार

  • बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी आपले भाऊ आनंद कुमार यांची बसपच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
  • त्यांना हे पद देताना मायावतींनी त्यांना हे पद मिळाल्यावर ते कधीही आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री होणार नाहीत अशी अट घातली आहे. ही अट मान्य करुन आनंद कुमार यांनी हा पदभार स्वीकारला.
  • आनंद कुमार हेच मायावतींचे राजकीय वारस असतील अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून होती. त्याच दृष्टीने मायावतींनी हे पाऊल टाकले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा