सर्वात तरुण नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईची युनोच्या शांतिदूतपदी निवड करण्यात आली आहे.
जगातील एखाद्या नागरिकास संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान असून, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची घोषणा केली.
मलालाच्या हातून लहान मुलींच्या शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य वाढावे या हेतूने हा पुरस्कार देण्यात येत आहे.
पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मलालाला तालिबानच्या दहशतवाद्यांकडून विरोध झाला होता. दहशतवाद्यांनी २०१२मध्ये तिच्यावर हल्ला करत तिला ठार करण्याचा प्रयत्नही केला.
त्या हल्ल्यातून ती बचावली आणि पुन्हा आपले शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू ठेवले. तिच्या या कार्याची दखल घेत तिला २०१४चा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.
तिच्यासह भारताच्या कैलाश सत्यार्थींनादेखील हा पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार स्वीकारणारी मलाला जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली.
मलाला युसूफझाईने मलाला फंड या ट्रस्टची स्थापना केली आहे. त्याद्वारे ती जगभरात शिक्षणाचा प्रसार करते.
आपले अनुभव कथन केलेल्या तिच्या 'आय एम मलाला' या पुस्तकाच्या आतापर्यंत १८ लाख प्रतींची विक्री झाली आहे.
व्हिटसन सर्वाधिक काळ अवकाशात राहण्याचा विक्रम करणार
अमेरिकेच्या पेगी व्हिटसन या सर्वाधिक काळ अवकाश स्थानकात राहणाऱ्या अमेरिकी अवकाशवीराचा मान पटकावणार आहेत.
एप्रिलअखेरीस हा विक्रम त्या नोंदवणार आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचा अवकाशातील मुक्काम नासाने तीन महिन्यांनी वाढवला आहे.
व्हिटसन यांनी नोव्हेंबर २०१६मध्ये ओलेग नोव्हिटस्की व थॉमस पेसक्वेट यांच्यासह रशियाच्या सोयूझ अग्निबाणाच्या मदतीने अवकाश स्थानकाकडे झेप घेतली होती.
त्यांचे अवकाश वास्तव्य जूनमध्ये संपणार होते, त्यानुसार पेसक्वेट व नोव्हिटस्की हे परतही येणार आहेत; पण व्हिटसन यांचा मुक्काम मात्र वाढला आहे.
अवकाश स्थानकात राहणाऱ्यांची संख्या रशियाने कमी करण्याचे ठरवल्यामुळे पेगी यांना ही संधी मिळाली आहे.
येत्या २४ एप्रिलला पेगी व्हिटसन या अवकाश वास्तव्याचे ५३४ दिवस पूर्ण करणार आहेत. त्यामुळे त्या जेफ विल्यम्स यांचा विक्रम मोडणार आहेत.
पुरुष व स्त्री अशा सर्वच अवकाशवीरांत रशियाचे गेनाडी पडालका यांचा अवकाश वास्तव्याचा विक्रम ८७९ दिवसांचा आहे.
व्हिटसन आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील पहिल्या अमेरिकी कमांडर आहेत व २००८नंतर आता पुढील आठवडय़ात दुसऱ्यांदा स्थानकातील चमूचे नेतृत्व करणार आहेत.
त्यांनी दुसऱ्या कुठल्याही महिलेपेक्षा जास्त स्पेसवॉक केले असून येत्या काही महिन्यांत त्या आणखी स्पेसवॉक करून त्यातही विक्रम करतील.
यापूर्वी त्यांनी २००२ व २००७मध्ये त्यांनी दोन प्रदीर्घ अवकाश वास्तव्य मोहिमा केल्या आहेत. २०१६मधली आताची त्यांची तिसरी मोठी मोहीम आहे.
एल अँड टीच्या सीईओपदी एस एन सुब्रमण्यन
अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीचा समूह असलेल्या लार्सन अॅण्ड टुब्रोच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) एस एन सुब्रमण्यन यांची नियुक्ती झाली आहे.
सुब्रमण्यन यांच्याकडे १ जुलैपासून व्यवस्थापकीय संचालकपदाचीही जबाबदारी असेल. सध्या ते समूहात उप व्यवस्थापकी संचालक व अध्यक्ष आहेत.
ते १९८४मध्ये समूहात रुजू झाले व २०११मध्ये त्यांचा कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी झाले.
गेल्या १७ वर्षांपासून समूहाचे नेतृत्व करणारे यापूर्वीचे सीईओ ए एम नाईक यापुढे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत.
गेल्या ५२ वर्षांपासून लार्सन अॅण्ड टुब्रोमध्ये असलेले नाईक १९९९मध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक बनले. तर २००३मध्ये ते समूहाचे अध्यक्ष झाले.
आता बिगर कार्यकारी अधिकारी म्हणून १ ऑक्टोबरपासूनचा त्यांची कारकीर्द पुढील तीन वर्षांसाठी असेल. नाईक ३० सप्टेंबर २०१७ रोजी निवृत्त होणार आहेत.
नाईक यांच्या १७ वर्षांच्या कालावधीत समूहाचे बाजार भांडवल ४,४०० कोटी रुपयांवरून १.५८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
३० देशांमध्ये कार्यभार असलेल्या लार्सन अॅण्ड टुब्रोचे भारताव्यतिरिक्त अन्य भागातील हिस्सा ३० ते ३५ टक्के आहे.
कान्स फिल्म फेस्टीवलसाठी ३ मराठी चित्रपटांची निवड
कान्स फिल्म फेस्टीवलसाठी राज्य सरकारकडून तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
कान्ससाठी पाठवावयाच्या तीन चित्रपटांची निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समिती सदस्यांनी १६ चित्रपटांमधून ३ चित्रपटांची निवड केली.
कान्ससाठी निवड करण्यात आलेल्या ३ चित्रपटांचे प्रत्येकी २ प्रतिनिधी असे एकूण ६ प्रतिनिधी महोत्सवासाठी पाठविण्यात येणार आहेत. १७ ते २८ मे दरम्यान कान्स फिल्म फेस्टीवल होणार आहे.
निवड करण्यात आलेले तीन चित्रपट पुढीलप्रमाणे:-
हॅपी माईंडस एंटरटेंमेंट प्रा. लि. निर्मित: सायकल
एस पी इंटरटेंनमेंट प्रा. लि. निर्मित: टेक केअर गुड नाईट
रंगनील क्रिएशन्स निर्मित: दशक्रिया
बांगलादेशला भारताकडून ४.५ अब्ज डॉलरचे अर्थसाह्य
बांगलादेशमधील विविध विकासकामांसाठी भारताने ४.५ अब्ज डॉलरचे अर्थसाह्य देऊ केले आहे. याद्वारे तेथील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.
७ वर्षांत प्रथमच भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल रोजी यासंबंधित २२ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
याशिवाय मोदी आणि शेख हसिना या दोघांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून कोलकाता ते ढाका या बससेवेचेही उद्घाटन केले.
याशिवाय नरेंद्र मोडी यांनी भारत आणि बांगलादेशमध्ये डिझेलचा पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचीही घोषणा केली.
पाकच्या युनूस खानची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
पाकिस्तानचा कर्णधार मिस्बा-उल-हक पाठोपाठ पाकचा मधल्या फळीतील फलंदाज युनूस खाननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
२०००मध्ये कसोटी कारकिर्दीला सुरवात करणाऱ्या ३९ वर्षीय युनूस खाने आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्त होणार आहे.
नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने १७५ धावांची खेळी केली होती. कसोटी कारकिर्दीत १० हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याला फक्त २३ धावांची गरज आहे.
कसोटीत दहा हजार धावा करणारा तो पाकिस्तानचा एकमेव क्रिकेटपटू असेल. त्याने ५३.०६च्या सरासरीने धावा केल्या असून, यामध्ये ३४ शतकांचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा