बाबरी मशीद प्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप
भारतीय राजकारणाला वेगळे वळण देणाऱ्या सन १९९२मधील बाबरी मशीद न्यायालयीन प्रकरणावर न्या. पी सी घोष व न्या. आर एफ नरिमन यांनी १९ एप्रिल रोजी निवाडा दिला.
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारतींसह अन्य भाजप नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवून खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणातील बड्या आरोपींवर गुन्हेगारी कटाचा आरोप पुन्हा ठेवण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) याचिका न्यायालयाने मान्य केली.
या आदेशामुळे आगामी राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असलेले ८९ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना धक्का बसला आहे.
अडवाणींसह सहा आरोपींना आता धर्माच्या आधारे दोन गटांत वैमनस्य निर्माण करणे, प्रक्षोभक विधाने करणे अशा विविध आरोपांना तोंड द्यावे लागेल.
हे आरोप सिद्ध झाल्यास दोन ते पाच वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
सायरा बानो आणि विक्रम गोखले यांना राज्य शासनाचे पुरस्कार
ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे यंदा राज्य शासनाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना दरवर्षी राज्य शासनातर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
सायरा बानो यांना ‘राजकपूर जीवनगौरव’, तर विक्रम गोखले यांना ‘चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय, ‘व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेते अरुण नलावडे यांना आणि ‘राजकपूर विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे.
जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे.
‘टाईम’च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदी
‘टाईम’ मासिकातर्फे जाहीर करण्यात आलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या अंतिम यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर यांनी स्थान मिळवले आहे.
या यादीत समावेश असणारे ते दोघेच भारतीय आहेत. गेल्या वर्षभरात आपल्या उल्लेखनीय कामगिरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चा प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींचा या यादीत समावेश आहे.
मोदींशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचाही या यादीत समावेश आहे.
नक्षलवादी चळवळीचे कार्यकर्ते नारायण संन्याल यांचे निधन
सशस्त्र क्रांतीचा नारा देत नक्षलवादी चळवळीच्या प्रसारासाठी सारे आयुष्य पणाला लावणारे नारायण संन्याल यांचे १७ एप्रिल रोजी कर्करोगाने निधन झाले.
त्यांच्या निधनाने, निधनाने या चळवळीतील फूट आणि एकीकरण जवळून अनुभवणारा एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. नक्षली चळवळीतील एके काळच्या आदर्शवादाचे प्रतीक लोपले.
संन्यालांचा जन्म आता बांगलादेशात असलेल्या बोग्रा जिल्ह्यात झाला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या त्यांच्या वडिलांनी स्वातंत्र्यलढय़ात सरोजिनी नायडूंसोबत काम केलेले.
संन्याल मात्र राजकारणात कधी रमले नाहीत. उत्कृष्ट फुटबॉलपटू असलेल्या संन्यालांनी युनायटेड बँकेत नोकरी धरली.
१९६०च्या दशकात चारू मुजुमदारांनी दिलेला सशस्त्र क्रांतीचा नारा त्यांना भावला.
देशातील पीडित, गरीब व भूमिहीनांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रांतीशिवाय दुसरा मार्ग नाही या विचाराने प्रेरित झालेले संन्याल नक्षलवादींच्या लढय़ात सामील झाले.
या चळवळीतील नेत्यांमध्ये मतभेद झाल्यावर नारायण संन्याल थेट बिहारमध्ये गेले. तेथे त्यांनी सत्यरंजन सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली जमीनदारांच्या विरोधात भूमिहीनांची सशस्त्र सेना उभारली.
जेहानाबाद व पलामू क्षेत्रातील दुर्गम जंगलात राहून भूमिगत पद्धतीने काम करणाऱ्या संन्यालांनी देशभरातील सर्व क्रांतिकारी गटांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले. त्याला २००४मध्ये यश मिळाले.
पडद्याआड राहून या एकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संन्यालांना भाकप माओवादी या नव्याने स्थापन झालेल्या पक्षात पॉलिट ब्यूरोत स्थान देण्यात आले.
चळवळीच्या विस्तारासाठी कधी बस्तर तर कधी झारखंड असा प्रवास करणाऱ्या या जहाल डाव्या नेत्याला २००५ला झारखंडमध्ये अटक करण्यात आली.
कारागृहात असताना संन्याल यांनी डॉ. विनायक सेन यांना अनेक पत्रे लिहिली होती. याचाच आधार घेत सेन यांनाही नंतर अटक झाली.
२०१४ला प्रकृतीच्या कारणावरून जामीन मिळाल्यानंतर संन्याल दक्षिण कोलकात्याला राहायला गेले.
चळवळीच्या सध्याच्या स्वरूपाबद्दल निराशा प्रकट करणारे संन्याल शेवटपर्यंत चळवळीचा सच्चा कार्यकर्ता म्हणूनच वावरले.
संन्याल यांच्या जाण्यामुळे आता चारू मुजुमदारांसोबत काम केलेले दोघेच चळवळीत उरले आहेत.
त्यापैकी प्रशांता बोस सध्या छत्तीसगडच्या जंगलात भूमिगत आहेत, तर अमिताभ बागची २००९ला अटक झाल्यापासून कोलकात्याच्या तुरुंगात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा