अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे विनोद खन्ना यांचे २७ एप्रिल रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले होते.
१९६८मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.
त्यानंतर अनेक सिनेमात सहायक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
१९७१मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. ‘दयावान’ या सिनेमाने विनोद खन्ना यांना नावलौकीक मिळाले होते.
मेरे अपने, कुर्बानी, पूरब और पश्चिम, रेशमा और शेरा, हाथ की सफाई, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी या सिनेमांमधून त्यांनी आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले.
२०१५मधील ‘दिलवाले’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा ‘एक थी रानी ऐसी भी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता.
यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना सिनेसृष्टीला अलविदा करून आध्यात्मिक गुरू रजनीश (ओशो) यांच्याकडे निघून गेले होते.
१९९७मध्ये विनोद खन्ना राजकारणात सक्रीय होत भाजप पक्षामध्ये दाखल झाले. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील गुरुदासपूरमधून ते खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले.
१९९९ ते २००४ या वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी मंत्रीपदही भूषवले. जुलै २००२मध्ये त्यांची सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रीपदी व त्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री या महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली.
परराष्ट्र राज्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर विनोद खन्ना यांनी भारताचे पाकिस्तान तसेच पॅलेस्टाईनसोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला.
भारत आणि पाकिस्तानमधील बस सेवा करारात त्यांनी दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली होती.
संयुक्त राष्ट्रात दहशतवादाचा मुद्दा प्रभावी मांडण्यासाठी पॅलेस्टाईनचे सहकार्य मिळावे यासाठी विनोद खन्ना यांनी प्रयत्न केले होते.
२००४ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विनोद खन्ना गुरुदासपूरमधून खासदार झाले. पण २००९च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
सिनेसृष्टीत प्रसिद्धी कमावल्यानंतर राजकारणातही यशस्वी झालेल्या काही निवडक व्यक्तींपैकी विनोद खन्ना होते. ते बॉलिवूड इतकेच राजकारणातही यशस्वी ठरले.
सातारा महाराष्ट्रातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा
अवघ्या ११ महिन्यांत ५२ हजार शौचालये पूर्ण करणाऱ्या सातारा जिल्ह्याला महाराष्ट्रातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.
प्रधानमंत्री यांनी अग्रक्रमाने हाती घेतलेल्या हागणदारीमुक्तीच्या चळवळीमध्ये या जिल्ह्यातील सर्वच म्हणजे १,४९० ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.
घर तेथे शौचालय या मुख्य उपक्रमाबरोबरच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच सार्वजनिक ठिकाणची व वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याचे पाणी हे या अभियानातील महत्त्वपूर्ण घटक आहेत.
जून २०१६मध्ये राज्य शासनाने एका वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे आव्हान दिले होते.
सातारा जिल्हा परिषदेने ५२ हजार शौचालये पूर्ण करत अवघ्या ११ महिन्यांतच हे आव्हान समर्थपणे पूर्ण केले आहे.
ग्रामपंचयातींची तपासणी करून त्यांचा दर्जा व पात्रता ठरविण्यासाठी राज्य शासनाने स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या ४६ त्रयस्थ स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती केली होती.
या सर्व संस्थांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची २७ मार्च २०१७ अखेर तपासणी पूर्ण करून राज्य शासनास अहवाल सादर केला.
२४ एप्रिल रोजी या अहवालावरून सातारा जिल्ह्यास महाराष्ट्रातील सर्व प्रथम हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.
चीनच्या पूर्णपणे देशी बनावटीच्या युद्धनौकेचे जलावतरण
चीनने २७ एप्रिल रोजी पूर्णपणे देशी बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे जलावतरण केले.
अशा प्रकारे पूर्णपणे स्वत:च्या ताकदीवर विमानवाहू युद्धनौका बांधणारा चीन हा जगातील सातवा देश ठरला आहे.
‘००१ए’ या प्रकारातील ही विमानवाहू युद्धनौका ५० हजार टनांची आहे. तिचे आरेखन सन २०१३मध्ये व प्रत्यक्ष बांधणी सन २०१५मध्ये सुरु झाली होती.
सागरी चाचण्या पूर्ण झाल्यावर आणि त्यावरील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उपलब्ध झाल्यानंतर ही विमानवाहू युद्धनौका २०२०पूर्वी नौदलाच्या सक्रिय सेवेत दाखल होईल.
२०२०पर्यंत नौदलाचा विस्तार करून युद्धनौका, पाणबुड्या व रसद पुरविणाऱ्या नौका असा एकूण २६५ ते २७३ युद्धनौकांचा बलाढ्य ताफा उभा करण्याची चीनची महत्वाकांक्षी योजना आहे.
या कामगिरीने हा कम्युनिस्ट देश अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि स्पेन या निवडक देशांच्या पंक्तींत पोहोचणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा