उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा विमानतळाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दिनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय, गोरखपूरच्या हवाई तळावर उभारण्यात येणाऱ्या नागरी टर्मिनलला नाथपंथाचे संस्थापक गोरखनाथ यांचे नाव देण्यात येणार आहे.
योगी आदित्यनाथ हे देशातील नाथपंथीयांच्या महत्त्वाच्या केंद्रापैकी एक असणाऱ्या गोरखनाथ मठाचे महंत आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत.
उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखान्यांवर बंदी घालणे, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना अँटी-रोमिओ पथक स्थापन अशा निर्णयांचा यामध्ये समावेश आहे.
योगी आदित्यनथांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये पान मसाला, गुटखा आणि तंबाखुच्या सेवनावर बंदी घातली होती.
औषध खरेदी घोटाळ्यासाठी प्रविण दीक्षित समिती
औषध खरेदीत होणारे घोटाळे टाळण्यासाठी आणि या व्यवस्थेत संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी माजी पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
यापुढे वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व औषध खरेदी या समितीमार्फतच केली जाणार आहे.
या समितीच्या सदस्यपदी मुंबई महानगर रुग्णालयांचे निवृत्त संचालक डॉ. संजय ओक आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे निवृत्त माजी सहाय्यक संचालक डॉ. सुरेश सरवडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालये, संलग्नित रुग्णालये व आरोग्य पथकांकरिता यंत्रसामुग्री, औषधे व शल्योपचार सामुग्री (सर्जीकल साहित्य) खरेदी करण्यासाठी यापुढे ही राज्यस्तरीय खरेदी समिती काम करेल.
या सामुग्री खरेदीसाठीची ई-निविदा प्रक्रिया राबविण्याच्या प्रक्रियेपासून संबंधीत खरेदीचा अंतिम निर्णय घेण्यापर्यंतची सर्व कार्यवाही पार पाडण्याचे अधिकारही याच समितीला देण्यात आले आहेत.
ही राज्यस्तरीय खरेदी समिती नऊ सदस्यांची असेल. ज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक हे सदस्य सचिव असतील.
‘सबका साथ, सबका विकास’ पुस्तक प्रकाशित
‘सबका साथ, सबका विकास’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत झाले.
या पुस्तकात पंतप्रधानांच्या २८ भाषणांचा आणि १४ ‘मन की बात’च्या संवादांचा मराठीत अनुवाद केला आहे.
पुण्याच्या अमेय प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केले असून, आयबीएन-लोकमतचे पत्रकार अजय कौटिकवार आणि अमित मोडक यांनी या पुस्तकाचे संपादन आणि अनुवाद केला आहे.
या पुस्तकात सामाजिक, आर्थिक, राजकीय, प्रशासन, पर्यावरण, शेती अशा विविध विषयांवरची पंतप्रधानांची अभ्यासपूर्ण भाषणे घेण्यात आली आहेत.
८ राज्यांतील पेट्रोलपंप राहणार दर रविवारी बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘इंधन वाचवा’ या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोलियम वितरकांच्या संघटनेने १४ मे पासून ८ राज्यांतील पेट्रोलपंप दर रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, हरयाणा या ८ राज्यांमधील अंदाजे २० हजार पेट्रोल पंप प्रत्येक रविवारी बंद राहतील.
केवळ रुग्णवाहिका आणि आपातकालीन सेवेच्या वाहनांनाच रविवारी पेट्रोल भरून दिले जाईल. त्यासाठी रविवारी पेट्रोल पंपावर एक कर्मचारी उपलब्ध असेल.
ऑस्ट्रेलियातील व्हिसा धोरणांमध्ये बदल
ऑस्ट्रेलियाने बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी१८ एप्रिलपासून व्हिसा नियमात बदल केला असून याचा फटका हजारो भारतीयांना बसणार आहे.
ऑस्ट्रेलियातील व्हिसा ४५७ धोरण हे परदेशी कामगारांमध्ये सर्वात प्रसिद्ध होते. विदेशातील कुशल कामगारांना यामुळे रोजगाराची संधी मिळत होती.
यानुसार कामगारांना ४ वर्षापर्यंत ऑस्ट्रेलियापर्यंत कामानिमित्त राहता येत होते. परंतु आता हा ४५७ व्हिसा रद्द करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया हा निर्वासितांचा देश आहे. पण येथे नोकरीमध्ये स्थानिक तरुणांनाच प्राधान्य मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन कायद्यानुसार महत्त्वाच्या आणि गरजेच्या ठिकाणीच परदेशी कामगारांना संधी दिली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियात भारतीय कामागारांचे प्रमाण सर्वाधिक असून यानंतर ब्रिटन आणि चीनचा क्रमांक लागतो.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान: माल्कम टर्नबुल
तुर्कस्तानची अध्यक्षीय लोकशाहीकडे वाटचाल
तुर्कस्तानात घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये ५१.३७ टक्के मते मिळवून विद्यमान अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगन यांनी देशाच्या राजकारणावरील आपली पकड घट्ट केली आहे.
तुर्कस्तानमधील संसदीय कार्यपद्धतीऐवजी अध्यक्षीय पद्धत लागू करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निकाल आहे.
तुर्कस्तानातील पंतप्रधान पद रद्द करून सर्वांधिकार अध्यक्षांकडे बहाल करण्याच्या बाजूने या सार्वमतामधून नागरिकांनी कौल दिला आहे.
तुर्कस्तानच्या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी या निकालास आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. मतमोजणीमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एर्दोगन हे २००३पासून तुर्कस्तानात सत्तेवर आहेत. त्यांच्या विरोधात मागील वर्षी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न असफल ठरल्यानंतर त्यांनी देशात आणीबाणी लागू केली होती.
एचआयव्हीवर पहिले औषध शोधणारे डॉ. मार्क वेनबर्ग यांचे निधन
ह्य़ूमन इम्युनोडीफिशियन्सी व्हायरस म्हणजे एचआयव्ही विषाणूमुळे होणाऱ्या रोगावर त्यांनी पहिले औषध शोधणारे संशोधक डॉ. मार्क वेनबर्ग यांचे ११ एप्रिल रोजी निधन झाले.
त्यांचा जन्म माँट्रियलमध्ये १९४५ साली झाला. त्यांनी मॅकगिलमधून पदवी घेतली व कोलंबिया विद्यापीठातून रेणवीय जीवशास्त्रात पीएचडी केली.
कॅनडात त्यांनी १९८०च्या सुमारास पहिली एड्स प्रयोगशाळा सुरू केली. त्या वेळी एड्सचे प्रमाण आफ्रिकेत जास्त होते.
मॅकगिल येथे त्यांनी संशोधक म्हणून १९७४मध्ये काम सुरू केले. नंतर ते मॅकगिलच्या एड्स केंद्राचे संचालक होते.
लेडी डेव्हिस इन्स्टिटय़ूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेत ते एड्स संशोधनाचे काम करीत होते.
त्यांनी मॅकग्रॉहिल विद्यापीठात एचआयव्हीवर संशोधन केले. एचआयव्ही विषाणूचा शोध लावणारे डॉ. रॉबर्ट गॅलो यांनी त्यांना ‘ते’ विषाणू संशोधनासाठी दिले होते.
त्यातून त्यांनी १९८९मध्ये ‘३ टीसी’ हे औषध तयार केले, ते एड्सवर गुणकारी ठरले. एड्सचे प्रमाण शून्यावर आले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती.
एचआयव्ही रुग्णांना समानाधिकार व या रोगाविरोधातील औषधोपचार या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी धैर्याने व मेहनतीने काम केले.
समलिंगी लोकांना मानवी समाजात मिळणारी वाईट वागणूक त्यांना अमान्य होती. त्यामुळे एलजीबीटी समुदायालाही त्यांनी पाठबळ दिले.
वेनबर्ग यांना २००१ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. २०१५मध्ये कॅनेडियन मेडिकल हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश झाला. फ्रान्सचा ‘शवालिए द लिजन’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा