केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०१६मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत नंदिनी केआर हिने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
तर विश्वांजली गायकवाड महाराष्ट्रातून प्रथम आली असून, देशात तिने अकरावा क्रमांक पटकावला आहे.
या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकावर अनमोल शेर सिंह बेदी आणि तिसऱ्या क्रमांकावर गोपालकृष्ण रोनंकी आला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विविध पदासांठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत १०९९ उमेदवारांना यश मिळाले आहे.
बालचित्रवाणीच्या ऐवजी आता ई-बालभारती
लहान मुलांचे दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रम बनवण्यासाठी कार्यरत असलेली राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी) बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे.
बालचित्रवाणीच्या ऐवजी आता ई-बालभारती या नवीन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी सरकारने २७ जानेवारी १९८४ रोजी बालचित्रवाणीची स्थापना केली.
बालचित्रवाणीकडून आतापर्यंत ६ हजार दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे.
दूरदर्शनवर दररोज बालचित्रवाणीचे कार्यक्रम दाखविण्यात येत होते. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.
पुण्यामध्ये राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाजवळ बालचित्रवाणीचे प्रशस्त कार्यालय आहे.
बालचित्रवाणीची सर्व स्थावर, जंगम मालमत्ता संस्थेच्या रेकॉर्डसह बालभारती या संस्थेकडे वर्ग करण्यात येणार आहे.
याठिकाणी लवकरच ई-बालभारती या नवीन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बालचित्रवाणी संस्थेमार्फत दूरदर्शनवरून १९८६ ते २०१२ या कालावधीमध्ये नि:शुल्क कार्यक्रम प्रक्षेपित केले जात होते.
मात्र दूरदर्शनने हे कार्यक्रम दाखविण्यासाठी प्रक्षेपण शुल्क आकारल्यामुळे फेब्रुवारी २०१४पासून प्रक्षेपण बंद करण्यात आले.
संस्थेला केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदानही एप्रिल २००३नंतर बंद झाले. त्यामुळे ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली होती.
औद्योगिक कलह कायद्यानुसार ५० पेक्षा कमी कामगार असणारी संस्था आर्थिक विवंचनेत सापडल्यास बंद करता येते. त्यानुसार ही संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रात ‘दरवाजा बंद’ अभियान
संपूर्ण महाराष्ट्र मार्च २०१८ सालापर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी ‘दरवाजा बंद’ अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० मे रोजी केला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पेयजल व स्वच्छता मंत्रालय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी २०१८पर्यंत सर्व शहरे हागणदारीमुक्त होतील, असे प्रतिपादन केले.
आजपर्यंत राज्यातील २५० पैकी २०० शहरे हागणदारीमुक्त झालेली आहेत. मार्च २०१८पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त केले जाईल.
तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, ठाणे, भंडारा, पुणे, नागपूर, वर्धा आणि गोंदिया हे ११ जिल्हे संपूर्णत: हागणदारीमुक्त झालेले आहेत.
प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक दसरी नारायण राव यांचे निधन
प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक आणि यूपीएच्या सरकारमधील माजी कोळसा राज्यमंत्री दसरी नारायण राव यांचे ३० मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दसरी यांनी साधारणपणे १२५ सिनेमांचे दिग्दर्शन केले. यासाठी त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही समाविष्ट करण्यात आले होते.
त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांपैकी प्रेमाभिषेकम, मेघा संदेशाम, ओसे रामुलामा आणि टाटा मनावदु हे चित्रपट पडद्यावर खूप गाजले होते.
तसेच, चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आत्मचरित्र बनवण्याची घोषणा त्यांनी केली होती.
यूपीए सरकारच्या कार्यकाळात ते केंद्रीय मंत्री होते. ते कोळसा मंत्रालयात राज्यमंत्री होते. कोळसा घोटाळा प्रकरणात त्यांच्या नावाचाही समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ३० मे रोजी जर्मनीत झालेल्या भारत-जर्मनी शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
जर्मनी येथे आयोजित कऱण्यात आलेली ही चौथी परिषद होती. यावेळी त्यांच्यासोबत जर्मनीच्या चॅन्सेलर अॅंजेला मर्केल याही उपस्थित होत्या.
उभय देशांमध्ये प्रत्येक दोन वर्षांनी होणाऱ्या या परिषदेत मोदी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांसोबत उपस्थित होते. याआधीची परिषद दिल्लीमध्ये २०१५ साली पार पडली होती.
या परिषदेमध्ये भारत-जर्मनी यांच्यात विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी आठ करार करण्यात आले.
त्यात सायबर गुन्हेगारी, शाश्वत शहर विकास, कौशल्य विकास, रेल्वे सुरक्षा यांचा समावेश आहे. शाश्वत विकासासाठी भारत-जर्मन केंद्राची स्थापनाही केली जाणार आहे.
जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याशी मोदी यांनी व्यापार, कौशल्य विकास, सायबर सुरक्षा व दहशतवाद अशा अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली.
युरोपीय समुदायात जर्मनी हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. भारतात जर्मनीच्या १६०० कंपन्या असून ६०० संयुक्त प्रकल्प आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने ही परिषद महत्त्वाची आहे.
बांगलादेशमध्ये ‘मोरा’ चक्रीवादळ
‘मोरा’ चक्रीवादळाने ३० मे रोजी बांगलादेशच्या किनाऱ्याला धडक दिली असून, किनारपट्टीवर गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
या वादळामुळे प्रतितास ११७ किमी वेगाने वारे वाहत आहेत. नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या वादळाचा परिणाम म्हणून ईशान्य भारतातही जोरदार पाऊस पडत आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावर या वादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे चक्रीवादळ तयार झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या चक्रीवादळामुळे भारतातील मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.
हिंदी महासागरातील सागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर परस्परांना सहकार्य करण्यावर भारत आणि मॉरिशस यांच्यामध्ये करार करण्यात आला आहे.
या अनुषंगाने भारत सरकार मॉरिशसला ५० कोटी अमेरिकी डॉलर्सचे आर्थिक सहाय्य करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्यामध्ये दोन्ही देशांमधील नागरिकांची सुरक्षा आणि आर्थिक संधींची उपलब्धता या विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
दोन्ही देशांमधील सागरी सुरक्षेसंदर्भातील करारामुळे सहकार्य आणि क्षमतांचा विकास होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युरोप दौऱ्याला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ मेपासून युरोप दौऱ्याला सुरुवात केली असून ते या दौऱ्यामध्ये मोदी जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या ४ देशांना भेट देणार आहेत.
या दौऱ्यामध्ये ते अर्थिक, सुरक्षा, विज्ञान, उद्योगधंदे आणि आण्विक क्षेत्राबाबत संबंधित देशांतील वरिष्ठांशी चर्चा कऱणार आहेत.
याबरोबरच युरोपीय देश आणि भारत यांच्यात मुक्त व्यापाराचा करार, दहशतवादविरोधी लढाई हे विषयही चर्चेचा मुख्य अजेंडा असतील.
या दौऱ्यादरम्यान रशियामध्ये होणाऱ्या वार्षिक व्दिपक्षीय शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर फ्रान्सला जाऊन तेथील नवनिर्वाचित राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतील.
शिवाय, जर्मनी येथे होत असलेल्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) या परिषदेमध्येही ते सहभागी होणार आहेत.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर स्पेनचा दौरा करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असणार आहेत. सन १९८८मध्ये राजीव गांधी यांनी स्पेनचा दौरा केला होता.
ब्रिटिश हवाई दलाकडून आयसिसच्या तळांवर बॉम्बफेक
मँचेस्टर अरेनामधील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून ब्रिटिश हवाई दलाच्या विमानांनी आयसिसच्या तळांवर बॉम्बफेक सुरु केली आहे.
‘लव फ्रॉम मँचेस्टर’ असा संदेश लिहिलेले बॉम्ब ब्रिटिश सरकारच्या रॉयल एअर फोर्सकडून टाकण्यात आयसिसवर टाकण्यात आले आहेत.
आत्मघातकी हल्लेखोर सलमान अबेदीने मँचेस्टरमधील अरियाना ग्रँडेच्या कॉन्सर्टदरम्यान घातपाती हल्ला केला होता.
मागील आठवड्यात करण्यात आलेल्या या हल्ल्यात २२ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ११९ लोक जखमी झाले होते.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेकडून जपानवर टाकण्यात आलेल्या बॉम्बवरदेखील अशाच प्रकारे संदेश लिहिण्यात आला होता.
कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘संपदा’ कृषी योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे रोजी केले.
पंतप्रधानांच्या हस्ते आसाममधील धेमजी जिल्ह्यात पहिल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी संपदा योजनेची घोषणा केली.
‘स्कीम फॉर अॅग्रो मरीन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ अॅग्रो प्रोसेसिंग’ असे ‘संपदा’ योजनेचे पूर्ण रूप आहे.
केंद्र सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, शेतमालाला अधिकाधिक उठाव मिळावा तसेच शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळावी यासाठी ‘संपदा’ योजना आखण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून अन्नप्रक्रिया उद्योगाचा विकास होण्यास मदत होईल आणि त्या माध्यमातून तरुणांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध होतील.
या योजनेसाठी केंद्रातर्फे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कालांतराने त्यात परकीय गुंतवणुकीच्या सहाय्याने पतपुरवठा केला जाणार आहे.
शेतमालावर प्रक्रिया करून बाजारपेठेत पाठवणे तसेच कृषी-सागरी प्रक्रियेला उत्तेजन देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.
२०२२पर्यंत देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरेल
पर्यावरण मंत्रालयाने संपूर्ण देशातील पशू बाजारात जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने होण्याऱ्या खरेदी विक्रीवर बंदी आणली आहे.
नव्या नियमानुसार गुरांची खरेदी करणाऱ्यांना आता एक घोषणापत्रही द्यावे लागणार आहे, या पत्राद्वारे विक्री होणाऱ्या जनावरांची कत्तल केली जाणार नाही, अशी निश्चित हमी त्यांना द्यावी लागणार आहे.
प्राण्यांबरोबरची क्रूरता रोखण्याच्या उद्देशाने ही नवी अधिसूचना काढण्यात आली आहे. गाय, बैल, म्हैस, रेडा, कालवड, बछडे आणि उंट या प्राण्यांना हे नियम लागू असतील.
या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. गरीब शेतकऱ्यांसहीत कत्तलखाना उद्योगालाही या नियमाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
गुरांची खरेदी-विक्री आता शेतकऱ्यांपुरती मर्यादित ठेवण्यात आली असून, गुरांची विक्री किंवा खरेदी करणाऱ्यांना आपण शेतकरी असल्याचे पुरावे व्यवहारावेळी सादर करावे लागणार आहेत.
या नियमात बकरा आणि मेंढ्या या प्राण्यांचा समावेश करण्यात आलेला नाही, या प्राण्यांचा बळी देण्याची काही धर्मांमध्ये प्रथा आहे.
याशिवाय देशातील प्रत्येक जिल्ह्यात पशू बाजार समितीची स्थापना करण्यात येणार असून, सध्याच्या अस्तित्वात असलेल्या प्रत्येक पशू बाजाराला तिथे आपली नोंदणी करावी लागेल.
सुखदेव थोरात यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
दुर्बल घटकांच्या विकासासाठी केलेल्या भरीव कार्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अमरावतीतील महिमापूर गावचे सुखदेव थोरात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
थोरात हे कृषी अर्थशास्त्र, विकास, दारिद्रय, कामगार, जात आणि आर्थिक तफावत तसेच अनुसूचित जाती आणि जमातींच्या आर्थिक समस्या या विषयाचे गाढे अभ्यासक आहेत.
‘इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च’ संस्थेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी संशोधनाचे विपुल कार्य केलेले आहे.
पंजाब-जालंधर येथील मानवतावादी रचना मंचने त्यांना डॉ. आंबेडकर चेतना पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
त्यांनी आतापर्यंत अनेक प्रबंध आणि पुस्तके लिहिलेली आहेत. प्रा. थोरात यांना २००८साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
नागपूर उच्च न्यायालयाची इमारत आता राष्ट्रीय स्मारक
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या ऐतिहासिक इमारतीचा समावेश राष्ट्रीय स्मारकांमध्ये करण्यात आला आहे.
सुमारे ८० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीचा ‘पाषाणातील कविता’ असा गौरव केला जातो.
नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी असताना ब्रिटिशांनी नागपूरला स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना केली.
या इमारतीचे भूमिपूजन ९ जानेवारी १९३६ रोजी मध्य प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर हाईड क्लॅरेडन ग्रोव्हन यांच्या हस्ते करण्यात आले.
१८,२२८ चौरस फूट परिसरात उभारलेली ही संपूर्ण इमारत दगडी असून, त्यावरील स्तुपासह प्रवेशद्वार, पायऱ्या व इतर साराच भाग या इमारतीची भव्यता दाखवून देतो.
ही देखणी इमारत कालौघात जुनी झाल्याने तिच्या संरक्षणासाठी भारतीय पुरातत्त्व कायद्यानुसार (१९५८) उपाययोजना करण्यात आली.
आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या सुमारे ९.१५ किमी लांबीच्या धोला-सादिया पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ मे रोजी झाले.
भविष्यात ईशान्य भारताचा र्सवकष विकास सांधणारा हा सेतू पंतप्रधानांनी देशाला अर्पण करताना या पुलाला प्रख्यात आसामी गायक भूपेन हजारिका यांचे नाव देण्याची घोषणा केली.
या पुलामुळे ईशान्येकडील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल आसाम व तिथून पुढे देशभर पाठविण्यास मदत होणार आहे.
सुपरकॉप केपीएस गिल यांचे निधन
‘सुपरकॉप’, ‘पंजाबचा शेर’ अशी ओळख असलेले पंजाबचे माजी पोलीस महासंचालक कंवरपाल सिंह गिल ऊर्फ केपीएस गिल यांचे २६ मे रोजी दिल्लीत निधन झाले.
गिल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तसेच त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गिल तेवीसाव्या वर्षी भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. सुरुवातीला त्यांची नियुक्ती ईशान्य भारतात करण्यात आली.
आपल्या कार्यपद्धतीने आसाम-मेघालयातही दरारा निर्माण केला. त्यांनी आसामचे पोलीस महानिरीक्षक पदही भूषविले.
पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांचा निपटारा करण्यात गिल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे ते ‘सुपरकॉप’ नावाने ओळखले जाऊ लागले.
१९८८मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात दडून बसलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी राबविलेल्या ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’चे नेतृत्त्व गिल यांनी केले होते.
१९८८ ते १९९० दरम्यान पंजाब पोलीस महासंचालक म्हणून सेवा बजावल्यानंतर १९९१मध्ये त्यांची पुन्हा पंजाबच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
निवृत्तीनंतर छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गिल भारतीय हॉकी संघाचे माजी अध्यक्षसुद्धा होते.
प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल १९८९मध्ये केपीएस गिल यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
यूएनएफसीसीसीच्या उपकार्यकारी सचिवपदी ओवैस सरमद
मूळचे भारतीय, पण लंडनमध्ये राहणारे ओवैस सरमद यांची नियुक्ती आता युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी)चे उपकार्यकारी सचिव या पदावर झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अॅण्टोनियो गेटरस यांनी विविध देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सरमद यांची नियुक्ती केली.
वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार अशी ओळख असलेल्या सरमद हे मूळचे हैदराबादचे असून, त्यांचा जन्म १९६०साली झाला.
स्थानिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी बीकॉम पदवी मिळवली.
नंतर ते लंडनला गेले व तेथील चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटंट्स या विख्यात संस्थेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली.
नंतर सरकारी आणि खासगी क्षेत्रांत वित्तीय व्यवस्थापनातील विविध पदांवर त्यांनी काम केले. १९९०मध्ये स्थलांतरितांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेत ते रुजू झाले.
सुरुवातीची काही वर्षे ते या संघटनेच्या अर्थसंकल्प विभागात होते. कालांतराने ते या विभागाचे प्रमुख बनले.
संघटनेच्या व्यवस्थापनाबरोबरच संघटनेची धोरणे निश्चित करण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
संघटनेचे काम वाढवण्याबरोबरच संघटनेतील सदस्यांसाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्याचे मोठे काम त्यांनी केले.
ही संघटना संयुक्त राष्ट्रांच्या कामाशी निगडित राहावी, यासाठी नेमलेल्या समितीचे ते सदस्य होते.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी गयारुल हसन
गेले दोन महिने एकही सदस्य नसलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगावर केंद्र सरकारने अखेर अध्यक्षासह पाच सदस्यांची नियुक्ती केली आहे.
उत्तर प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते गयारुल हसन यांना आयोगाचे अध्यक्ष नेमण्यात आले आहे.
आयोगावर नियुक्त इतर सदस्य:-
केरळमधील भाजपा नेते जॉर्ज कुरियन
महाराष्ट्राच्या माजी मंत्री सुलेखा कुंभारे
जैन समाजाचे गुजरातमधील प्रतिनिधी सुनील सिंघी
उदवाडा अथोर्नान अंजुमनचे मुख्य पुरोहित वडा दस्तुरजी खुर्शेद
जैन समाजाला सन २०१४मध्ये अल्पसंख्य दर्जा मिळाल्यानंतर या समाजाचा प्रतिनिधी प्रथमच या राष्ट्रीय आयोगावर नेमला गेला आहे.
आयोगाचे आणखी दोन सदस्य येत्या दोन दिवसांत नेमले जातील, असेही सूत्रांनी सांगितले.
मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराट्रियन आणि जैन या धार्मिक अस्पसंख्य समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हा आयोग काम करतो.
या राष्ट्रीय आयोगाखेरीज जेथे अल्पसंख्य समाजाची लक्षणीय लोकसंख्या आहे अशा महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये राज्यस्तरीय अल्पसंख्य आयोगही कार्यरत आहेत.
आजवर आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायाधीश किंवा ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी नेमण्याची प्रथा होती.
यावेळी प्रथमच अध्यक्षांसह सर्व सदस्य सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांमधून नेमण्यात आले आहेत.
महाराष्ट्राची आदर्श अंगणवाडी योजना
राज्य सरकारने अंगणवाडीमधील शिक्षण आनंददायी व्हावे तसेच तेथील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी ‘आदर्श अंगणवाडी योजना’ आखली आहे.
शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्याद्वारे ही योजना राबविण्यात येईल. यासाठी सुमारे ८५ कोटी रुपये खर्च खर्च अपेक्षित आहे.
या योजनेंतर्गत पहिल्या वर्षी ५ हजार अंगणवाड्या आदर्श करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
‘आदर्श अंगणवाडी’मध्ये सौरऊर्जा संच, ई-लर्निंग, मुलांसाठी टेबल-खुर्च्या, शैक्षणिक साहित्य, स्वच्छ भारत कीट, वीजविरहित वॉटर प्युरिफायर, इलेक्ट्रॉनिक वजन-काटे, उंची मोजण्यासाठीच्या टेप हे साहित्य असेल. तसेच अंगणवाडीची इमारत शैक्षणिक मदत केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल.
या सर्व सेवा पुरविण्यासाठी एका अंगणवाडीला १.६५ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यानुसार ५००० अंगणवाड्यांसाठी ८४.५० कोटी रुपये खर्च येणार आहे.
त्यासाठी राज्यातील ६८ हजार स्वत:च्या इमारती असलेल्या अंगणवाड्यांची प्राधान्याने निवड करण्यात येणार आहे.
६ महसूल विभागांत ५ हजार अंगणवाड्या आदर्श करताना प्रत्येक महसूल विभागात ८३३ तर प्रत्येक जिल्ह्यात १४४ अंगणवाड्या आदर्श केल्या जातील.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे या योजनेचे सनियंत्रण राहणार आहे.
यासाठी सनियंत्रण, मार्गदर्शनासाठी सुकाणू समिती व अंमलबजावणीसाठी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या आदर्श अंगणवाड्यांना अनुक्रमे ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये बक्षीस दिले जाईल.
तर राज्यातील पहिल्या तीन आदर्श अंगणवाड्यांना १ लाख, ६५ हजार व ३५ हजार याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील.
घनदाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानी
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने जगातील दहा घनदाट लोकवस्तीच्या शहरांची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये मुंबई शहर जगात दुसऱ्या स्थानावर आहे.
या यादीमध्ये राजस्थानातील कोटा शहरानेही स्थान मिळविले असून, कोटा शहर घनदाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये सातव्या स्थानावर आहे.
या यादीमध्ये बांगलादेशातील ढाका शहर पहिल्या स्थानावर आहे. ढाक्यामध्ये प्रतिचौरस किलोमीटरवर सरासरी ४४,५०० नागरीक वास्तव्य करतात.
मुंबईत प्रतिचौरस किलोमीटरवर सरासरी ३१,७०० लोक राहतात. तर कोटामध्ये प्रतिचौरस किलोमीटरवर सरासरी १२,१०० लोक वास्तव्य करतात.
या यादीत मेडीलीन तिसऱ्या, मनिला चौथ्या, कासाब्लानका पाचव्या, लागोस सहाव्या, अबुजा आठव्या, सिंगापूर नवव्या आणि जकार्ता दहाव्या स्थानावर आहे.
जगातील घनदाट लोकवस्तीची सहा शहरे आशिया खंडात, तीन आफ्रिका खंडात आणि एक दक्षिण अमेरिकेत आहे.
‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ला सिडने शांतता पुरस्कार
मानवी हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या चळवळीला २०१७ या वर्षासाठीचा सिडने शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.
जागतिक शांततेसाठी झटणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना गेल्या सुमारे दोन दशकांपासून हा पुरस्कार देण्यात येत आहे.
यापूर्वी तत्त्वज्ञ नॉम चॉम्स्की, आर्चबिशप डेस्मण्ड टुटू, गरिबांसाठी ग्रामीण बँक सुरू करणारे प्रा. मोहम्मद यूनुस आदी मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ ही मानवी हक्कांसाठी लढणारी चळवळ पॅट्रिस क्युलर्स, ॲलिशिया गार्झा आणि ओपल तोमेती या अमेरिकेतील ३ तरुणींनी सुरू केली.
‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ अशा हॅशटॅगचा वापर प्रथम गार्झा यांनी फेसबुकपोस्टद्वारे केला. वर्णविद्वेष आणि पोलिसी हिंसाचाराविरोधात तिने सुरू केलेल्या मोहिमेला अमेरिकेसह जगभरातून पाठिंबा मिळाला.
सामाजिक विषमता, कृष्णवर्णीयांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, पोलीस कोठडीत त्यांच्यावर होणारे अनन्वित अत्याचार या विरोधात ठिकठिकाणी त्यांनी जनजागृतीचे काम सुरू केले.
जगभरातील तरुणाई या चळवळीशी जोडली गेली. वर्णद्वेषातून कुणावरही अन्याय होत असल्यास या चळवळीतील कार्यकर्ते सनदशीर मार्गाने आंदोलन करतात.
२०१४मध्ये मायकेल ब्राऊन आणि एरिक गार्नर या दोन कृष्णवर्णीयांची अनुक्रमे फर्गसन आणि न्यूयॉर्क येथे हत्या झाली तेव्हा हा मुद्दा या चळवळीने हाती घेतला.
परिणामी, फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरातील माध्यमांनी अमेरिकी पोलिसांच्या दादागिरीवर तेव्हा प्रहार केला.
गार्झा, पॅट्रिस आणि ओपल या तिघी जणींना आणि त्यांच्या चळवळीला आज जगभरात मान्यता मिळाली आहे.
रविचंद्रन अश्विनला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कार
भारताचा अष्टपैलू फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला सीएट क्रिकेट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने (२०१७) गौरविण्यात आले आहे.
भेदक फिरकी आणि निर्णायक फलंदाजी अशा अष्टपैलू खेळाच्या जोरावर आश्विनने भारताच्या अनेक विजयांत मोलाचे योगदान दिले आहे.
याशिवाय युवा फलंदाज शुभम गिलला वर्षांतील सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. मुंबईत झालेल्या भारत-इंग्लंड युवा संघांमधील सामन्यांत शुभमने लक्षवेधी कामगिरी केली होती.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. ६२ वर्षीय दहल हे नेपाळचे ३९वे पंतप्रधान होते.
सत्तेत सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसला पंतप्रधानपदावर संधी मिळावी यासाठी दहल यांनी राजीनामा दिला.
नेपाळी काँग्रेस तसेच मधेशी पक्षांनी दहल यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिल्याने ऑगस्ट २०१६मध्ये दहल पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
त्यांना नेपाळी काँग्रेसने सशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यासाठी झालेल्या करारानुसार २०१८पर्यंत दोन्ही पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधानपदावर संधी दिली जाणार होती.
प्रचंड हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते. यापूर्वी २००८साली प्रचंड हे अल्प काळासाठी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
२००९मध्ये तत्कालीन सेनाप्रमुखांना बरखास्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या मुद्द्यावरून लष्कराशी त्यांचे तीव्र मतभेद झाल्याने त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते.
प्रचंड यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देउबा यांचा पतंप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नेपाळच्या राष्ट्रपती: विद्यादेवी भंडारी
बांगलादेशी शिल्पकार सय्यद अब्दुल्ला खालिद यांचे निधन
१९७१च्या बांगलादेश मुक्तिलढय़ाची आठवण असणारे स्मारकशिल्प‘अपराजेय बांगला’ घडविणारे शिल्पकार सय्यद अब्दुल्ला खालिद यांचे २० मे रोजी निधन झाले.
१९४२ साली जन्मलेल्या खालिद यांनी तेव्हाच्या ‘ईस्ट पाकिस्तान कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड क्राफ्ट्स’ (आता ढाका विद्यापीठाचा दृश्यकला विभाग)मधून १९६९साली पदवी मिळवली.
बांगलादेश निर्मितीनंतर त्यांनी चित्तगाव येथील कला महाविद्यालयात अध्यापकाची नोकरी मिळवली.
मुक्तिलढय़ाच्या स्मारकशिल्पासाठी विद्यापीठाने सन १९७३मध्ये खुल्या स्पर्धेद्वारे प्रस्ताव मागवले. त्यातून खालिद यांची संकल्पना निवडली गेली.
‘मधोमध उंचापुरा ग्रामीण बांगला तरुण- त्याच्या खांद्यावर तीरकामठा, त्याच्या डाव्या बाजूला बंदूकधारी आणि शहरी कपडय़ांतला तरुण, तर उजव्या बाजूला निर्धाराने या दोघांसह चालणारी एक स्त्री आणि तिच्या खांद्यावर प्रथमोपचार पेटी.’ अशी या शिल्पाची संकल्पना होती.
१९७९मध्ये या स्मारकाचे अनावरण झाले. १९९१मध्ये या शिल्पाचे टपाल तिकीट आणि १९९८मध्ये चांदीचे स्मृतिनाणे काढून बांगलादेश सरकारने ‘अपराजेय बांगला’ अजरामर केले.
या शिल्पानंतर खालिद देशभर पोहोचले. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. २०१७मध्ये त्यांना ‘इकुशे पदक’ या राष्ट्रीय सन्मानाने गौरवण्यात आले.
तैवानमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता
तैवान या देशामध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. अशी मान्यता देणारा आशिया खंडातील तैवान हा पहिलाच देश आहे.
या न्यायलयीन प्रकरणासाठी तैवानमध्ये १४ जणांच्या वरिष्ठ न्यायाधीशांचे पॅनेल नियुक्त करण्यात आले होते, त्यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
या निर्णयामुळे भिन्नलिंगी व्यक्तींना विवाहासाठी असणारे सर्व अधिकार समलैंगिक व्यक्तींना मिळणार असल्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
२०१०मध्ये अर्जेंटिनामध्ये पहिल्यांदा हा कायदा लागू झाला आणि त्याठिकाणी एका समलैंगिक जोडप्याने विवाह केला होता.
त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्येही याबाबतचा कायदा २०१३मध्ये करण्यात आला होता. मात्र काही कारणाने तो अवघ्या ५ दिवसांत रद्द करण्यात आला होता.
नासाच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अंतराळवीरांना आढळलेल्या एका नव्या जीवाणूला प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे.
अवकाश संशोधनातील कार्यासाठी ओळखले जाणारे कलाम यांच्या नावावरून ‘सोलिबॅसिलस कलामी’ असे या जीवाणूचे नामकरण करण्यात आले आहे.
कलाम यांनी आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभी १९६३मध्ये ‘नासा’मध्ये प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर केरळमधील थुंबा या लहानशा गावात त्यांनी भारतातील पहिली रॉकेट प्रक्षेपण यंत्रणा उभारली.
हा जीवाणू पृथ्वीबाहेरील नसून, तो सामानासोबत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर आला असावा आणि प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहिला, असा अंदाज आहे.
जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारणारे रॉजर मूर यांचे निधन
सात वेळा जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रॉजर मूर (वय ८९ वर्षे) यांचे कर्करोगाने २३ मे रोजी स्वित्झर्लंड येथे निधन झाले.
रॉजर यांनी ‘दि स्पाय हू लव्ह मी’ आणि ‘लिव अॅण्ड लेट डाय’ अशा सात सुपरहिट बॉण्ड सिनेमांमध्ये काम केले होते.
ते बॉण्ड ही व्यक्तिरेखा साकारणारे तिसरे अभिनेते आहेत. त्यांनी १९७३पासून १९८५ पर्यंत जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारली होती.
रॉजर मूर यांनी जेम्स बॉण्ड सिनेमांशिवाय ‘दि सेंट’ या टीव्ही मालिकेमध्ये सायमन टेंपलर व्यक्तिरेखा साकारली होती.
त्यांना अभियन क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांना सामाजिक कार्यासाठी ‘नाईटहुड’ची उपाधी देण्यात आली होती.
ब्रिटनमध्ये आयसिसचा आत्मघाती हल्ला
ब्रिटनमधील मँचेस्टर एरिना येथे २२ मे रोजी पॉप गायिका अरियाना ग्रँडच्या कॉन्सर्टदरम्यान झालेल्या दोन स्फोटात सुमारे २२ जण ठार तर ५९हून अधिक जण जखमी झाले.
मँचेस्टर एरिना युरोपमधील सर्वात मोठे इनडोअर सभागृह आहे. १९९५पासून येथे मोठमोठे कॉन्सर्ट आणि खेळांचे आयोजन केले जाते.
ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी अरियाना गाणे सादर करत होती. अरियानाच्या प्रवक्त्याने ती सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.
या स्फोटामुळे ब्रिटनमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मँचेस्टर एरिना जवळील रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले असून सर्व रेल्वेही रद्द करण्यात आले आहेत.
या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे. याप्रकरणी ब्रिटन पोलिसांनी एका संशयितालाही अटक केली आहे.
७ जुलै २००५ रोजी लंडनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतरचा हा ब्रिटनमधील सर्वात मोठा हल्ला आहे.
रोम मास्टर्स टेनिस स्पर्धा २०१७
जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याने रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव करत स्पर्धेचे जेतेपद मिळविले.
झ्वेरेवचे हे ‘मास्टर्स १०००’चे पहिलेच विजेतेपद आहे. मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद कमी वयात पटकावणारा २० वर्षीय झ्वेरेव जोकोविच नंतर पहिलाच खेळाडू आहे. जोकोविचने १९व्या वर्षी पहिले मास्टर्स जेतेपद मिळविले होते.
या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाने रोमानियाच्या सिमोना हॅलेपला पराभूत करत विजेतेपद मिळविले.
एलिनाचे हे मोसमातील चौथे विजेतेपद ठरले आहे. या मोसमात एलिनाने तैवान ओपन, दुबई चॅम्पियनशिप, इस्तंबुल कप आणि आता रोम स्पर्धा जिंकल्या आहेत.
बहुप्रतिक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘तेजस’ रेल्वे अखेर २२ मेपासून मुंबई-गोवा मार्गावर धावणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या रेल्वेचे लोकार्पण होणार असून, या एक्स्प्रेसमुळे मुंबई ते गोवा हे अंतर केवळ साडेआठ तासांत गाठता येणार आहे.
ताशी १३० किलोमीटर वेगाने धावणारी तेजस ही देशातील पहिली रेल्वे आहे. रेल्वेचा प्रवास जास्तीत जास्त सुकर व्हावा, यादृष्टीने तेजस बनविण्यात आली आहे.
तेजसच्या माध्यमातून रेल्वेपेक्षा विमान प्रवासाला प्राधान्य देणाऱ्या प्रवाशांना आकर्षित कऱण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे.
२० डब्यांची ही रेल्वे पूर्णपणे वातानुकुलित आहे. चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह अशा दोन प्रकारांत सेवा दिली जाणार आहे.
आता मुंबई-गोवा या मार्गावर धावणारी ही रेल्वे पुढील काळात दिल्ली-चंदिगड आणि दिल्ली-लखनौ या मार्गावरही धावेल.
एरवी आठवड्यातील पाच दिवस धावणारी ही एक्स्प्रेस पावसाळ्यादरम्यान मात्र आठवड्यातील ३ दिवस धावणार आहे.
‘तेजस’मधील सुविधा
एसीसह आरामदायी बैठक व्यवस्था
प्रत्येक प्रवाशाच्या समोर एलईडी टीव्ही.
वायफाय सुविधा.
चहा आणि कॉफीचे वेंडिंग मशीन तसेच अल्पोपहाराची सुविधा.
सीसीटीव्ही, स्वयंचलित दरवाजे अशा अत्याधुनिक सुविधा.
अंध व्यक्ती ब्रेलच्या साह्याने सेवा वापरू शकतील अशी विशेष सुविधा.
अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज स्वच्छतागृहे.
हवा खेळती रहावी यासाठीची यंत्रणा
आगप्रतिबंधक यंत्रणा.
प्रवासादरम्यान मार्ग दाखविणारी जीपीएस सिस्टीम.
मुंबई इंडियन्सला आयपीएलचे विजेतेपद
मुंबई इंडियन्स संघाने रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघावर एका धावेने रोमांचक विजय मिळवत तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले.
हैदराबादमध्ये रंगलेल्या या आयपीएलच्या दहाव्या पर्वाच्या अंतिम सामन्यात मुंबईने अखेरच्या षटकामध्ये विजय खेचून आणला.
मुंबई इंडियन्सला पुण्याने २० षटकांमध्ये ८ बाद १२९ धावांत रोखले होती. त्याच्या प्रत्युत्तरात पुणे संघाला १२८ धावांपर्यंतच मजल मारता आली.
संघाचे संतुलन ठेवणारा अष्टपैलु कृणाल पांड्याने याने ४७ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या योगदानामुळेच मुंबईला १२९ धावा करता आल्या.
आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपद पटकाविणारा मुंबई इंडियन्स पहिलाच संघ ठरला आहे. याआधी मुंबईने २०१३ आणि २०१५चे विजेतेपद पटकावले होते.
मुंबईनंतर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) या संघांनी प्रत्येकी २ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
इतर पुरस्कार:-
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) - डेव्हिड वॉर्नर (सनराजयर्स हैदराबाद)
पर्पल कॅप (सर्वाधिक बळी) - भुवनेश्वर कुमार (सनराजयर्स हैदराबाद)
एकाच संघातील खेळाडूंनी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप पटकावण्याचा विक्रम या सत्रात झाला आहे. याआधी २०१३मध्ये सीएसकेच्या माईक हसी आणि ड्वेन ब्राव्हो यांनी अशी कामगिरी केली होती.
कोळसा घोटाळ्याप्रकरणी एच सी गुप्ता यांना २ वर्षाचा तुरुंगवास
कोळसा घोटाळ्याप्रकरणी कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्ता यांच्यासह आणखी दोन जणांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
शिक्षा सुनावताच गुप्ता यांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील रुद्रपूरमध्ये केएसएसपीएल कोळसा खाणीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एच सी गुप्ता यांच्यासह दोन अधिकाऱ्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते.
यूपीए सरकारच्या काळात गुप्ता हे दोन वर्ष सचिव म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी ४० कोळसा खाणींचे वाटप केले होते.
मध्य प्रदेशातील थेसगोरा बी व रुद्रपुर खाणी केएसएसपीएलला वाटप करताना गैरप्रकार केल्याच्या आरोप गुप्तांवर होता.
गुप्तांसह कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन सहसचिव के एस कोफ्रा व संचालक के सी सामरिया यांनाही २ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याशिवाय केएसएसपीएल व त्याचे व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार अहलुवालिया यांनाही दोषी ठरवले होते.
गुप्ता यांनी निर्णय घेताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही अंधारात ठेवल्याचा दावा केला गेला होता.
पूर्णिमादेवी बर्मन आणि संजय गुब्बी यांना व्हिटले पुरस्कार
आसामच्या पक्षी संवर्धन कार्यकर्त्यां पूर्णिमादेवी बर्मन आणि कर्नाटकचे वन्यजीव संवर्धन कार्यकर्ते संजय गुब्बी या भारतीयांना पर्यावरण क्षेत्रातील मानाचा व्हिटले पुरस्कार जाहीर झाला आहे.
पर्यावरण क्षेत्रात दरवर्षी ब्रिटनमधील ‘दी व्हिटले फंड फॉर नेचर’ या संस्थेच्या वतीने व्हिटले पुरस्कार दिले जातात. त्यांना ग्रीन ऑस्कर या नावाने ओळखले जाते.
एकूण ६६ देशांतील अनेक पर्यावरण कार्यकर्त्यांतून विजेत्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना ३५ हजार पौंडांचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
श्रीनिवास कुलकर्णी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कार
भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
‘फ्युचर’ प्रवर्गात त्यांची आश्वासक वैज्ञानिक म्हणून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमध्ये जन्मलेले श्रीनिवास कुलकर्णी पालोमर ट्रान्झिएन्ट फॅक्टरीचे संस्थापक आणि संचालक म्हणून ओळखले जातात.
दिल्लीच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी १९७८मध्ये भौतिकशास्त्रात एमएस पदवी घेतली.
सध्या ते पासाडीना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (कॅल्टेक) खगोलशास्त्र आणि ग्रहशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.
अवकाशात रात्रीच्या वेळी होणाऱ्या क्षणिक घटनांची माहिती विस्ताराने मिळावी, या उद्देशाने त्यांनी केलेले सर्वेक्षण जगभरात वाखाणले गेले आहे.
‘रेडिओ पल्सर’ (खगोल प्रकाशस्त्रोत) या ताऱ्यासंदर्भात त्यांनी केलेले काम अतिशय मोलाचे आहे. याशिवाय अवकाशातील ट्रान्झियंट सोर्सेसवरही त्यांनी भरीव संशोधन केलेले आहे.
रॉयल सोसायटी ऑफ लंडन, युनायटेड स्टेट्स अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल नेदरलँडस अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अॅड सायन्सेस या चार नामांकित संस्थांचे ते सदस्य आहेत.
त्यांना यापूर्वी अॅलन वॉटरमन पुरस्कार, हेलन वॉर्नर पुरस्कार व जॅन्सकी पुरस्कार मिळाले आहेत.
भारताच्या अंशूचा ५ दिवसांत दोनवेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम
अरुणाचल प्रदेशातील अंशू जामसेनपा या महिला गिर्यारोहकाने जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट ५ दिवसांत दोनवेळा सर करून इतिहास घडविला.
पाच दिवसांत दोन वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली महिला बनण्याचा मान तिने मिळविला आहे.
याशिवाय पाच वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणारी अंशू जामसेनपा पहिली भारतीय महिला ठरली आहे.
तिने याआधी २०११मध्ये दहा दिवसांच्या कालावधीत दोनदा आणि त्यानंतर २०१३मध्ये एकदा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती.
अंशूने १६ मे रोजी सकाळी सव्वानऊ वाजता एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. त्यानंतर २१ मे रोजी ती पुन्हा एव्हरेस्टवर पोहोचली.
याआधी एकाच हंगामात दोनदा एव्हरेस्टवर पोहोचण्याचा विक्रम छुरिम शेरपा या नेपाळी महिलेने सन २०१२ मध्ये केला होता.
दादर-सावंतवाडी एक्स्प्रेसचे नामकरण तुतारी एक्स्प्रेस
कोकणात धावणाऱ्या दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलून ‘तुतारी एक्स्प्रेस’ करण्यात आले आहे.
दादर-सावंतवाडी मार्गावर १ जुलै २०११ रोजी राज्यरानी एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. त्यामुळे एका रात्रीत प्रवास करता येणे शक्य झाले.
त्यामुळे प्रवाशांनी या ट्रेनला पसंती दिली. कोकणातील चाकरमन्यांसाठी दादर-सावंतवाडी ही ट्रेन सर्वाधिक आवडीची आहे.
कोकणातील रत्नागिरीमधील गणपतीपुळ्याजवळ जन्मलेले आणि केशवसुत टोपण नावाने सुप्रसिद्ध असलेले मराठी कवी कृष्णाजी केशव दामले यांच्या सन्मानार्थ या ट्रेनचे नामकरण ‘तुतारी एक्स्प्रेस’ करण्यात आले आहे.
‘तुतारी’ हे केशवसुतांच्या लोकप्रिय कवितेचे नाव आहे. देशावर ब्रिटिशांचे राज्य असताना केशवसुतांनी या कवितेची रचना केली.
या कवितेतून केशवसुतांनी ब्रिटिशांविरोधात एकत्र येण्याचे आणि पेटून उठण्याचे आवाहन केले होते. या कवितेने अनेकांना ब्रिटिशांविरोधात उभे राहण्याची प्रेरणा दिली.
आरोग्य सेवा निर्देशांकात भारत पिछाडीवर
ग्लोबल बर्डन ऑफ डिसिसने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य अहवालामध्ये भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक शेजारील देशांपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे.
बांगलादेश, भुतान, श्रीलंका, चीन या देशांपेक्षा भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक खालावल्याचे या अहवालात दिसून येत आहे.
१९९०-२०१५ दरम्यानच्या कालावधीचा विचार करुन १९५ देशांच्या आरोग्य दराचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.
आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगतीपथावर असलेल्या भारताला आरोग्याच्या बाबतीतील ध्येय गाठता न आल्याचे या अहवालातून नमूद केले आहे.
या अहवालानुसार गेल्या २५ वर्षांमध्ये भारताच्या आरोग्य दरामध्ये १४.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
१९९० मध्ये ३०.७ टक्क्यांवर असलेला आरोग्य निर्देशांक २०१५ मध्ये ४४.८ टक्क्यांवर पोहोचला होता.
भारताच्या तुलनेत श्रीलंकेचा आरोग्यसेवा निर्देशांक ७२.८ टक्के, बांग्लादेशचा ५१.७ टक्के, भुतानचा ५२.७ टक्के आणि नेपाळचा ५०.८ टक्के इतका आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही दोनच राष्ट्र आरोग्य सेवा निर्देशांकाच्या बाबतीत भारताच्या मागे आहेत.
हसन रुहानी यांची इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी पुनर्नियुक्ती
इराणचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी हे २ कोटी ३५ लाखांहून अधिक मते मिळवून दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले आहेत.
रुहानी यांचे मुख्य प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी यांना १ कोटीच्या आसपास मते मिळाली. मोस्तफा मीरसाली आणि मोस्तफा हासीमीताबा हे सुद्धा शर्यतीत होते.
उदारमतवादी आणि सुधारणावादी अशी प्रतिमा असलेल्या ६८ वर्षीय रूहानी यांचा हा दुसरा कार्यकाळ असेल.
रूहानी यांनी २०१३मध्ये निवडणूक जिंकून पहिल्यांदा इराणचे राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्यांचा कार्यकाल ४ वर्षाचा होता.
२०१५मध्ये रुहानी यांनी जागतिक महासत्तांबरोबर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रम मर्यादा आणण्याचा करार करुन जागतिक निर्बंधातून सवलत मिळवली.
ईराणचे इतर देशांशी संबंध दृढ करण्यासाठी हसन रूहानी यांनी इराणचे दरवाजे जगासाठी खुले केले. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचा प्रयत्न केला.
तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताला सुवर्ण
शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.
अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीत सिंग या त्रिकुटाने अंतिम लढतीत कोलंबियाच्या संघाला २२६-२२१ अशा गुणफरकाने पराभूत केले.
भारतीय पुरुष संघाने उपांत्यफेरीत अमेरिकेला २३२-२३० अशा गुणफरकाने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
झाकीर नाईकला सौदी अरेबियाचे नागरिकत्व
वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याला इंटरपोलपासून बचावासाठी सौदी अरेबियाचे नागरिकत्व देण्यात आले आहे.
नाईकची स्वंयसेवी संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर (आयआरएफ) भारत सरकारने बंदी घातली आहे.
भारताच्या सुरक्षेला धोका असल्यामुळे आयआरएफवर बंदी घालण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
याशिवाय राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नाईकविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी करावी यासाठी तयारी सुरू केली होती.
नाईकविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्यास त्याला फरारी समजून जगातील कोणतीही सुरक्षा यंत्रणा कुठूनही अटक करू शकते.
बांगलादेशची राजधानी ढाका येथे गतवर्षी काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यातील काही हल्लेखोरांनी आपल्याला झाकीर नाईकपासून प्रेरणा मिळाल्याचे म्हटले होते.
अटकेपासून वाचण्यासाठी झाकीर नाईक भारतातून सौदी अरेबियात पळून गेला होता व त्याने सौदी अरेबियाच्या नागरिकत्वासाठी अर्जही केला होता.
भारतातील गहू क्रांतीचे जनक आणि हरित क्रांतीचा पाया रचणारे कृषी वैज्ञानिक डॉ दिलबाग सिंग अठवाल यांचे १४ मे रोजी अमेरिकेत निधन झाले.
डॉ. अठवाल यांचा जन्म १९२८मध्ये पंजाबमधील कल्याण या गावात झाला. पंजाब कृषी विद्यापीठात ते प्राध्यापक आणि संकरित वाण विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
७०च्या दशकात भारताने मेक्सिकोवरून आयात केलेल्या ‘लेरमा रोजो ६४’ आणि ‘पीव्ही १८’ या गव्हाच्या वाणांवर त्यांनी संशोधन केले केले.
भारतातील अन्नधान्य उत्पादनात वाढ अत्यावश्यक असताना त्यांनी ‘बाजरा-१’ या बाजरीच्या वाणाचा आणि ‘कल्याण’ व ‘कल्याणसोना’ या गव्हाच्या वाणांचा शोध लावला.
हरित क्रांतीच्या काळात देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणाऱ्या महत्वाच्या शास्त्रज्ञापैकी डॉ. अठवाल एक होते.
हरित क्रांतीनंतर भारतात ‘संकरित वाण क्षेत्रातील जादूगार’ अशी अठवाल यांची ओळख निर्माण झाली.
अठवाल यांनी गहू, बाजरी, हरभरा आणि तंबाखू या पिकांच्या विविध वाणांच्या निर्मितीत बहुमूल्य योगदान दिले आहे.
अठवाल यांनी फिलिपाइन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत उपमहासंचालक म्हणून कार्य केले आहे. सिडनी विद्यापीठाने १९५५मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरविले.
कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी भारतातील विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार त्यांना १९६४मध्ये देण्यात आला.
जैविक विज्ञानातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यबद्दल त्यांना १९७५मध्ये भारत सरकारने पद्मभूषण या नागरी पुरस्काराने गौरविले होते.
महाराष्ट्र रेरा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी गौतम चटर्जी
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (रेरा) अध्यक्षपदी माजी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव गौतम चटर्जी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे विद्यमान प्रधान सचिव डॉ. विजय सतबीरसिंग आणि न्यायपालिकेतून बी डी कापडणीस यांची सदस्यपदी निवड झाली आहे.
प्राधिकरणाच्या अध्यक्षांना पद स्वीकृतीपूर्वी शासनाच्या गृहनिर्माण विभागाचे मंत्री यांच्यासमोर पद व गोपनीयतेची शपथ घ्यावी लागेल.
मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या वर्ल्ड गेंमचेंजर यादीत प्रथम स्थान
रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या ‘वर्ल्ड गेंमचेंजर’ या २५ जणांच्या यादीत प्रथम स्थान पटकावले आहे.
लाखो लोकांच्या आयुष्यात बदल केल्याबद्दल आणि आपल्या क्षेत्रात बदल केलेल्या व्यक्तींचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.
मुकेश अंबानी यांनी 'जियो'च्या माध्यमातून भारतात इंटरनेट क्रांती तर केलीच शिवाय लाखो सामान्य नागरिकांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहचवली असल्याचा उल्लेख फोर्ब्सने केला आहे.
जियोने मागील सहा महिन्यात सुमारे १० कोटी ग्राहक जोडले. स्वस्त इंटरनेट सर्व्हिसमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांनादेखील आपल्या धोरणात बदल करावा लागला.
या यादीतील समाविष्ट इतर व्यक्ती:-
डायसन कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन
सौदी अरबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान
आफ्रिकेतील रिटेल उद्योजक क्रिस्टो वीजे
अमेरिकन ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन ब्लॅक रॉकचे संस्थापक लॅरी फिंक
फोर्ब्ज मिडल इस्ट मासिकातर्फे डॉ धनंजय दातार यांचा गौरव
अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ धनंजय दातार यांना फोर्ब्ज मिडल इस्ट मासिकातर्फे टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१७ पुरस्काराने गौरवण्यात आले.
अरब जगतातील आघाडीच्या भारतीय नामवंतांच्या यादीत डॉ दातार यांना ३२वे मानांकन मिळाले आहे.
यंदा सलग पाचव्या वर्षी फोर्ब्ज मिडल इस्टतर्फे या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अरब जगताच्या प्रगतीची आकांक्षा बाळगून योगदान देणाऱ्या आघाडीच्या भारतीयांची बहुप्रतिक्षीत यादी फोर्ब्ज मिडल इस्टने जाहीर केली.
अरब जगतात उद्योग चालवणाऱ्या भारतीय व्यावसायिकांबाबत सखोल संशोधन व विश्लेषण केल्यानंतर त्यांना मानांकन देऊन ही यादी तयार केली जाते.
केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे निधन
केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अनिल माधव दवे (वय ६०) यांचे १८ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
पर्यावरणवादी, नदी संवर्धक, लेखक-पत्रकार, वैमानिक, सामाजिक कार्यकत्रे, अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी अशी त्यांची ओळख होती.
दररोज दोन वेळा न चुकता योगसाधना करणारे दवे प्रकृतीबाबत अत्यंत दक्ष मानले जायचे. दवे यांना जानेवारीमध्ये न्यूमोनिया झाला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती विलक्षणरीत्या ढासळली होती.
६ जुल १९५६ मध्ये उज्जनजवळील बारनगर येथे जन्मलेल्या दवेंचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. महाविद्यालयीन जीवनात ते विद्यार्थी नेते होते, नंतर संघप्रचारक बनले.
नर्मदा अभियानात ते सहभागी झाले होते. ‘चरैवेती चरैवेती’ आणि ‘जन अभियान परिषद’ अशा दोन नियतकालिकांचे ते संपादन करायचे.
शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन ते वैमानिक झाले होते. २००३मधील उमा भारतींच्या मध्यप्रदेशातील विजयात त्यांचा मोठा वाटा होता.
२००९मध्ये ते प्रथम राज्यसभा खासदार झाले. २०१५मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून आले. मागील वर्षीच ते वने व पर्यावरण मंत्री झाले.
छत्रपती शिवराय, विवेकानंद आणि भगतसिंह ही दवेंची आराध्य दैवते होती. शिवरायांबद्दलची त्यांची ओजस्वी भाषणे खूप गाजली.
शिवरायांच्या रणनीतीवर, प्रशासन कौशल्यावर लिहिलेले ’शिवाजी आणि सुराज्य’ हे त्यांचे पुस्तक खूपच अभ्यासपूर्ण मानले जाते.
दवे यांच्या धक्कादायक निधनानंतर आदरांजलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष बठक बोलावली आणि त्यांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा विशेष ठरावही संमत केला.
त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वने व पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
श्रीनिवास कुलकर्णी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कार
भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
वैज्ञानिक श्रीनिवास कुलकर्णी हे पासाडीना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये खगोलशास्त्र आणि ग्रहशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.
पालोमर ट्रान्झिएन्ट फॅक्टरीची स्थापना आणि संचालनाच्या कामासाठी श्रीनिवास कुलकर्णी ओळखले जातात.
अवकाशात रात्रीच्या वेळी होणाऱ्या क्षणिक घटनांची माहिती विस्ताराने मिळावी, या उद्देशाने त्यांनी केलेले सर्वेक्षण जगभरात वाखाणले गेले आहे.
‘रेडिओ पल्सर’ (खगोल प्रकाशस्त्रोत) या ताऱ्यासंदर्भात त्यांनी केलेले काम अतिशय मोलाचे आहे. याशिवाय अवकाशातील ट्रान्झियंट सोर्सेसवरही त्यांनी भरीव संशोधन केलेले आहे.
दहा नव्या अणुभट्ट्यांच्या उभारणीला मंत्रिमंडळाची मंजुरी
देशाच्या अणुउर्जा क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार करताना केंद्रीय मंत्रिमंडळाने संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या १० नव्या अणुभट्ट्यांच्या उभारणीला मंजुरी दिली आहे.
एकाचवेळी १० अणुभट्ट्यांना मंजुरी मिळण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सध्या देशात एकूण २२ अणुभट्ट्या कार्यरत आहेत.
जुन्या २० अणुभट्ट्या २२० मेगावॉट इलेक्ट्रिक क्षमतेच्या आहेत. तर २००५ आणि २००६मध्ये तारापूरमध्ये सुरु करण्यात आलेल्या दोन अणुभट्ट्यांची क्षमता ५४० मेगावॉट इतकी आहे.
नव्या अणुभट्ट्यांची क्षमता जुन्या अणुभट्ट्यांच्या तुलनेत जास्त म्हणजेच सुमारे ७०० मेगावॉट इतकी असणार आहे.
त्यांची उभारणी राजस्थानातील माही बंसवाडात, हरियाणातील गोरखपूर, कर्नाटकातील कैगा आणि मध्य प्रदेशातील चुटकामध्ये करण्यात येणार आहे.
‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत अणुभट्ट्यांची उभारणी केली जाणार आहे. या अणुभट्ट्यांच्या उभारणीसाठी ७० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
२०२१-२२ मध्ये अणुभट्ट्या पूर्ण क्षमतेने काम करु लागणार आहेत. त्यामुळे उर्जा निर्मितीत लक्षणीय वाढ होणार असून वीजेचे दरदेखील कमी होणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन
मराठी नाटक, तसेच मराठी व हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू (वय ५९ वर्ष) यांचे १८ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
रीमा यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला. पूर्वाश्रमीचे त्यांचे नाव नयन भडभडे होते. रंगभूमीचा वारसा त्यांना आई मंदाकिनी भडभडे यांच्याकडून लाभला.
हिरवा चुडा, हा माझा मार्ग एकला अशा चित्रपटांतून बेबी नयन या नावाने बालकलाकार म्हणून त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली.
कलयुग हा रिमा लागू यांचा पहिला हिंदी सिनेमा. हिंदी चित्रपटात रिमा लागू यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका केल्या. पण त्यांचे हे सर्व रोल्स चांगलेच गाजले.
कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी आक्रोश सिनेमात डान्सरची भूमिका केली होती. सुप्रिया पिळगावकर बरोबरची तूतू-मेंमें, श्रीमान-श्रीमती या त्यांच्या हिंदी मालिका प्रचंड गाजल्या.
पुरुष, सविता दामोदर परांजपे, घर तिघांचं हवं, झाले मोकळे आकाश, के दिल अभी भरा नही या नाटकांतील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.
आई शपथ, सातच्या आत घरात, मुक्ता अशा काही मराठी चित्रपटांतील त्यांची भूमिका प्रचंड गाजली.
कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, हम आप के हैं कौन, वास्तव आदी हिंदी चित्रपटांतील कसदार अभिनयातून ‘आई’च्या भूमिकेलाही त्यांनी ग्लॅमर मिळवून दिले.
मैने प्यार किया (१९९०), आशिकी (१९९१), हम आपके हैं कौन (१९९५), वास्तव (२०००) या चित्रपटांतील भूमिकेसाठी रीमा लागू यांना फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
नाटके : घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष, बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय, सौजन्याची ऐशी तैशी, शांतेचे कार्ट चालू आहे, छापाकाटा.
मालिका : खांदान, श्रीमान-श्रीमती, तूतू-मेंमें, दो और दो पाच, धडकन, कडवी खट्टी मिठ्ठी, दो हंसो का जोडा, तुझ माझ जमेना, नामकरण इत्यादी
हिंदी चित्रपट : मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ है, वास्तव, साजन, कुछ कुछ होता है, आशिकी इत्यादी
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती
कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अंतिम निकाल येईपर्यंत पाकिस्तानने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करू नये, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. आदेशांचे उल्लंघन केल्यास पाकिस्तानवर कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
जाधव हे हेर आहेत की नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगून जाधव हे ‘रॉ’चे एजंट असल्याचा पाकिस्तानचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
व्हिएन्ना करारानुसार जाधव यांना राजनैतिक तसेच कायदेशीर मदत मिळाली पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले.
भारताने पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी भारताने केली होती.
‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ या त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यात आलेल्या देशातील रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल व क्रमवारीरेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रसिद्ध केला.
‘ए वन’ श्रेणीतील ७५ व ‘ए’ श्रेणीतील ३३२ अशा एकूण ४०७ प्रमुख रेल्वे स्थानकांचे हे स्वच्छता सर्वेक्षण केले गेले होते.
या दोन्ही श्रेणींमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने पहिले १० क्रमांक पटकाविणाऱ्या स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील तीन स्थानकांचा समावेश आहे.
‘ए वन’ श्रेणीमध्ये पुणे नवव्या तर ‘ए’ श्रेणीमध्ये अहमदनगर स्टेशन क्रमवारीत तिसऱ्या आणि बडनेरा सहाव्या क्रमांकावर आहेत. ‘ए वन’ श्रेणीमध्ये विशाखापट्टणम पहिल्या स्थान पटकावले आहे.
‘ए वन’ विभागात पहिल्या दहामध्ये विशाखापट्टणम, सिकंदराबाद, जम्मू तवी, विजयवाडा, आनंद विहार टर्मिनल, लखनऊ अहमदाबाद, जयपूर, पुणे आणि बॅंगलोर यांचा समावेश आहे.
ए विभागात बियास, खम्माम, अहमदनगर, दुर्गापूर, मंचेरीयल, बडनेरा, रंगिया, वर्णागळ, दामोह आणि भूज हे टॉप टेनमध्ये आहेत.
याबरोबरच अस्वच्छ स्टेशनची यादीही तयार करण्यात आली असून दरभंगा भोपाळ आणि अंबाला कॅंट सर्वात अस्वच्छ स्टेशन असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन
महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे.
या विभागाला ‘विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग’ असे नाव देण्यात आले आहे.
या नवीन विभागाकडे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील अनेक विषय हस्तांतरित करण्यात आले आहेत.
विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी कार्यरत यंत्रणा व महामंडळे या नवीन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत.
या प्रवर्गांच्या कल्याणकारी योजनांसाठी समन्वय साधण्याचे काम हा विभाग करेल. तसेच इतर मागासवर्गीयांसाठी केंद्र सरकारने मंजूर केलेली अनुदाने या विभागाला मिळतील.
चारही प्रवर्गांसाठी स्वयंसेवी आणि अशासकीय संस्थांना अर्थसहाय्य आणि अनुदान देणे, या प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे ही कामेही नवीन विभागामार्फत चालतील.
या विभागासाठी पदनिर्मिती व आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली असून लवकरच पूर्णवेळ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
मेक्सिकोतील ज्येष्ठ पत्रकार जेविएर वाल्डेझ यांची हत्या
अमली पदार्थाची तस्करी आणि संघटित गुन्हेगारी याबाबतचे वृत्तांकन करण्यात हातखंडा असलेले ज्येष्ठ पत्रकार जेविएर वाल्डेझ यांची मेक्सिकोतील सिनाओला येथे हत्या करण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांत हत्या करण्यात आलेले वाल्डेझ हे सहावे आणि रेजिना मार्टिनेझ पेरेझ यांच्यानंतर हत्या करण्यात आलेले दुसरे मोठे पत्रकार आहेत.
सिनाओलाची राजधानी क्युलिअॅकन येथे १५ रोजी वाल्डेझ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
वाल्डेझ हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त पत्रकार होते आणि अमली पदार्थाच्या व्यापारावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
‘लोस मोरोस डेल नार्को’ हे अमली पदार्थविक्रीत नकळत ओढल्या जाणाऱ्या लहान मुलांविषयीचे तसेच 'मिस नार्को' ही प्रसिद्ध पुस्तके वाल्डेझ यांनी लिहिलि आहेत.
कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ जर्नालिस्ट्स’ या अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांना २०११सालचा ‘प्रेस फ्रीडम अॅवॉर्ड’ हा पुरस्कार दिला.
तसेच आंतर-अमेरिका खंडीय सामंजस्य वाढविण्यासाठीचा पुरस्कार अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिला.
फोर्ब्सच्या ‘मिडास २०१७’ यादीत ११ भारतीय
फोर्ब्स नियतकालिकाने जारी केलेल्या ‘मिडास २०१७’ या जगातील १०० सर्वोत्तम व्हेंचर कॅपिटॅलिस्ट्सच्या यादीत ११ भारतीय गुंतवणूकदारांचा समावेश आहे.
व्हेंचर कॅपिटॅलिस्ट्स हे स्टार्टअप किंवा छोट्या कंपन्यांना भांडवल पुरवितात अथवा भांडवल उभारण्यास मदत करतात.
आयपीओ, अधिग्रहण किंवा खाजगी धारण या माध्यमातून पैसे उभे करणाऱ्या तसेच केलेल्या गुंतवणुकीतून अधिकाधिक परतावा मिळविणाऱ्या व्यक्तींचा या यादीत समावेश आहे.
सेक्वेईया कॅपिटलचे भागिदार जीम गोयेट्झ या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांनी व्हॉटसअॅपची फेसबुकला २२ अब्ज डॉलरला विक्री केली होती.
या यादीतील ११ भारतीयांमध्ये नीरज अग्रवाल हे सर्वोच्च स्थानी आहेत. यादीतील त्यांचा क्रमांक १७वा आहे. मिडास यादीत स्थान मिळविण्याची अग्रवाल यांची ही सलग सातवी वेळ आहे.