राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ३० सप्टेंबर रोजी पाच राज्यांत नव्या राज्यपालांची तर एका केंद्रशासित प्रदेशामध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे.
बिहार, तामिळनाडू, मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांसाठी तर अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते टॉम अल्टर यांचे २९ सप्टेंबर रोजी मुंबईत कर्करोगामुळे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
अल्टर यांचा जन्म १९५० साली मसुरीमध्ये झाला. त्यांचे उच्च शिक्षण येल विद्यापीठात झाले. १९७० नंतर ते पुन्हा भारतात आले.
पुण्यातील ‘एफटीआयआय’मध्ये त्यांना १९७२मध्ये प्रवेश मिळाला. पुढे त्यांनी अभिनयामध्ये डिप्लोमा केला, ज्यात त्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले.
टॉम अल्टर यांनी १९७६मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या चरस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
शतरंज के खिलाडी, गांधी, क्रांती, बोस : द अनफरगॉटन हिरो आणि वीर झारा यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली. ‘दप्तर’ या मराठी चित्रपटातही ते दिसले.
मात्र ९०च्या दशकात दूरदर्शनवरील ‘जबान संभालके’ या शोनंतर अल्टर बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले.
नव्वदच्या दशकात जुनून या मालिकेत त्यांनी साकारलेली गॅंगस्टर केशव कलसीची भूमिकादेखील विशेष गाजली होती.
याचबरोबर, जुगलबंदी, भारत एक खोज, घुटन, शक्तीमान, मेरे घर आना जिंदगी, यहॉं के हम सिकंदर यासारख्या मालिकामधूनही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली.
त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि ३००हून अधिक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. अल्टर यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.
नाटकविश्वातहि अल्टर हे मोठे नाव होते. पृथ्वी थिएटर्ससाठी अनेक नाटकांत त्यांनी काम केले आहे.
१९७७साली नसिरुद्दीन शहा आणि बेंजामिन गिलानी यांसोबत मिळून अल्टर यांनी मॉटले प्रोडक्शनची स्थापना केली.
भारतीय संस्कृतीची उत्तम जाण असलेल्या अल्टर यांना इंग्रजीसह अस्खलित उर्दू आणि हिंदीत लिहिता, वाचता आणि बोलता यायचे.
विशेषतः त्यांना उर्दू शायरीची आवड होती. ‘गालिब इन दिल्ली’ नाटकात त्यांनी उर्दू कवी मिरझा गालिब यांची लक्षवेधी भूमिका साकारली होती.
१९८० ते ९० दरम्यान त्यांनी क्रीडा पत्रकार म्हणूनही काम केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्हीसाठी मुलाखत घेणारे टॉम अल्टर पहिले पत्रकार होते.
चित्रपट आणि कलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल २००८मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
‘व्हीव्हीपॅट’चा वापर करणारे गुजरात पहिले राज्य
गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रांवर ‘व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल’ (व्हीव्हीपॅट) यंत्राचा वापर केला जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील प्रत्येक मतदाराला प्रथमच मतदान केल्याची पावती मिळणार आहे.
‘व्हीव्हीपॅट’ यंत्रामुळे मतदारांना त्यांचे मत योग्य प्रकारे नोंद झाले आहे अथवा नाही, याची खात्री करता येणार आहे. तसेच शंका आल्यास तक्रारही करता येणार आहे.
मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यावर असणार आहे.
मतदाराने केलेली तक्रार बनावट असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी त्या मतदाराविरोधात तक्रारही करू शकतो. नियमानुसार, अशा प्रकारात संबंधित मतदाराला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
देशातील सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबरोबरच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
त्यानुसार संपूर्ण राज्यात ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर करणारे गुजरात हे पहिले मोठे राज्य ठरणार आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत गांधीनगर मतदारसंघात या यंत्राचा प्रायोगिक तत्त्वावर वापर झाला होता. आता गुजरातमधील १८२ मतदारसंघांमधील ५०,१२८ मतदान केंद्रांवर या यंत्राचा वापर होणार आहे.
संपूर्ण राज्यात महिला सभेचे आयोजन
महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १ ऑक्टोबरला महिला सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सहभागी महिला ‘गावात गर्भलिंग निदान होऊ देणार नाही’ अशी शपथ घेणार आहेत.
तसेच ग्रामपंचायत विकास आराखड्यातील १० टक्के निधी महिलासाठी राखीव ठेवणे आणि महिलांना उघड्यावर शौचास जावे लागू नये, यासाठी प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचा एकमताने ठराव देखील करण्यात येणार आहे.
महिलांनी आपल्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्यादृष्टीने ठराव करावे, अशी सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
त्याला मंजुरी देत आयोगाने सुचवलेले सर्व ठराव राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी करावे, असे आदेश राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाकडून सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतींना ताकद देणाऱ्या ७३व्या आणि ७४व्या घटना दुरुस्तीला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून, महिलांना गावाच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी महिला सभा हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
स्त्रीभ्रूण हत्या, मुलींचा घटता जन्मदर यातून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याची होणारी पिछेहाट रोखणे गरजेचे आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे निधन
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे २८ सप्टेंबर रोजी गुरुग्राम येथे निधन झाले. फोतेदार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तियांपैकी एक होते.
त्यांना ‘काँग्रेसचे चाणक्य’ म्हणूनही ओळखले जात होते. १९८०-८४ या काळात इंदिरा गांधींचे ते राजकीय सचिवही होते. त्याचप्रमाणे राजीव गांधी यांचेही ते काही काळासाठी राजकीय सचिव होते.
माखनलाल फोतेदार मुळचे जम्मू-काश्मीरचे होते. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
फोतेदार काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीचे दीर्घकाळ सदस्य होते. तसेच, आताही त्यांना कार्यकारिणी समितीत 'आजीव आमंत्रित' दर्जा देण्यात आलेला होता.
फोतेदार यांचा जन्म ५ मार्च १९३२ रोजी झाला. पहलगाम मतदारसंघातून ते जम्मू-काश्मीर विधानसभेत निवडून गेले होते. ते जम्मू-काश्मीर सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते.
त्यानंतर ते राज्यसभेचे सदस्य झाले आणि केंद्रात मंत्री झाले. राज्यसभेत दोन टर्म निवडून जाण्याची संधी त्यांना मिळाली होती.
फोतेदार यांच्या 'द चिनार लिव्हज' या पुस्तकाचे २००५साली प्रकाशन झाले. या पुस्तकातील काही उल्लेखांमुळे वाद ही निर्माण झाले होते.
६०च्या दशकात ‘प्लेबॉय’सारखे सनसनाटी मासिक सुरू करून खळबळ उडवून दिलेल्या ह्यूग हेफ्नर यांचे २८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९१व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
पुरुषांसाठी लैंगिक विषयावरचे मॅगझीन सुरू करून हेफ्नर त्याकाळी जणू लैंगिक क्रांतीचे प्रतीक ठरले.
ह्यूग हेफ्नर यांचा जन्म शिकागोमध्ये झाला होता. ते हेफ या नावानेही ओळखले जात होते. याशिवाय, हेफ्नर अमेरिकेतील व्यक्तीस्वातंत्र्याच्या चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात.
शिक्षक दाम्पत्याच्या पोटी १९२६साली जन्मलेल्या हेफ्नर यांनी शिक्षणानंतर सर्जनशील लेखनामध्ये उमेदवारी सुरू केली.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर हेफ्नर ऑर्मीमध्ये क्लर्क पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी ‘एस्क्वायर’ लाइफस्टाइल मासिकात कॉपी रायटर म्हणून काम केले.
‘एस्क्वॉयर’मध्ये असताना मागितलेली ५ डॉलर पगारवाढ न केल्यामुळे ती नोकरी सोडून त्यासारखेच नवे मासिक उभारण्याचा चंग त्यांनी बांधला.
त्यानानात्र १९५३मध्ये ह्यूग हेफ्नर यांनी ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात केली. मासिकातील नग्न छायाचित्रे, अतिधीट विषयांवरील चर्चा आणि मुलाखती या सगळ्यामुळे साहित्य विश्वात मोठे वादळ निर्माण झाले.
परंतु सगळ्या वादानंतरही सुमारे दोन दशके हे मासिक साहित्यिक विश्वात कायम चर्चेचा विषय राहिले होते. याच मासिकाच्या बळावर हेफ्नर यांनी स्वतःचे व्यवसाय साम्राज्य तयार केले.
बिनधास्त साहित्य तसेच समाज आणि राजकारणातील वृत्तीप्रवृत्तींना तिरकस चावा घेणारी लेखणी प्लेबॉयमध्ये स-छायाचित्र छापली गेली. अमेरिकेत या मासिकाने लैंगिक क्रांती केली.
हेफ्नर यांनी अमेरिकेतील विघटनाकडे जाणारी कुटुंबसंस्था, लग्नसंस्था यांच्या सूक्ष्मदर्शनासोबत शरीरसंबंधांबाबत होणाऱ्या मुक्त विचारांचा आपल्या मासिकाद्वारे प्रचार आणि प्रसार केला.
पहिल्याच अंकापासून लेख, चित्रकथा, व्यंगचित्रे, विनोद आणि आघाडीच्या स्त्री सेलिब्रेटींची ‘विशेष चित्रे’ या मासिकातून देण्याचे आश्वासन हेफ्नर यांनी आजतागायत पाळले.
सर्वाधिक मानधन देऊन त्यांनी आघाडीच्या सर्वच लेखकांना आपल्या मासिकामध्ये लिहिण्यासाठी आमंत्रित केले.
साहित्य, समाज आणि पारंपरिक अमेरिकी विचारधारा यांची चौकट मोडत या मासिकाचा जगभर प्रसार झाला.
जागतिकीकरणाआधी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या गोष्टींपैकी एक म्हणून या मासिकाची नोंद केली जाते.
‘प्लेबॉय’ मासिकाने विसाव्या अखेरची पाच दशके लैंगिक संस्कृतीची केवळ परिभाषाच बनवली नाही, तर तिला एक नवी दिशा दिली.
मासिक सुरु केल्यानंतर ७ वर्षांनी १९६०मध्ये हेफ्नर यांनी पहिला प्लेबॉय क्लब सुरू केला. त्यानंतर हळुहळु दुनियाभरात प्लेबॉयचे क्लब सुरू केले गेले.
प्लेबॉय एंटरप्रायजेस सध्या टेलिव्हिजन नेटवर्क, वेबसाइट, मोबाइल अॅप्लिकेशन आणि रेडिओच्या माध्यमातून अॅडल्ट कंटेन्ट पोहचविण्याचे काम करते.
प्लेबॉय या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी शर्लिन चोपडा भारतातील एकमेव मॉडेल होती. २०१२मध्ये शर्लिन चोपडाने प्लेबॉयच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले होते.
जपानमध्ये मुदतपूर्व निवडणुका जाहीर
जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर रोजी जपानची संसद बरखास्त केली आहे.
जपानमध्ये २२ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत. विरोधी पक्ष कमकुवत असल्याचा लाभ उठवत आबे यांनी मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली आहे. जनमत चाचण्यांमध्येही त्यांचा एलडीपी पक्ष आघाडीवर आहे.
उत्तर कोरियाने केलेल्या अण्वस्त्र चाचण्या आणि करप्रणालीची नवी योजना याबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत शिंझो आबे यांना जनमताचा कौल घ्यावयाचा आहे.
उजव्या विचारसरणीच्या आबे यांच्या लिबरल डेमोक्रॅट पक्ष २०१२मध्ये सत्तेवर आला. आप्तस्वकीयांना महत्त्वाची पदे दिल्याच्या आरोपावरून यावर्षीच्या सुरुवातीला आबे अडचणीत आले होते.
पण आता उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने दोन बॅलास्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केल्यानंतर आबे यांनी त्याविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला जपानी जनतेचा पाठिंबा वाढला आहे.
टोकियोच्या गव्हर्नर युरिको कोइके यांनी ‘पार्टी ऑफ होप’ स्थापन करून अबे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. जपानचे राजकीय चित्र बदलण्याची या पक्षाची इच्छा आहे.
गोवा टुरिझमला राष्ट्रीय पुरस्कार
गोवा टुरिझमला जागतिक पर्यटनाच्या दिवशीच दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांसाठी हे पारितोषिक देण्यात आले.
गोव्याला ‘पर्यटनासाठी सर्वोत्तम राज्य’ हा सन्मान मिळाला. तसेच ‘सोशल मीडिया, मोबाईल अॅप’ यांच्या सर्वाधिक उपयोगासाठीही पुरस्कार देण्यात आले आहे.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
एनटीए अर्थात राष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातील पुरस्कारांची सुरूवात १९९०पासून करण्यात आली. पर्यटनाला चालना देणाऱ्या राज्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
मागील पाच वर्षांपासून गोवा पर्यटन विभागाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता यामध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कारांची भर पडली.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी 'ऑपरेशन अर्जुन'च्या माध्यमातून सीमेवरील पाकिस्तानच्या सैनिकांच्या आणि माजी सैनिकांच्या घरांवर तसेच शेतात बेधूंद गोळीबार करून पाकिस्तानला भारताने जबरदस्त धडा शिकविला आहे.
'आपरेशन अर्जुन'अंतर्गत घुसखोरी करणाऱ्या आणि भारत विरोधी अभियान राबविणाऱ्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी सैनिक, आयएसआय आणि पाक रेंजर्सच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि शेतांवर गोळीबार करण्यात आला होता.
त्यात पाकिस्तानचे ७ सैनिक आणि ११ नागरिक मारले गेले. तसेच पाकच्या अनेक आऊट पोस्टही उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या.
भारताच्या या आक्रमक माऱ्यामुळे पाक लष्कराची भंबेरी उडाली आणि त्यांनी गोळीबार थांबवा अशी विनंती भारतीय लष्कराला केली.
गेल्यावर्षी भारताने 'ऑपरेशन रूस्तम' सुरू करून पाकिस्तानला असेच सळो की पळो करून सोडले होते. त्याच धर्तीवर 'ऑपरेशन अर्जुन' सुरू केले आहे.
सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडूनरंवार होणाऱ्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बीएसएफकडून 'ऑपरेशन अर्जुन' सुरू करण्यात आले होते.
पुष्पा पागधरे यांना लता मंगेशकर पुरस्कार
गायिका पुष्पा पागधरे यांना राज्य सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.
लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकाराला गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात येतो.
पुष्पाताईंचा जन्म १५ मार्च १९४३ रोजी झाला. वडील जनार्दन चामरे यांच्याकडून पागधरे यांना लहानपणापासूनच संगीताचे धडे मिळाले. पुष्पाताईंनी त्यांचे गुरु आर डी बेंद्रे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.
त्यानंतर त्या मुंबई आल्या व गीत, गझल, भजन आणि ठुमरी शिकल्या. आकाशवाणीवरही त्यांनी गाणी गायली आहेत.
प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी त्यांना ‘प्रथम देवा तुझी सोन्याची जेजुरी’ या चित्रपटात गायनाची संधी दिली.
बाळ पळसुले, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, विठ्ठल शिंदे, राम-लक्ष्मण, यशवंत देव आदी संगीतकारांबरोबर त्यांना गायनाची संधी मिळाली.
‘अंकुश’ चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे देना दाता’, ही प्रार्थना पुष्पातार्इंनी आपल्या सुरेल आवाजाने अजरामर केली.
पुष्पाताईंनी ‘खून का बदला’, ‘बिना माँ के बच्चे’, ‘मुक्कदर का सिकंदर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
त्यांनी अनेक लावण्याही गायल्या आहेत. सुलोचना चव्हाण यांच्याप्रमाणेच त्यांच्या आवाजातील लावण्याही खूपच गाजल्या.
त्यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी, ओडिया, बंगाली, मारवाडी, हरियानवी, पंजाबी, गुजराती आणि आसामी आदी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
यापूर्वी पुष्पातार्इंना राज्य शासनातर्फे पार्श्वगायनाबद्दल दोनवेळा पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे.
आतापर्यंतचे लता मंगेशकर पुरस्कार विजेते
माणिक वर्मा
श्रीनिवास खळे
गजानन वाटवे
दत्ता डावजेकर
पं. जितेंद्र अभिषेकी
पं. हदयनाथ मंगेशकर
ज्योत्स्ना भोळे
आशा भोसले
अनिल विश्वास
सुधीर फडके
प्यारेलाल
रवींद्र जैन
स्नेहल भाटकर
मन्ना डे
जयमाला शिलेदार
खय्याम
महेंद्र कपूर
सुमन कल्याणपूर
सुलोचना चव्हाण
यशवंत देव
आनंदजी शहा
अशोक पत्की
कृष्णा कल्ले
प्रभाकर जोग
उत्तम ब्रीदपाल सिंग
शिक्षणाचा दर्जा खालावलेल्या देशांमध्ये भारत दुसरा
जागतिक बँकेने ‘जागतिक विकास अहवाल २०१८ : लर्निग टू रिअलाइज एज्युकेशन्स प्रॉमिस’ हा अहवाल प्रसिद्ध केला.
जागतिक बँकेने शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जाबाबत सादर केलेल्या या अहवालामध्ये भारतासह १२ देशांचा समावेश आहे.
शिक्षणाचा दर्जा खालावलेल्या देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर पूर्व आफ्रिकेतील मालवी देशानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे.
ज्या देशातील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक शब्दही वाचता येत नाही, तसेच दोन आकडी संख्येची वजाबाकीही येत नाही अशा सात देशांची यादी जागतिक बँकेने तयार केली आहे. यामध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे.
कोणतेही शिक्षण न देणाऱ्या शाळा फक्त विकासाच्या संधी नाकारतच नाहीत, तर या शाळा मुलांवरदेखील अन्याय करतात, असे या अहवालातून अधोरेखित करण्यात आले आहे.
भारतातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्यांना आयुष्याचे धडे देण्यात अपयशी ठरते, अशा शब्दांमध्ये जागतिक भारतीय शिक्षण क्षेत्रातील जळजळीत वास्तवाची पोलखोल केली आहे.
सौदी अरेबियात महिलांना वाहन चालविण्यास परवानगी
कर्मठ व पुराणमतवादी देश असलेल्या सौदी अरेबिया देशातील महिलांना वाहन चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सौदीचे राजे सलमान बिन अब्दुलअझित अल सौद यांनी या क्रांतिकारी निर्णयाची घोषणा करत, देशातील महिलांना वाहन चालविण्याचा परवाना देण्याचा वटहुकुम काढला आहे.
सौदीत महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. येथे महिलांवर अनेक बंधने आहेत. महिलांवर दडपशाही करणाऱ्या आखाती देशांमधील एक अशी सौदीची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे.
ही बंधने हटविण्यासाठी महिला कार्यकर्त्या तेथे अनेक वर्षांपासून लढा देत आहे. बंदी झुगारल्यामुळे अनेक उजव्या विचारसरणीच्या महिला कार्यकर्त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे.
राजे सलमान यांनी दिलेल्या आदेशानुसार, यासंदर्भात मंत्री स्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
ही समिती पुढील ३० दिवसात वाहन चालवण्याच्या परवानगीच्या निर्णयावर मत मांडणार आहे. त्यानंतर जून २०१८मध्ये शरिया कायद्यानुसार हा आदेश लागू करण्यात येईल.
महिलांना गाडी चालविण्यावर असलेली बंदी एक सामाजिक मुद्दा मानला जातो आहे. कारण धर्म आणि कायद्याच अशा कुठल्याही बंदीचा उल्लेख नाही.
यापूर्वी २०१५मध्ये सौदी अरेबियातील महिलांना प्रथमच मतदानाचा अधिकार देण्याचा महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.
क्रिकेटचे नवे नियम लागू
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) क्रिकेटचे नवे नियम २८ सप्टेंबरपासून अमलात येणार असून ते सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांना लागू होतील.
भारतीय सैन्याने म्यानमार सीमेवर केलेल्या कारवाईत एनएससीएन (के) या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
यात अनेक दहशतवादी मारले गेल्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराचे या कारवाईत कोणतेही नुकसान झालेले नाही.
भारत- म्यानमार सीमेवर भारतीय सैन्याचे पथक गस्त घालत होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या पथकावर गोळीबार केला.
भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) या प्रतिबंधित संघटनेच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले.
हुरुनकडून भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर
‘हुरुन इंडिया’ने जारी केलेल्या २०१७च्या श्रीमंतांच्या सहाव्या वार्षिक यादीनुसार, रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी हे सलग सहाव्या वर्षी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
रिलायन्सच्या समभागांनी जोरदार उसळी घेतल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल ५८ टक्के वाढ झाली आहे.
त्यांची संपत्ती आता २.५७ लाख कोटी झाली असून, हुरुनच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत ते आता १५व्या स्थानी पोहोचले आहेत.
अंबानी यांच्यासोबत पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि डी-मार्टचे राधाकृष्ण दमानी यांनीदेखील या श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविले आहे.
गेल्या वर्षी २५व्या स्थानी असलेले बालकृष्ण यंदा आठव्या स्थानी आले आहेत. त्यांची संपत्ती १७३ टक्क्यांनी वाढून ७० हजार कोटी रुपये झाली आहे. तर डी-मार्टच्या दमानी यांची संपत्ती सर्वाधिक ३२१ टक्क्यांनी वाढली आहे.
या अहवालानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यादीतील अब्बाधीशांची श्रीमंती ११ टक्क्यांनी वाढली आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते ‘शीर टेस्टर’चे अनावरण
दुधातील भेसळ त्वरित ओळखणाऱ्या उपकरणाचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. या उपकरणाचा वापर अतिशय सोपा असून त्यामुळे दुधातील भेसळ ओळखण्यास मदत होणार आहे.
‘काऊन्सिल ऑफ सायन्टिफीक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’ म्हणजेच ‘सीएसआयआर’ने या उपकरणाची निर्मिती केली आहे.
या उपकरणाला ‘शीर टेस्टर’ असे नाव देण्यात आले आहे. या उपकरणामुळे दुधातील युरिया, मीठ, डिटर्जंट, साबण, सोडा, बोरिक अॅसिड, हायड्रोजन पॅरॉक्साईड या घटकांची भेसळ ओळखता येते.
वापरकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या या उपकरणाची किंमत ५ हजार रुपये आहे.
एक बटण दाबताच अवघ्या ६० सेकंदांमध्ये हे उपकरण दूध भेसळयुक्त आहे की नाही, याची पडताळणी करते.
बिनेश जोसेफ यांना अॅडॉल्फ मेसर पुरस्कार
जर्मनीत गोथे विद्यापीठात संशोधन करणारे मूळ भारतीय असलेले वैज्ञानिक बिनेश जोसेफ यांना ‘अॅडॉल्फ मेसर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
रोगकारक जिवाणूंवरील संशोधनासाठी मेसर फाऊंडेशनतर्फे दिला जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरूप १९ लाख रुपये आहे.
बिनेश यांचा जन्म केरळातील कोळिकोड जिल्ह्य़ातील मराथोमकारा या खेडय़ात झाला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते उच्चशिक्षणासाठी जर्मनीत गेले.
जैवरसायनशास्त्र, वर्णपंक्तीशास्त्र, जैवभौतिकशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी एकूण २० शोधनिबंध लिहिले आहेत. फ्रँकफर्टच्या गुटे विद्यापीठात जोसेफ कार्यरत आहेत.
जिवाणूंचे मानवी पेशीविरोधातील युद्धतंत्र समजून घेण्याची मूलभूत कामगिरी जोसेफ व त्यांचे सहकारी करीत आहेत.
त्यांच्या या संशोधनातून महाजिवाणूंवर रामबाण उपाय ठरणाऱ्या नवीन औषधांची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
बिनेश जोसेफ यांनी जिवाणूंविरोधात पर्यायी उपाययोजनांवर केलेले संशोधन ही त्यांची जमेची बाजू आहे.
ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो ते मेसर हे जर्मनीतील एक संशोधक व उद्योगपती होते. त्यांनी अॅसिटिलिन जनरेटर कंपनी स्थापन केली होती.
मेसर समूहाचे नाव जगात औद्योगिक कारणांसाठी लागणाऱ्या वायूंच्या निर्मितीत अग्रक्रमाने घेतले जाते.
प्रेरणादायी महिलांच्या यादीत मिताली राज
बीबीसीच्या जगातील प्रेरणादायी महिलांच्या यादीत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला स्थान मिळाले आहे.
क्रीडा, राजकारण, व्यापार यासारख्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा या यादीत समावेश करण्यात येतो. यात भारताच्या मिताली राज या एकमेव महिला खेळाडूने जागा पटकावली आहे.
मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
मितालीने आतापर्यंत १८६ वन-डे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात ५१.५८ च्या सरासरीने मितालीने ६१९० धावा केल्या आहेत.
आपल्या कामगिरीतून इतर महिलांनी प्रेरणा घ्यावी असे काम करणाऱ्या महिलांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयचे महाव्यवस्थापक श्रीधर यांचा राजीनामा
गेले काही दिवस अधिकारकक्षा ओलांडून काम करणाऱ्या बीसीसीआयचे महाव्यवस्थापक एम व्ही श्रीधर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यामुळे आता पुढील काही काळासाठी बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी श्रीधर यांचे काम पाहणार आहेत.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना श्रीधर हे आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी चर्चेत आले होते.
बीसीसीआयच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती झाल्यानंतर श्रीधर यांना हैदराबादवरुन मुंबईत येण्याची विनंती बीसीसीआयने केली होती.
मात्र श्रीधर आपलं कामकाज मुंबईत येऊन जाऊन करायचे. या कार्यपद्धतीमुळे बीसीसीआयचे अनेक पदाधिकारी नाराज होते.
त्याआधी दुलीप करंडकाची स्पर्धा रद्द करण्यावरुनही श्रीधर यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशासकीय समितीला विश्वासात न घेता श्रीधर यांनी सोहम देसाई या ट्रेनरची नेमणुक केली.
या सर्व प्रकरणावरुन प्रशासकीय समिती नाराज होती, त्याचे पर्यावसन अखेर श्रीधर यांच्या राजीनाम्यात झाले आहे.
मधू कोडा यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी
निवडणुकीतील खर्चाचा हिशेब न दिल्यामुळे निवडणूक आयोगाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्यावर ३ वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे.
मधू कोडा यांनी झारखंडचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून २००६ला पद सांभाळले होते. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते अपक्ष होते.
कोडा यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ऑल झारखंड स्टुडंट युनियनच्या स्वरूपातून केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही कोडा यांची जवळीक होती.
बाबूलाल मरांडा यांच्या नेतृत्वात झालेल्या सरकारमध्ये तसेच अर्जुन मुंडा यांच्या मंत्रिमंडळात ते पंचायत राज मंत्री होते.
२००५च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून तिकीट न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती व ते जिंकलेसुद्धा होते.
कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने भाजपाच्या नेतृत्वात अर्जुन मुंडा सरकारला त्यांनी समर्थन दिले होते.
सप्टेंबर २००६मध्ये कोडा आणि अन्य ३ अपक्ष आमदारांनी मुंडा सरकारमधून समर्थन मागे घेतल्यामुळे अल्पमतात आलेले भाजपा सरकार कोसळले.
त्यानंतर काँग्रेसशी आघाडी करून त्यांनी सरकार स्थापन केले आणि त्यावेळी काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रिपदही दिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली असून नीती आयोगाचे सदस्य डॉ. विवेक देबरॉय हे या परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत.
आर्थिक विषयांचा अभ्यास करून त्यावर पंतप्रधानांना सल्ला देण्याची जबाबदारी या परिषदेवर असणार आहे.
डॉ. सुरजीत भल्ला (अस्थायी सदस्य), डॉ. रथिन रॉय (अस्थायी सदस्य), डॉ. अशिमा गोयल (अस्थायी सदस्य) या अर्थजगतातील दिग्गजांना परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
निती आयोगाचे सदस्य आणि मुख्य सल्लागार रतन वाटाळ यांची या परिषदेवर सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आर्थिक सल्लागार परिषद स्वायत्त असणार आहे. आर्थिक विषय तसेच त्या अनुशंगाने येणाऱ्या अन्य विषयांबाबत सरकारला विशेषत: पंतप्रधानांना सल्ला देण्याचे अधिकार या परिषदेला असणार आहेत.
महत्त्वाच्या आर्थिक विषयांचा सखोल अभ्यास करून त्यावर पंतप्रधानांना सल्ला देणे, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींवर सतत लक्ष ठेवणे आणि पतंप्रधानांनी वेळोवेळी निश्चित केलेल्या कामांचा निपटारा करणे, अशा जबाबदाऱ्या प्रामुख्याने या परिषदेवर असणार आहेत.
मुख्य परीक्षेचे पात्रतेचे प्रमाण वाढविले
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणाच्या निकषामध्ये बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यापुढे मुख्य परीक्षेसाठी एकूण पदांच्या १२ पटींऐवजी १५ ते १६ पट विद्यार्थी पात्र ठरविले जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये पदभरतीसाठी आयोगाने भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेमध्ये पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
आतापर्यंत जेवढी पदे आहेत, त्याच्या १२ पट विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जात होते. त्यानुसार या परीक्षेतील गुणांचे कट ऑफ ठरविले जात होते.
आता पात्रतेचा हा निकषच बदलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या पुढील परीक्षांसाठी एकूण पदांच्या १५ ते १६ पट विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.
पूर्व परीक्षेचे कट ऑफ तुलनेने काही प्रमाणात खाली येणार असल्याने मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढणार आहे.
राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. लाखो विद्यार्थी विविध परीक्षा देत असले तरी तुलनेने पदभरतीचे प्रमाण कमी होत चालले आहे.
परिणामी विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतानाही मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. पूर्व परीक्षेत चांगले गुण मिळवूनही हजारो विद्यार्थ्यांची संधी एका गुणामुळेही दवडली जाते.
या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर आता मुख्य परीक्षेतील स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
महाराष्ट्राचे पहिले डीआयजी के पी मेढेकर यांचे निधन
महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कृष्णकांत पांडुरंग मेढेकर यांचे २५ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
मेढेकर यांनी १९४९ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची सनदी पोलीस अधिकारी म्हणून निवड झाली.
तेथून १९५६मध्ये पुणे रेल्वे अधीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. आयपीएस अधिकारी असलेले मेढेकर हे के पी मेढेकर या नावाने प्रसिद्ध होते.
ते महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक ठरले. २५ फेब्रुवारी १९८२ ते ३० एप्रिल १९८५ या दरम्यान ते पोलीस महासंचालकपदी कार्यरत होते.
१९८२मध्ये चांगल्या वेतनासह विविध मागण्यांसाठी पोलिसांनीच बंड पुकारले होते. मेढेकर यांनी बंड शमवण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.
त्यांनी मुंबई पोलीस दलाबरोबरच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, केंद्रीय गुप्तवार्ता विभागासह अनेक विभागांत महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले.
त्यांच्यावर पंतप्रधानांचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.
माणिक भिडे यांना भीमसेन जोशी पुरस्कार
जयपूर-अत्रौली घराण्याच्या जेष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांची यंदाचा महाराष्ट्र शासनातर्फे शास्त्रीय संगीतासाठी दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला राज्य शासनातर्फे पं. भीमसेन जोशी यांच्या नावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
पाच लाख रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. जसराज, प्रभा अत्रे, पं. राम नारायण, परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
माणिक भिडे यांनी मधुकरराव सडोलीकर यांच्याकडून गाण्याचे शिक्षण घेतले. त्यांनी गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडेही १५ वर्षे गायनाचे धडे गिरवले.
त्यानंतर त्यांनीही अनेक शिष्यांना घडवले. माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतकिा वर्दे अशा अनेक शिष्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
माणिकताई आकाशवाणीच्या मान्यता प्राप्त कलाकार असुन देश व विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.
अॅंजेला मर्केल चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी
जर्मनीच्या चॅन्सेलर, कन्झर्वेटिव्ह ख्रिश्चन युनियनच्या (सीडीयू) नेत्या अँजेला मर्केल यांनी निवडणुकीत सलग चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलरपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळवला आहे.
मर्केल चौथ्यांदा विजयी झाल्या असल्या, तरी संपूर्ण बहुमत मिळवण्यात मर्केल यांचा पक्ष अपयशी ठरला आहे. निवडणुकीमध्ये त्यांच्या सीडीयू पक्षाला ३२.५ टक्के मते मिळाली.
मर्केल यांचे प्रमुख विरोधक सोशल डेमॉक्रेट पक्षाचे पक्षाचे मार्टिन शुल्झ यांना २० ते २१ टक्के मते मिळवली असून, हा पक्ष देशातील दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा पक्ष ठरला आहे.
अत्यंत कडवा उजवा पक्ष मानल्या जाणाऱ्या अल्टर्नेटिव्ह फॉर दॉइचलॅंड (एएफडी)ला अपेक्षेपेक्षा मतांची जास्त टक्केवारी मिळालेली आहे. हिटलरच्या काळानंतर प्रथमच वंशवादी आणि परदेशी लोकांना विरोध करणारा पक्ष संसदेत आला आहे.
६३ वर्षांच्या मर्केल या गेली १२ वर्षे त्या जर्मनीच्या चॅन्सेलर असून, जागतिक पातळीवर खंबीर आणि प्रभावशाली नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
या नव्या आघाडी सरकारमुळे मर्केल पुन्हा चॅन्सेलर होणार असल्या तरी त्यांच्या पक्षाचा जनाधार कोसळलेला दिसत असून त्यांची लोकप्रियताही घटल्याचे दिसत आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये सोशल डेमोक्रॅटिकला ही सर्वात कमी मते मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापुरला पहिला क्रमांक
स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापुरने देशभरातील सर्वच शहरांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
स्वच्छतेच्या गुणांकनात कोल्हापूरने सर्वाधिक ९० गुण मिळवले आहेत. २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामगिरीवर हे गुणांकन ठरले आहे.
२ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती निमित्ताने केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराने कोल्हापूरचा गौरव करण्यात येणार आहे.
स्वच्छता दर्पण पुरस्कारासाठी पुणे विभागातील कोल्हापूर,सांगली व सातारा हे तीन ही जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या स्पर्धेसाठी केंद्र शासनाने त्या जिल्ह्याची कामगिरी, शाश्वत्ता आणि पारदर्शकता या तीन घटकांवर आधारित जिल्हयांचे गुणांकन केले आहे.
चंदा कोचर आणि शिखा शर्मा जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत
चंदा कोचर आणि शिखा शर्मा या दोन भारतीय महिलांनी अमेरिकेबाहेरील व्यावसायिक क्षेत्रातील जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत नव्याने स्थान मिळविले आहे.
अमेरिकेबाहेरील जगातील सर्वांत शक्तिशाली व्यावसायिक महिला होण्याचा मान बँको सँटांडेर समूहाच्या कार्यकारी चेअरमन अॅना बोटीन यांनी पटकावला आहे.
या यादीत आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ चंदा कोचर पाचव्या स्थानी असून, अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ शिखा शर्मा २१व्या स्थानी आहेत.
पेप्सीकोच्या चेअरमन आणि सीईओ इंद्रा नुयी यांनी अमेरिकेतील सर्वांत शक्तिशाली महिला व्यावसायिकांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
पहिल्या स्थानी जनरल मोटर्सच्या चेअरमन मॅरी बारा या आहेत. तिसऱ्या स्थानी लॉकहीड मार्टिनच्या चेअरमन व सीईओ मेरीलीन हेवसन या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री सहज बिजली योजने’चे (सौभाग्य) उद्घाटन करताना ‘दीनदयाळ ऊर्जा भवना’चेही २५ सप्टेंबर २०१७ रोजी लोकार्पण केले.
यावेळी त्यांनी प्रत्येक घरात वीज देणार असल्याची घोषणा केली. देशातील सुमारे ४ कोटी जनतेला या योजनेंतर्गत मोफत वीज उपलब्ध होणार आहे.
या योजनेंतर्गत ३१ मार्च २०१९पर्यंत देशातल्या सर्व घरांमध्ये वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून, यासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
आर्थिक जनगणनेत ज्यांचे नाव आहे त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. ज्यांचे नाव या योजनेत नाही त्यांना ५०० रुपये भरुन या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
या योजनेद्वारे सरकार प्रत्येक गावात कॅम्प घेऊन वीज कनेक्शन पुरविणार आहे. त्यामध्ये प्रत्येक घरात १ एलईडी बल्ब व मोबाईल चार्जिंग कनेक्शन देण्यात येणार आहे.
जिथे वीज नाही तिथे ५ एलईडी बल्ब, बॅटरी आणि एक पंखा यांचा एक सोलर पॅक देणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे.
धोनी आणि सिंधूची पद्मभूषणसाठी शिफारस
देशातील प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी ‘बीसीसीआय’ने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावाची शिफारस केली आहे.
आतापर्यंत भारताला दोन विश्वचषक (एक एकदिवसीय, एक टी-२०) जिंकवून देण्यात धोनीचा महत्वाचा वाटा आहे.
कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही क्षेत्रात धोनीने आतापर्यंत केलेल्या धावा, संघ उभारणीत त्याचे असलेले योगदान यामुळेच त्याच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
धोनीने ३०२ वन-डे सामन्यांमध्ये ९७३७ धावा, ९० कसोटी सामन्यांमध्ये ४८७६ धावा तसेच ७८ टी-२० सामन्यांमध्ये १२१२ धावा केल्या आहेत.
कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये मिळून धोनीच्या नावावर १६ शतके असून, नुकतेच धोनीने अर्धशतकांचं शतक पूर्ण केले होते.
यष्टीरक्षक म्हणून तिन्ही प्रकारांमध्ये धोनीने ५८४ झेल घेतले आहेत. तर आतापर्यंत १६३ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.
याआधी धोनीला ‘राजीव गांधी खेलरत्न’, ‘अर्जुन’, ‘पद्मश्री’ अशा मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
धोनीच्या नावावर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब झाल्यास पद्मभूषण पुरस्कार मिळणारा धोनी ११वा क्रिकेटपटू ठरणार आहे.
याआधी सचिन तेंडुलकर, कपील देव, सुनील गावसकर, राहुल द्रवीड, चंदू बोर्डे यासारख्या दिग्गज खेळाडूंना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचे निधन
साहित्य आणि पत्रकारिता अशा दोन्ही क्षेत्रांवर आपली मोहोर उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू (वय ७६ वर्षे) यांचे २५ सप्टेंबर रोजी निधन झाले.
मराठी साहित्य विश्वात राजकीय कादंबऱ्या फारशा नसताना अरुण साधू यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून राजकीय विषय अत्यंत कुशलतेने हाताळले.
त्यांनी प्रारंभी केसरी, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, द स्टेटसमॅन आदि वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली. ‘फ्री प्रेस जर्नल’चे संपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.
१९८९पर्यंत त्यांनी सक्रीय पत्रकारिता केली. पुढे क्रियाशिल पत्रकारिता सोडून ते स्तंभलेखन व कादंबरी लेखनाकडे वळले.
‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांमधून त्यांनी महानगरीय वास्तव जीवन व महाराष्ट्रातील राजकारणाचा टोकदार वेध घेतला. या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले.
त्यांनी कादंबरीकार, विज्ञानलेखक, इतिहासलेखक म्हणून आजतागायत भरगच्च लेखनकार्य केले आहे.
८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९९५ ते २००१ पर्यंत त्यांनी पुणे वृत्तपत्रविद्या विभागात विभागप्रमुख म्हणूनही काम केले.
अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव व कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
जयललिता मृत्युप्रकरणी चौकशी आयोग स्थापन
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा ५ डिसेंबर २०१६ रोजी चेन्नईतील अपोलो रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
अण्णा द्रमूककडूनही त्यांच्या मृत्यूमागचे खरे कारण जाणून घेण्याची सातत्याने मागणी करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर, आता तामिळनाडूतील इ पलानीसामी सरकारने याप्रकरणी चौकशी आयोग स्थापन केला आहे.
निवृत्त न्यायाधीश ए अरूमुगासामी यांच्या नेतृत्वाखालील हा आयोग या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करेल.
यापूर्वी उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेलवम यांनीही अनेकवेळा जयललितांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती.
कार्ती चिदंबरम यांच्यावर ईडीकडून कारवाई
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर अंमलबजावणी संचलनलायकडून (ईडी) कारवाई करण्यात आली आहे.
‘ईडी’ने कार्ती चिदंबरम यांची १.१६ कोटींची संपत्ती जप्त करताना, त्यांची बँक खाती आणि ९० लाख रूपये रकमेच्या मुदत ठेवी गोठविल्या आहेत.
कार्ती चिदंबरम यांनी आपली संपत्ती विकण्याचा आणि बँक खाती बंद करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.
एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून कार्ती चिदंबरम हे तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत.
कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता.
पी चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात विदेशी गुंतवणुकीसाठी मंजूरी दिली होती.
तसेच सत्य परिस्थिती लपवून ठेवण्यासाठी विदेशी गुंतवणुकीची रक्कम चुकीची दाखवण्यात आली, अशी माहिती ‘ईडी’च्या तपासात उघड झाली आहे.
सीबीआयने ४ ऑगस्ट रोजी कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. यामुळे त्यांच्यवर देश सोडून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली होती.
देशातील नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ सप्टेंबरला नवीन ‘सौभाग्य योजना’ सुरू करणार आहेत.
आरएसएसचे ज्येष्ठ नेते आणि जनसंघाचे संस्थापक सदस्य दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबरला ही योजना सुरू केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत डिसेंबरपर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला जाईल.
सज्जन जिंदाल यांनी घेतला हरिश्चंद्र घाट दत्तक
उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी वाराणसी (काशी) येथील प्रसिद्ध हरिश्चंद्र घाटाच्या नूतनीकरणाची आणि दुरुस्तीची जबाबदारी घेत हा घाट दत्तक घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात हा घाट असून, आता ३.५ कोटी रुपये खर्च करुन या घाटावर स्वच्छता, नूतनीकरण आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे.
एखाद्या धार्मिक घाटाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुढाकार घेणारे सज्जन जिंदाल हे पहिलेच उद्योगपती आहेत.
हे काम ३ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यासाठी जिंदल स्टिल वर्कने (जेएसडब्ल्यू) केंद्र सरकारची परवानगी घेतली आहे.
अंत्यसंस्कारासाठी वाराणसीतील मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाट प्रसिद्ध आहेत. हरिश्चंद्र घाटावर दिवस-रात्र विधी होतात. येथे विद्युत शवदाहिनीदेखील आहे.
या घाटावर दगडी बांधकाम करण्यात येणार असून, अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या घाटावरून निघणाऱ्या धुराबाबत कंपनी तपासणी करणार आहे. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाणी आणि पूजेचे साहित्य यांचा नदीतील प्रवाह रोखण्यात येणार आहे.
घाटावरील विजेचे खांब पुन्हा उभारण्यात येणार आहेत. या संपूर्ण कामासाठी सुमारे ३.५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
चीनकडून उत्तर कोरियावर निर्बंध
उत्तर कोरियाला करण्यात येणाऱ्या तेलाच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा तसेच, उत्तर कोरियातील कापडाच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय चीनने घेतला आहे.
अणु चाचण्या आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्यामुळे उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यासाठी चीनवर जागतिक पातळीवरुन दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने हा निर्णय घेतला आहे.
चीन हा उत्तर कोरियाचा सर्वांत निकटवर्ती देश असून, देशाच्या एकूण परकी व्यापारापैकी ९० टक्के व्यापार चीनशी होतो.
चीन हा उत्तर कोरियाचा व्यापारातील सर्वांत मोठा भागीदार आहे. चीनने कापड आयातीवर बंदी घातल्याने उत्तर कोरियाला मोठा फटका बसणार आहे.
तसेच चीनने आता कोळसा, लोहखनिज, सागरी खाद्य आणि अन्य वस्तूंची उत्तर कोरियातून होणारी आयात थांबविली आहे.
याबरोबरच द्रवरुप नैसर्गिक वायूची उत्तर कोरियाला होणारी निर्यात चीनने तत्काळ थांबवली असून, कच्चा तेलाची आयात १ ऑक्टोबरपासून मर्यादित करण्यात येणार आहे.
उत्तर कोरियाने अणु चाचण्या व क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने निर्बंध लादले आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या सर्व देशांकडून उत्तर कोरियाला होणारी कच्च्या तेलाची निर्यात मर्यादित करण्यात आली आहे.
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांना मुदतवाढ
केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ १ वर्षांनी वाढवला आहे. ते ऑक्टोबर २०१८पर्यंत पदावर कायम राहतील.
ऑक्टोबर २०१४मध्ये तीन वर्षांसाठी सुब्रह्मण्यम यांची भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.
सुब्रह्मण्यम यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए तर त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातून एमफिल आणि डी फिलचे शिक्षण पूर्ण केले आहे.
१९८८-९२ दरम्यान ‘गॅट’मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून हावर्ड युनिव्हर्सिटीच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि जॉन हॉपकिन्सच्या स्कूल फॉर अॅडव्हान्स इंटरनॅशनल स्टडीजमध्ये अध्यापनाचे कार्यही केले आहे.
इंडिया टर्न: अंडरस्टँडिंग द इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन (२००८) आणि इक्लिप्स: लिव्हिंग इन शॉडो ऑफ चायनाज इकॉनॉमिक डॉमिनन्स (२०११) ही दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
तसेच २०१२मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘हू नीड्स टू ओपन द कॅपिटल अकाउंट्स?’ या पुस्तकाचे ते सह-लेखक आहेत.
इराणकडून क्षेपणास्त्राची चाचणी
इराणने अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता खोरामशहर नावाच्या नवीन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची २२ सप्टेंबर रोजी चाचणी केली.
यापूर्वी इराणने क्षेपणास्त्र चाचणी केल्यामुळे त्यांच्यावर अमेरिका व युरोपियन युनियनने अनेक निर्बंध टाकले होते.
त्यानंतर मागच्यावर्षी इराणने आपला अण्वस्त्रे विकसित करण्याचा कार्यक्रम नियंत्रणात ठेवण्याचा ऐतिहासिक करार केला होता.
त्यामुळे अमेरिका आणि युरोपियन युनियनने त्यांच्यावरील तेलाचे आणि आर्थिक निर्बंध मागे घेतले होते.
निर्बंध काढून टाकण्यात आल्यामुळे इराणचा आंतरराष्ट्रीय बाजारात तेल विकण्याचा मार्ग मोकळा झाला तसेच इराणची १०० अब्ज अमेरिकन डॉलर किमतीची अडकवून ठेवलेली मालमत्ताही खुली करण्यात आली होती.
इराणने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम असाच सुरु ठेवला तर, त्यांच्यावर आणखी निर्बंध येऊ शकतात.
आनंदतीर्थ सुरेश यांना पॉल बॅरन पुरस्कार
बेंगळूरुचे तरुण संशोधक आनंदतीर्थ सुरेश यांना मार्कोनी सोसायटीच्या वतीने दिला जाणारा पॉल बॅरन तरुण संशोधक पुरस्कार जाहीर झाला आहे.
रेडिओचा शोध लावणारे इटलीचे संशोधक गुलिमो मार्कोनी यांच्या कुटुंबीयांनी संदेशवहन क्षेत्रातील संशोधनाला उत्तेजन देण्यासाठी मार्कोनी सोसायटी ही संस्था स्थापन केली.
संदेशवहन क्षेत्रातील संशोधन करण्याऱ्या तरुण संशोधक आणि अभियंत्यांसाठी १९७४मध्ये गुलिमो मार्कोनी यांच्या कन्येने हा पुरस्कार सुरू केला.
आनंदतीर्थ सुरेश हा २८ वर्षांचा असून, त्याने इंटरनेटचे वेगवान कनेक्शन कमी किमतीत मिळावे यासाठी वेगळे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
सुरेशच्या अलगॉरिथममुळे माहिती देवाणघेवाणीचा खर्च कमी झाला आहे. कारण यात माहितीचे संकलन वेगळ्या रूपात करून ती पाठवण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले, जे किफायतशीर आहे.
सुरेशने आयआयटी मद्रासमधून २०१०मध्ये भौतिकशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर सॅन्टीयागोतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून मास्टर्स व डॉक्टरेट या दोन्ही पदव्या त्याने घेतल्या.
सध्या गुगलमध्ये विकसनशील देशांच्या लोकांना इंटरनेटचा फायदा मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानात्मक उत्तरे शोधण्यासाठी तो काम करीत आहे.
कॅनडा करणार पंढरपूरचा विकास
भारत आणि कॅनडा या दोन देशांच्या मैत्रीला १५० वर्ष पूर्ण होत असून, या निमित्ताने कॅनडा सरकार भारतातील एका शहराचा विकास करणार आहे.
कॅनडा सरकारने यासाठी महाराष्ट्रातील पंढरपूरची निवड केली असून, कॅनडा पंढरपूरमध्ये दोन हजार कोटीची गुंतवणूक करणार आहे.
पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकार प्लान आखणार आहे. येत्या तीन ऑक्टोंबरला कॅनडा सरकारचे प्रतिनिधी चर्चेसाठी पंढरपूरला येणार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार के जे सिंग यांची हत्या
पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकार के. जे. सिंग आणि त्यांच्या मातोश्रीं गुरचरन कौर यांची राहत्या घरात हत्या करण्यात आली.
या घटनेचा पंजाबमध्ये सर्वच स्तरातून निषेध होत असून, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे.
सिंग यांच्या घरातून काही मौल्यवान दागिने आणि घरासमोरील कार गायब असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे.
पंजाब पोलिसांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नेमणूक केली आहे.
सिंग इंडियन एक्स्प्रेसच्या चंदिगड आवृत्तीचे तसेच अन्य ख्यातनाम वृत्तपत्रांच्या चंदिगडमधील आवृत्तीचे संपादक होते.
पत्रकाराची हत्या होण्याची गेल्या महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी कर्नाटकात गौरी लंकेश यांची आणि त्रिपुरामध्ये शंतनू भौमिक या पत्रकाराची हत्या करण्यात आली होती.
डाव्या विचारसरणी विरोधात मत मांडणाऱ्या गौरी लंकेश या बंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक होत्या.
पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र चाचणी
पाकिस्तानच्या नौदलाने अरबी समुद्राच्या उत्तर भागात हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.
एका हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेल्या या अँटी शिप मिसाईलची (जहाज नष्ट करणारे क्षेपणास्त्र) ही चाचणी यशस्वी झाली. पाकिस्तानच्या युद्ध क्षमतेला या चाचणीमुळे वेगळी उंची लाभली आहे.
केंद्र सरकारने आयपीएस अधिकारी रजनीकांत मिश्रा यांची नुकतीच सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.
मिश्रा हे १९८४च्या तुकडीतील उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी असून, ३१ ऑगस्ट २०१९पर्यंत ते या पदावर राहणार आहेत.
विज्ञान शाखेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले रजनीकांत मिश्रा हे मूळचे बिहारचे आहेत.
२०१२मध्ये सीमा सुरक्षा दलात महानिरीक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. पुढे २०१४मध्ये त्यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढविताना त्यांना अतिरिक्त महानिर्देशकपदावर बढती देण्यात आली होती.
अलीकडेच त्यांची बीएसएफच्या विशेष महासंचालकपदी तसेच उत्तर प्रदेशातील पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
सशस्त्र सीमा बलाच्या सध्याच्या महासंचालक अर्चना रामसुंदरम या १९८०च्या तुकडीतील तामिळनाडू केडरच्या आयपीएस अधिकारी ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत असल्याने त्यांची जागा आता मिश्रा घेतील.
टाटा सन्स होणार प्रायव्हेट लिमिटेड
टाटा समूह लवकरच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होणार असून, टाटा समूहाची पालक कंपनी असणाऱ्या टाटा सन्सच्या प्रवर्तक व समभागधारकांनी एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली.
टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये भागधारकांनी टाटा सन्स सार्वजनिकवरून खासगी करण्याच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी दिली.
टाटा सन्सच्या प्रशासनाला कंपनी कायदा २०१४अंतर्गत ‘डीम्ड पब्लिक’ कंपनीचा दर्जा मान्य नव्हता. याचमुळे कंपनीचे खासगीकरण करण्याची तयारी सुरू होती.
टाटा सन्सचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे कुटुंबीय ‘टाटा’चे समभाग बाहेरील गुंतवणूकदारांना विकणार असण्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला. यामुळे मिस्त्रींच्या समभागविक्रीवर मर्यादा येणार आहेत.
टाटा कंपनीच्या खासगीकरणाला मिस्त्री कुटुंबीयांचा विरोध होता. टाटा कंपनीत मिस्त्री कुटुंबीयांचे १८.४ टक्के हिस्सा आहे.
‘उबर’चा लंडनमधील परवाना संपणार
‘उबर’ या अमेरिकी कंपनीला लंडनमधील टॅक्सी सेवेच्या परवान्याचे नुतनीकरण लंडन परिवहन विभागाने नकार दिला आहे.
३० सप्टेंबरला ‘उबर’चा लंडनमधील परवाना संपणार असून परिवहन विभागाच्या या निर्णयाला ‘उबर’ला न्यायालयात आव्हान देता येणार आहे.
ऑनलाइन टॅक्सी सेवा देणारी ‘उबर’ ही अमेरिकेतील कंपनी असून जभरातील विविध शहरांमध्ये ‘उबर’तर्फे टॅक्सी सेवा दिली जाते.
परंतु ‘उबर’ लंडनमध्ये टॅक्सी सेवा देण्यास सक्षम आणि योग्य नाही, असे सांगत ‘ट्रान्स्पोर्ट ऑफ लंडन’ने ‘उबर’चा परवाना नुतनीकरणासाठी अर्ज फेटाळून लावला आहे.
‘उबर’ने वाहनचालकांची निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासली नाही. तसेच चालकांच्या गुन्ह्यांप्रकरणी ‘उबर’ने दाखवलेला निष्काळजीपणा यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील २ वर्षे सुधारित ‘खेलो इंडिया’ कार्यक्रम राबविण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी १७५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
देशाच्या तरुण पिढीमध्ये खेळांची संस्कृती रुजावी आणि त्यातून विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे नाव गाजविणारे खेळाडू तयार व्हावेत हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
त्यासाठी विविध क्रीडा प्रकारांतील १००० तरुण व प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून त्यांना सलग ८ वर्षे प्रत्येकी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.
मुलांमधील क्रीडा कौशल्य लहान वयातच हेरून, दीर्घकालीन प्रशिक्षणाने गुणवान खेळाडू घडविण्याची अशी योजना देशात प्रथमच राबविली जात आहे.
देशभरातील निवडक २० विद्यापीठांना क्रीडा नैपुण्याची केंद्रे (स्पोर्टिंग एक्सलन्स हब) म्हणून विकसित करण्याचाही या कार्यक्रमात समावेश आहे.
त्यामुळे गुणवान खेळाडूंना त्यांच्या क्रीडाप्रकारातील निपुणता प्राप्त करत असतानाच जोडीला औपचारिक पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे सुलभ होईल.
याच कार्यक्रमात १० ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘राष्ट्रीय तंदुरुस्ती मोहीम’ हाती घेतली जाईल. शरीराने धट्टीकट्टी व खेळांमध्ये रस घेणारी तरुण पिढी निर्माण करणे हा याचा हेतू आहे.
सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘रयत क्रांती संघटना’ या नव्या संघटनेची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात मतभेद झाले होते.
मंत्रिपदावर असतानाही शेतकऱ्यांच्या हिताची तसेच संघटनेशी सुसंगत भूमिका न घेणे, असा ठपका ठेपत पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची ऑगस्टमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर, कोल्हापूरमध्ये सदाभाऊ खोत यांनी ‘रयत क्रांती संघटना’ या नवीन संघटनेची घोषणा केली.
‘संवादातून संघर्षाकडे’ असे या संघटनेचे घोषवाक्य असून, संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी हायटेक टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
नारायण राणे अखेर काँग्रेसमधून बाहेर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेतील अनेकांचा त्यांना पाठिंबा असल्याचा तसेच शिवसेनेचे २७ आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोटही राणेंनी केला.
राजकीय कारकीर्दीतील नारायण राणे यांचे हे दुसरे बंड आहे. वयाच्या १६व्या वर्षापासून शिवसेनेमधून राणे यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली.
शिवसेनेमध्ये स्थानिक शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या नारायण राणेंची महत्वकांक्षी आणि आक्रमक नेते अशी ओळख आहे.
१९९५साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडे दुग्धविकास नंतर महसूलमंत्री पदाची जबाबदारी देण्यात.
त्यानंतर १९९९मध्ये मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून त्याजागी राणेंची नियुक्ती करण्यात आली.
पण राणे यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ हा काही महिन्यांचा होता. कारण त्यानंतर निवडणूका झाल्या आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले.
शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राणे यांच्यामध्ये झालेल्या मतभेदातून ३ जुलै २००५ रोजी राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.
त्यावेळी नारायण राणेंसोबत १० पेक्षा जास्त आमदार, हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेतून फुटून बाहेर पडले.
त्यानंतर नारायण राणेंनी २६ जुलै २००५ रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु वारंवार आश्वासन देऊनही राज्याचे मुख्यमंत्रीपद न दिल्यामुळे राणेंनी आता कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे.
जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांमध्ये ३ भारतीय
जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने ‘१०० ग्रेटेस्ट लिव्हिंग बिझनेस माईंडस’ या नावाने जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर केली आहे.
यामध्ये लक्ष्मी मित्तल, रतन टाटा आणि विनोद खोसला या भारताच्या तीन उद्योजकांनी स्थान पटकावले आहे. हे तीनही व्यवसायिक फोर्ब्सच्या यादीनुसार लिविंग लिजेंड्स आहेत.
यापैकी लक्ष्मी मित्तल हे ‘आर्सेलो मित्तल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. तर विनोद खोसला हे सन मायक्रोसिस्टमचे सह-संस्थापक आहेत.
या यादीत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे. ‘फोर्ब्स’ने त्यांचा उल्लेख ‘विक्रेता आणि विशेष गुण असलेला रिंगमास्टर’ असा केला आहे.
याशिवाय, या यादीमध्ये अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन, बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन बफे आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेटस यांचाही समावेश आहे.
ही यादी तयार करताना फोर्ब्सकडून प्रत्येक क्षेत्रात नवनवीन कल्पना राबवणाऱ्या आणि जगावर दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचा विचार करण्यात आला.
मेक्सिकोला भूकंपाचा जोरदार तडाखा
मेक्सिकोमध्ये १९ सप्टेंबर रोजी झालेल्या भयावह भूकंपाने २१ शाळकरी मुलांसह २५०हून अधिक जणांचे बळी घेतले असून, प्रचंड आर्थिक हानीही घडवून आणली आहे.
या ७.१ रिश्टर तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाच्या तडाख्याने अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकून पडले आहेत.
मदत व बचाव पथके ढिगारे उपसून त्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.
मेक्सिको सिटीबरोबरच प्युएब्ला, मॉरेलॉस, मेक्सिको स्टेट आणि गुएर्रेरो येथे जीवितहानी झाली.
मेक्सिकोमध्ये १९८५मध्ये झालेल्या भयानक विध्वसंकारी भूकंप झाला होता. त्यावेळी १० हजार लोक मृत्युमुखी पडले होते.
या भूकंपाआधी १२ दिवसांपूर्वी दक्षिणेकडील दोन प्रांतांत आलेल्या भूकंपात १०० जण ठार, तर दोनशेहून अधिक जखमी झाले होते.
मेक्सिकोचे पंतप्रधान: एन्रिके पेना निएटो
गुगलकडून HTCच्या स्मार्टफोन बिजनेसचे अधिग्रहण
गुगलने तायवानची कंपनी HTCकडून स्मार्टफोन बिजनेस खरेदी केला आहे. गुगलने सुमारे १.१ अब्ज डॉलरमध्ये हा करार केला.
एचटीसीच्या टीमसोबत काम करून सॅमसंग आणि अॅपलला टक्कर देण्याचा गुगलचा प्रयत्न असणार आहे.
गुगल आणि एचटीसी यांनी यापूर्वीही एकत्र काम केले आहे. गुगलचा पहिला नेक्सस डिव्हाइस देखील एचटीसीनेच बनवला होता.
पण या करारामुळे एचटीसीचा मोबाइल फोनचा बिझनेस ब्लॅकबेरीप्रमाणे बंद होणार नाही. यापुढेही एचटीसी स्वतःच्या ब्रॅंडसाठी काम करेल.
यापुर्वी गुगलने २०११मध्ये मोटोरोला कंपनी १२.५ अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली होती आणि काही स्मार्टफोनही लॉन्च केले होते. मात्र, कालांतराने मोटोरोलाला लिनोव्होने खरेदी केले.
विदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याची प्रत्यक्ष कारवाई अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केली आहे.
मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये मल्ल्याच्या युनायटेड ब्रेव्हरीज लिमिटेड (यूबीएल) कंपनीच्या १०० कोटी रूपयांच्या समभागांचे मालकी हक्क केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.
‘स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.’द्वारे (SHCIL) हस्तांतरित झालेले समभाग विजय मल्ल्याच्या थेट मालकीचे होते. ते कुठेही तारण नव्हते.
मनी लाँड्रिंग कायद्याच्या कलम ९ अन्वये ते जप्त करण्याच्या सूचना देणारे पत्र ईडीने दोन महिन्यांपूर्वी SHCIL कंपनीला पाठविले होते.
याशिवाय मॅक्डॉवेल होल्डिंग या कंपनीतील सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे समभागही अशाच पद्धतीने जप्त करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.
मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार समभागधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला फरारी घोषित केल्यास विशेष न्यायालय संबंधित समभागधारकाची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देऊ शकते.
मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्स या बंद पडलेल्या कंपनीकडे विविध बँकांचे ६ हजार कोटी थकले आहेत. या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण समिती
राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी काम मानव संसाधन मंत्रालयाने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण समिती स्थापन केली आहे.
या राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण समितीवर मुंबई कॉलेज ऑफ फिजीशियनचे (सीपीएस) अध्यक्ष डॉ. गिरीष मैंदरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षणात कोणते बदल घडवायला हवेत?, यासाठी ही समिती शिफारशी देणार आहे.
डॉ. गिरीष मैंदरकर हे बालरोगतज्ञ असून ते मुळचे लातूरचे आहेत. मुंबईतल्या सगळ्यात जुन्या सीपीएस या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
या समितीचे समन्वयक म्हणून बेंगलोरच्या असोसिएशन ऑफ हॉस्पीटल सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे अध्यक्ष डॉ. अलेक्झांडर थॉमस यांना निवडण्यात आले आहे.
याशिवाय या समितीवर नारायणा हेल्थ केअरचे डॉ. देवी शेट्टी, ख्रिश्चन मेडीकल कॉलेजचे डॉ. अन्ना पुलीमोड, राष्ट्रीय परीक्षा परिषदचे डॉ. बबीतोष बिश्वास, हेल्थ युनिर्व्हसिटी असोसिएशन दिल्लीचे अध्यक्ष डॉ. ओ. पी. कारला, बेंगलोरच्या निमहॅम्सचे संचालक डॉ. बी. एन. गंगाधर व एअरफोर्स मेडीकल सर्व्हिसेसचे महासंचालक डॉ. पवन कपूर यांचा समावेश आहे.
मार्क ब्युमॉन्टची सायकलने पृथ्वी प्रदक्षिणा
मार्क ब्युमॉन्ट या ब्रिटिश सायकलपटूने ७८ दिवसांत सायकलने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून सर्वात कमी वेळात जगप्रवास करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
याबरोबरच एका महिन्यात सर्वात जास्त अंतर सायकल चालविल्याचा नवा जागतिक विक्रमही मार्कने आपल्या नावे केला आहे.
दररोज सरासरी १८ तास याप्रमाणे सायकल चालवून मार्कने पोलंड, रशिया, मंगोलिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे देश पार केले.
पॅरिसमधील ‘आर्क डी ट्रायम्फ’ (विजय कमान) येथे आपल्या या १८ हजार मैलाच्या (२९ हजार किमी) सफरीची त्याने सांगता केली.
सायकलने ही पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्यास मार्कला ७८ दिवस, १४ तास ४० मिनिटे एवढा वेळ लागला.
सायकलने सर्वात कमी वेळात जगप्रवास करण्याचा हा नवा विक्रम असल्याचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने जाहीर केले.
या आधीचा विक्रम अँड्र्यू निकलसन या न्यूझीलंडच्या सायकलपटूच्या नावे होता. त्याने ही सफर १२३ दिवसांत पूर्ण केली होती.