चालू घडामोडी : २१ नोव्हेंबर

पृथ्वी २चे यशस्वी प्रक्षेपण

 • भारताने ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर येथून पृथ्वी २ या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. 
 • अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असे हे क्षेपणास्त्र २००३मध्ये सैन्यात दाखल झाले होते.
 • पृथ्वी २ ला दोन इंजिने आहेत. द्रवरुप इंधनावरही हे क्षेपणास्त्र चालते. तसेच यामध्ये ५०० ते १००० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.
 • पृथ्वी २ मध्ये जमिनीवरुन जमिनीवर ३५० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात अचूक मारा करण्याची क्षमता आहे.
 • यापूर्वी १२ ऑक्टोबर २००९ला पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.
 • नऊ मीटर लांबीचे एकाच टप्प्यात थेट लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेले अतिशय प्रभावी स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.

इंटरनेट वर्गणीदारांच्या संख्येत महाराष्ट्र पहिला

 • सरकारी माहितीनुसार भारतातील इंटरनेट वर्गणीदारांच्या संख्येत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.
 • महाराष्ट्रात २९.४७ दशलक्ष इतके इंटरनेटधारक आहेत. त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक यांचा क्रमांक लागला आहे.
 • सरकारी माहितीनुसार मार्चअखेर भारतात ३४२.६५ दशलक्ष इतके इंटरनेट वर्गणीदार आहेत.
 • तामिळनाडूत त्यांची संख्या २८.०१ दशलक्ष, आंध्रात २४.८७ दशलक्ष, तर कर्नाटकात २२.६३ दशलक्ष इतकी आहे.
 • हिमाचल प्रदेशात सर्वात कमी इंटरनेट वर्गणीदार असून त्यांची संख्या ३.०२ दशलक्ष आहे.
 • तामिळनाडूत शहरी वर्गणीदार सर्वाधिक २१.१६ दशलक्ष आहेत, तर उत्तर प्रदेशात ग्रामीण वर्गणीदार सर्वाधिक म्हणजे ११.२१ दशलक्ष आहेत.
 • दिल्लीत इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या २०.५९ दशलक्ष होती, तर मुंबई व कोलकात्यात ती अनुक्रमे १५.६५ दशलक्ष व ९.२६ दशलक्ष होती.
 • सरकारने डिजिटल इंडियाला प्राधान्य दिले असून, भारत नेट प्रकल्प सर्व २.५ लाख ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी राबवला आहे.
 • भूमिगत फायबर लाइन्स व इतर साधनांचा वापर करून इंटरनेटची सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 • हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जात असून, मार्च २०१७पर्यंत १ लाख ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जाणार आहेत.

केहकशा बासूची बाल शांतता पुरस्कारासाठीच्या अंतिम यादीत निवड

 • बालकांच्या हक्कांमध्ये सुधारणा घडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या केहकशा बासू मूळ भारतीय वंशाच्या मुलीची निवड आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारासाठीच्या अंतिम तीन स्पर्धकांमध्ये करण्यात आली आहे.
 • या पुरस्कारासाठी जगभरातून १२० नावे पुढे आली होती. तज्ज्ञांनी त्यातून ही निवड केली.
 • केहकशासह कॅमेरूनमधील दिवीना मालौम आणि सीरियातील मुझून अलमेल्लेहान यांचीही निव झाल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय बालहक्क संघटनेने केली आहे.
 • शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त मोहम्मद युनूस यांच्या हस्ते २ डिसेंबर रोजी हॅंग्वे येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 
 • केहकशा ही आठ वर्षांची असताना तिने पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक मोहीम हाती घेतली होती.
 • टाकाऊ वस्तूंपासून पुनर्निर्माण करण्याविषयी तिने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली असून, यासाठी तिने ग्रीन होप नावाची एक संस्थाही स्थापन केलेली आहे.
 • ही संस्था दहा देशांमध्ये कार्यरत असून, टाकाऊ वस्तू गोळा करणे, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे आदी कामे तिच्या माध्यमातून होतात. 
 • दिवीना या १२ वर्षांच्या मुलीने कॅमेरूनमधील मुलांमध्ये अराजक स्थिती, संभाव्य धोके यांबाबत मोठी जागृती केली असून, ती त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे धडेही देत आहे.

उवेना फर्नांडिस यांना एएफसी रेफ्री विशेष पुरस्कार

 • भारताची महिला फुटबॉल रेफ्री उवेना फर्नांडिस हिला क्वालालांपूर येथे एएफसी रेफ्री विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • जॉर्डन येथे झालेल्या अंडर १७ महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे उवेना यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
 • अखिल भारतीय फुटबॉल संघटना अध्यक्ष: प्रफुल्ल पटेल

डॉ. डेन्टन कुली यांचे निधन

 • अमेरिकेतील पहिली कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करणारे हृदयशल्यचिकित्सक डॉ. डेन्टन कुली यांचे १८ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
 • कुली यांनी त्यांच्या आयुष्यात किमान १ लाख तरी हृदय शस्त्रक्रिया केल्या. आज या शस्त्रक्रिया सोप्या वाटतात, पण ज्या काळात त्यांनी हे काम सुरू केले तेव्हा तंत्रज्ञान आता इतके पुढे गेलेले नव्हते.
 • कुली यांनी मुलांच्या हृदयाच्या झडपा बदलण्यातही तंत्रज्ञान विकसित केले होते.
 • ४ एप्रिल १९६९ रोजी एका मरणाऱ्या रुग्णाला दात्याचे हृदय मिळत नव्हते, त्यामुळे त्याच्यावर त्यांनी कृत्रिम हृदयप्रत्यारोपण केले.
 • नैसर्गिक हृदय मिळेपर्यंत त्या रुग्णाला ६५ तास जिवंत ठेवण्यात त्यांना यश आले, पण तो रुग्ण नंतर दगावला. वैद्यकीय क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणारी ती घटना होती.
 • कुली यांनी वापरलेले कृत्रिम हृदय हे ह्य़ूस्टनच्या बेलर कॉलेज येथे डिबेकी यांनी तयार केले होते.
 • कुली यांचा जन्म २२ ऑगस्ट १९२० रोजी ह्य़ूस्टन येथे झाला. बाल्टीमोर येथील जॉन हॉपकिन्स संस्थेतून त्यांनी वैद्यकाची पदवी घेतली.
 • हार्ट लंग मशीन वापरून शस्त्रक्रिया करताना द्याव्या लागणाऱ्या रक्ताचे प्रमाण त्यांनी कमी केले, ही त्यांची मोठी कामगिरी होती.
 • जगातील पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा मान दक्षिण आफ्रिकेचे ख्रिश्चन बर्नार्ड यांच्या नावे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा