जगातील आर्थिकदृष्ट्या सक्षम ५० महानगरांची आकडेवारी ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जारी केली असून या यादीत दिल्ली ३०व्या स्थानावर असून मुंबईला ३१वे स्थान मिळाले आहे.
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ही जगातील स्वतंत्र आर्थिक सल्लागार संस्था आहे. या संस्थेने २०१५मध्ये २०० देशातील १०० औद्योगिक सेक्टर आणि ३ हजार शहरांचे आर्थिक विश्लेषण करुन हा अहवाल सादर केला आहे.
२०१५ मध्ये या विस्तारीत मुंबईसह मुंबईचा विकास दर क्रयशक्ती समानतेच्या (पीपीपी) ३६८ बिलियन अमेरिकन डॉलर होता.
तर दिल्ली व एनसीआरचा जीडीपी ३७० अरब डॉलर म्हणजे किमान २५,१६४ अरब रुपयेवर पोहचला आहे.
भविष्यात मुंबई आर्थिक राजधानीच्या या स्पर्धेत दिल्लीला मागे टाकेल अशी शक्यता नसल्याचेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
या संस्थेच्या मते २०३०मध्ये मुंबई आणि दिल्ली ही दोन्ही शहरे जगातील सर्वात मोठ्या आर्थिक केंद्रांपैकी एक असतील.
या संस्थेच्या अंदाजानुसार २०३०मध्ये आर्थिक सक्षमतेत दिल्ली ११व्या तर मुंबई १४ व्या स्थानी असेल.
मालिनी सुब्रमणियम यांना इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम पुरस्कार
भारतीय पत्रकार मालिनी सुब्रमणियम यांना न्यूयॉर्कचा ‘इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
संघर्षांत प्रसंगी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो.
छत्तीसगडमधील माओवादी व सुरक्षा दले यांच्यातील संघर्षांचा केंद्रबिंदू असेलेल्या बस्तर जिल्ह्यातील परिस्थिती जीव धोक्यात घालून मालिनी यांनी जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले.
त्या भागात पोलीस व सुरक्षा दलांनी महिला व मुलांवर केलेले अत्याचार, हत्या अशी प्रकरणे स्क्रोल या संकेतस्थळासाठी माहिती देणाऱ्या सुब्रमणियम यांनी हाताळली.
त्यात त्यांनी मानवाधिकार उल्लंघन व राजकारण यांचा संबंध जोडून दाखवला. परंतु या मार्गात त्यांना अनेक अडथळे आले.
अनेकदा पोलिसांनी त्यांचे जाबजबाब घेऊन त्यांचा छळ केला. नक्षलविरोधी गटाने सुब्रमणियम यांच्या घरासमोर निदर्शने करताना ‘डेथ टू मालिनी’ अशा घोषणा दिल्या.
पोलिसांनी त्यांना माओवाद्यांच्या हस्तक संबोधून त्यांचे प्रतिमाहनन केले, पण जगाने मात्र त्यांच्या या कार्याचा सन्मान केला आहे.
त्यांच्या ‘द ट्रुथ बिहाइंड छत्तीसगड्स रिसेंट माओइस्ट सरेंडर’ या त्यांच्या वृत्ताला ‘आशियन सेंटर फॉर जर्नालिझम’ पुरस्कार मिळाला होता.
छत्तीसगडचा फिअरलेस प्रिंटींग पुरस्कार, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजचा पुरस्कारही त्यांना मिळाला.
सत्य बाहेर काढणे हे पत्रकारितेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रसंगी प्राणावर उदार होणाऱ्या मोजक्या पत्रकारांपैकी एक असलेल्या मालिनी यांची पत्रकारिता साहसाचेच प्रतीक आहे.
विकास कृष्णनला सर्वोत्तम मुष्टियोद्धा पुरस्कार
आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता विकास कृष्णनला यावर्षी त्याने केलेल्या सुरेख कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेतर्फे (एआयबीए) ‘सर्वोत्तम मुष्टियोद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतीय बॉक्सिंग इतिहासातील ही पहिली घटना ठरेल. २० डिसेंबर रोजी विश्व संघटनेच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
२०१०मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि २०१४मध्ये कास्यपदक जिंकणाऱ्या विकासने यावर्षी दोन एपीबी बाऊटमध्ये सहभाग नोंदवला.
एआयबीएच्या या वर्धापनदिनी भारतीय महिला बॉक्सर एमसी मेरीकॉमलादेखील तिच्या खेळातील योगदानाबद्दल ‘लिजेंड पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
अर्जेंटिनाला प्रथमच डेव्हिस कप स्पर्धेचे जेतेपद
अर्जेंटिनाने संघर्षपूर्ण लढतीत माजी चॅम्पियन क्रोएशियाचा ३-२ ने पराभव करून प्रथमच डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत जेतेपद पटकावले.
फेररिको डेलबोनिस अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने अखेरच्या निर्णायक लढतीत इव्हो कार्लोविचचा पराभव करून संघाला ऐतिहासिक जेतेपद पटकावून दिले.
अर्जेंटिनाने पाच वेळा डेव्हिस कप स्पर्धेत अंतिम फेरी गाठली; पण प्रथमच जेतेपद पटकावले. डेव्हिस कप स्पर्धेच्या इतिहासात जेतेपद पटकावणारा अर्जेंटिना १५वा देश ठरला आहे.
मुंबईत देशातील पहिले वेलनेस सेंटर
लहान मुलांच्या आरोग्यावर भर देणारे ‘बेबीज कॅसल’ हे देशातील एकमेव ठरणारे वेलनेस सेंटर मुंबईत सुरू झाले आहे.
‘बेबीज कॅसल’च्या बेबी अँड मदर वेलनेस सेंटरचे उद्घाटन अभिनेत्री जेनेलिया डिसूझा हिच्या हस्ते झाले.
डॉ. प्रियंका भोईर यांनी ही संकल्पना राबविली असून त्या केंद्राच्या संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आहेत.
आई व बाळासाठी अनुक्रमे गरोदरपण व बाल्यावस्थेतील प्रत्येक क्षण आनंददायी होण्यासाठी तसेच त्या क्षणांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियातील ‘फ्रेंड्स स्वीम अॅकेडमी’ अंतर्गत ‘बेबीज कॅसल’ या केंद्राची नोंदणी करण्यात आली. हे भारतातील पहिले आणि एकमेव ‘बेबी अँड मदर वेलनेस सेंटर’ आहे.
हे केंद्र नवजात बालकांची आकलन क्षमता विकसित करण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे मातांचे गरोदरपण, त्यानंतरचे बाळंतपण व संपूर्ण पहिले वर्ष सुखकर जगण्यासाठी सहकार्य करेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा