लेफ्टनंट जनरल श्रीनिवास कुमार अर्थात एस के सिन्हा यांची १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
१९८३मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हरमिंदर साहिबवर (सुवर्ण मंदिर) हल्ला करून दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी योजना तयार करण्याची सूचना सिन्हा यांना केली होती.
सुवर्ण मंदिरात धडक कारवाई केल्यास शीख समाजात असंतोष उफाळेलच, पण लष्करातील ऐक्यही धोक्यात येईल. म्हणून ही कारवाई वेगळ्या पद्धतीने करावी असे त्यांचे मत होते.
परंतु लष्करप्रमुखपदासाठी पात्र असतानाही डावलल्याच्या भावनेने दुखावलेल्या सिन्हा यांनी १९८३मध्ये लष्करी सेवेला रामराम केला.
पुढे १९८४मध्ये सुवर्ण मंदिरात सैन्याने कारवाई (ऑपरेशन ब्ल्यू स्टार) करून दहशतवाद्यांचा अंत केला.
तरी त्यानंतर इंदिराजी आणि जनरल वैद्य यांनाही अतिरेक्यांच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले, तेव्हा सिन्हा यांची भूमिका किती योग्य होती याची प्रचीती आली.
सैन्यात १९४३ ते १९८३ अशी चाळीस वर्षे त्यांनी विविध पदे भूषविली. १९९७मध्ये सिन्हा यांची आसामच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली.
लष्करातील ऐक्याची भावना वृद्धिंगत करणे, आर्थिक विकास आणि राज्यातील भरकटत जाणाऱ्या तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या समुपदेशनावर त्यांनी भर दिला.
नंतर २००३मध्ये ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल बनले. तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती महमद सईद यांच्याशी त्यांचे संबंध कायमच तणावाचे राहिले.
काश्मीरसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी विविध वृत्तपत्रांत अनेक वर्षे स्तंभलेखन केले.
काश्मीर आणि आसाम प्रश्नावर मूलगामी विचार मांडणारी दोन व अन्य विषयांवरील सात पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
९२ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य जगल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा सैन्यदलात प्रशंसनीय सेवा बजावलेला एक योद्धा देशाने गमावला.
ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा
सणांनिमित्त होणाऱ्या आतषबाजीमुळे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी राज्य सरकारने ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद केली आहे.
ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्यास नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी व पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असा आदेश सरकारने दिला आहे.
ध्वनिप्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, श्रवणशक्तीवर दुष्परिणाम, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडण्याच्या अनेक शक्यतांना सामोरे जावे लागते.
अशा परिस्थितीत चांगल्या आरोग्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे.
धावपटू धरमवीरसिंगवर आठ वर्षांची बंदी
डोप चाचणीत अपयशी ठरल्यामुळे रिओ ऑलिम्पिकला अनुपस्थित राहिलेला हरियाणाचा वेगवान धावपटू धरमवीरसिंग याच्यावर राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) आठ वर्षांची बंदी घातली आहे.
२०० मीटर शर्यतीचा धावपटू असलेला धरमवीर याला ११ जुलै रोजी बंगळुरू येथे झालेल्या इंडियन ग्रॅन्डप्रिक्सदरम्यान झालेल्या डोप चाचणीत दोषी धरण्यात आले होते.
धरमवीर दुसऱ्यांदा डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने नाडाच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर आठ वर्षे बंदीचा निर्णय घेतला आहे.
याआधी २०१२मध्ये डोप टेस्ट देण्यास टाळाटाळ करणाऱ्या धरमवीरकडून आंतरक्षेत्रीय चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेले १०० मीटरचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले होते.
धरमवीरने इंडियन ग्रॅन्डप्रिक्समध्ये २०० मीटर शर्यत राष्ट्रीय विक्रमासह २०.४५ सेकंदांत जिंकली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा