‘आयएनएस चेन्नई’ या विनाशिकेवर भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना शत्रूपासून रोखणारे सर्वात पहिले ‘कवच’ चढविण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (डीआरडीओ) ‘कवच’ या नव्या चकवायंत्रणेची निर्मिती करण्यासंबंधी संशोधन सुरू होते.
या ‘कवचा’चे सर्व चाचण्या ‘आयएनएस चेन्नई’ या विनाशिकेवर करण्यात आल्याव त्या यशस्वी झाल्यानंतर सर्वात पहिले ‘कवच’ही आता याच युद्धनौकेवर चढविण्यात आले आहे.
यापुढे नौदलात दाखल होणाऱ्या सर्व युद्धनौकांनाही हे ‘कवच’ चढविण्यात येणार आहे.
जागतिक पातळीवरही पुणे ‘स्मार्ट’
देशांतर्गत ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या पुणे शहराने जागतिक पातळीवरही नावलौकिक मिळविला आहे.
‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉंग्रेस’ या उपक्रमात सहभागी झालेल्या ४५ देशांतील २५० शहरांमधून अंतिम ६ शहरांच्या यादीत पुण्याने स्थान पटकावले आहे.
आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, निधी उभारणीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे.
बार्सिलोना येथे झालेल्या या स्पर्धेत तीन गटांमध्ये विविध देशांतील शहरांनी भाग घेतला होता.
त्यामध्ये ‘प्रोजेक्ट’ विभागात भुवनेश्वर आणि ‘सिटी’ विभागात पुणे शहराने भाग घेतला होता.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराने यात पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर सोल (कोरिया), हॉलंड (नेदरलॅंड), जिउक्वॉन (चीन) आणि मॉस्को (रशिया) व पुणे या शहरांनी अनुक्रमे २ ते ६ क्रमांक पटकावले.
शाश्वत विकास, जगण्यायोग्य शहर आणि नागरिकांचा लोकसहभाग या तीन निकषांवर पुण्याची निवड अंतिम सहा शहरांच्या यादीत करण्यात आली आहे.
त्यामुळे आता जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांमध्ये योग्य संदेश जाण्यास मदत होईल आणि पुण्यातील प्रकल्पांसाठी निधी उभारणे सोपे होऊ शकेल.
केंद्र सरकारने यापूर्वी देशांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत भुवनेश्वर शहराने पहिला तर पुणे शहराने दुसरा क्रमांक पटकावला होता.
वाहतूक नियमांचे २० वेळा उल्लंघन केल्यास परवाना रद्द
वाहतूक नियमनात ई-चलन प्रणाली अस्तित्वात आल्याने आता वाहतूक नियमांचे २० वेळा उल्लंघन केल्यास चालकाचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या गृह विभागात काही अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
त्यानुसार मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. उर्वरित महापालिका क्षेत्रातही ही यंत्रणा बसविण्याचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यावर दंड भरताना किंवा कारवाई करताना वाहनचालक आणि पोलिसांदरम्यान भांडणाचे प्रसंग ओढवतात, परिणामी वाहतूक विस्कळित होते.
यासाठी ई-चलन व्यवस्था कार्यान्वित केली आहे. वाहनचालकाने नियम तोडल्यास त्याला ई-चलनाची नोटीस जागेवरच देता येईल किंवा घरच्या पत्त्यावर जाईल. दंडाची रक्कम त्याला संगणकाद्वारे भरता येईल.
या यंत्रणेमुळे वाहनचालकाने किती वेळा नियम तोडला त्याचा तपशील उपलब्ध असेल.
दहा वेळा नियम तोडल्यास दोन महिन्यांसाठी, तर वीस वेळा नियम तोडल्यास कायमस्वरूपी चालक परवाना रद्द करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा