बहुचर्चित अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करुन ऐतिहासिक व धक्कादायक विजयाची नोंद केली.
ट्रम्प यांच्या रूपाने अमेरिकेला ४५वे अध्यक्ष मिळाले असून ७० वर्षीय ट्रम्प २० जानेवारी २०१७ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
ट्रम्प हे अमेरिकेच्या आतापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांपैकी ते सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष असतील.
अमेरिकेच्या ६० वर्षाच्या इतिहासातील प्रशासनाचा कुठलाही अनुभव नसलेले ते पहिले अनुनभवी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणाऱ्या ट्रम्प यांना गर्व्हनर, सिनेटर अशा कुठल्याही पदाचा अनुभव नाही.
अमेरिकेतील ‘इलेक्टोरल कॉलेज’व्यवस्थेनुसार २७ राज्यांमधील २७६ मते जिंकून ट्रम्प यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
ट्रम्प यांच्या तुलनेमध्ये हिलरी यांना केवळ २१८ मतेच मिळविण्यात यश आल्याने डेमोक्रॅट समर्थकांचा मोठाच अपेक्षाभंग झाला.
लोकप्रिय मतांमध्येही डोनाल्ड ट्रम्प यांनी ४८ टक्के मत मिळवली तर हिलरींना ४७ टक्के मते मिळाली.
अमेरिकेतील मुस्लिम समुदाय, मेक्सिकन वंशाचे नागरिक व स्त्रिया यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानांमुळे ट्रम्प जास्त चर्चेत राहिले.
अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर ट्रम्प यांचे विविध देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधाबाबत निर्णय महत्वपूर्ण ठरतील.
कनुभाई गांधी यांचे निधन
महात्मा गांधींचे नातू कनुभाई रामदास गांधी यांचे ७ नोव्हेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरत येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
तीन वर्षांपूर्वीच ते अमेरिकेतून भारतात परतले होते. तीन महिन्यांपासून ते आपल्या पत्नीबरोबर सुरत येथील राधाकृष्ण मंदिरात राहत होते.
मार्च-एप्रिल १९३०च्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहादरम्यान गुजरातच्या दांडी गावाच्या किनाऱ्यावर महात्मा गांधींनी हाती घेतलेल्या काठीचे एक टोक धरून पुढे चालणारा मुलगा म्हणून कनु प्रसिद्ध होते.
पुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजातून १९६१ साली त्यांनी यंत्र-अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले
अमेरिकेत ‘मेसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून कनु यांनी १९६९मध्ये उच्चशिक्षण पूर्ण केले.
नंतर ‘ते नासा (अमेरिकी अंतराळ संस्था) मध्ये संरक्षणशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते.
ते आणि त्यांची पत्नी शिवलक्ष्मी दिल्लीच्या वृद्धाश्रमात राहत असल्याचे समोर आल्यानंतर कनू गांधी चर्चेत आले होते.
अँडी मरेला पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद
जागतिक पुरुष एकेरी क्रमवारीत अग्रस्थानी कब्जा केल्यानंतर ब्रिटनच्या अँडी मरेने पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे.
तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मरेने अमेरिकेच्या जॉन इस्नरला ६-३, ६-७, ६-४ असे पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले.
यंदाच्या मोसमात मरेचे हे आठवे विजेतेपद असून, आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने एकूण १४वे मास्टर्स जेतेपद पटकाविले आहे.
रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये त्याने पुरुष एकेरीचे सुवर्ण पटकावून सलग दोनवेळा ऑलिम्पिक सुवर्ण पटकावणारा पहिला टेनिसपटू म्हणून इतिहास रचला आहे.
प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार बापू घावरे यांचे निधन
प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार तुकाराम ऊर्फ बापू लक्ष्मण घावरे यांचे ७ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते ७० वर्षाचे होते.
राजस्थानमधील उदयपूर येथे ते सहलीसाठी गेले होते. तेथे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.
‘मोहिनी’ या दिवाळी अंकात त्यांचे सन १९८९मध्ये पहिले व्यंग्यचित्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर ‘प्रभात’मध्ये सुमारे १४ वर्षे त्यांची चित्रे नियमित प्रसिद्ध झाली.
विविध दैनिकांत आणि दिवाळी अंकांसाठी त्यांनी तेरा हजारांहून अधिक चित्रे काढली.
त्यांच्या व्यंग्यचित्रांची ‘लाफिगं क्लब’ आणि ‘हास्यवाटिका’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
त्यांचे ‘बहुरूपी’ आणि ‘शिमग्याची सोंगं’ हे दोन विनोदी कथासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत.
ते मूळचे मुळशी तालुक्यातील बेलावडे गावचे होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळात त्यांनी शिक्षक ते उपप्राचार्य या पदांवर अनेक वर्षे सेवा केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा