चालू घडामोडी : ६ नोव्हेंबर
भारतीय महिला हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता
- भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अंतिम लढतीत चीनचा २-१ असा पराभव करत अजिंक्यपद पटकावले.
- सामना संपायला २० सेकंदांचा कालावधी शिल्लक असताना दीपिका ठाकूरने निर्णायक गोल करत भारताला जेतेपद मिळवून दिले.
- मलेशियात नुकत्याच पार पडलेल्या पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानला हरवून जेतेपद पटकावले होते.
- या स्पर्धेतील भारतीय महिला संघाचे हे पहिलेच विजेतेपद ठरले. भारतीय संघ २०१३साली जपानकडून हरल्यामुळे उपविजेता राहिला होता.
- २०११मध्ये भारत चौथ्या क्रमांकावर तर २०१०मध्ये झालेल्या या स्पर्धेत भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.
- हॉकी इंडियाने सिंगापूर भारतीय महिला संघातील प्रत्येक सदस्याला आणि प्रशिक्षकांना प्रत्येकी दोन लाख रुपये रोख पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे.
- या सोबतच संघाच्या सपोर्ट स्टाफला देखील प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.
- स्पर्धेतील अव्वल स्कोअरर दीपिका ठाकूर हिला अतिरीक्त एक लाख रुपयांचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
महाराष्ट्राला ‘इंडिया टुडे’ नियतकालिकातर्फे चार पुरस्कार
- आर्थिक व्यवहार, सर्वसमावेशी विकास, पायाभूत सुविधा आणि ई-गव्हर्नन्स या चार क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला ‘इंडिया टुडे’ नियतकालिकातर्फे पुरस्कृत करण्यात आले.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी हे पुरस्कार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते स्वीकारले.
- वर्षभरातील आर्थिक व्यवहारविषयक पाहणीत राज्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी, सर्वसमावेशी विकासाच्या आघाडीवर मोठ्या राज्यांच्या श्रेणीत पहिला क्रमांक, तर पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वाधिक सुधारित राज्य म्हणून महाराष्ट्राला पुरस्कृत करण्यात आले.
- त्याचबरोबर ई-गव्हर्नन्सद्वारे राज्याने केलेली श्रमांची बचत ही मोठ्या राज्यांच्या श्रेणीतील अग्रगण्य ठरल्याने यासाठीही महाराष्ट्राला पुरस्कार देण्यात आला.
आणखी दोन चॅनलच्या प्रक्षेपणावर बंदी
- एनडीटीव्ही इंडिया वाहिनीवर एक दिवसाची बंदी घातल्यानंतर आता सरकारने 'न्यूज टाइम आसाम' आणि 'केअर वर्ल्ड टीव्ही' चॅनलच्या प्रक्षेपणावरही एक दिवसाच्या बंदीचा आदेश लागू केला आहे.
- 'न्यूज टाइम आसाम'वर प्रोग्रॅमिंग मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ९ नोव्हेंबरला एका दिवसासाठी बंदी घालण्यात आली आहे.
- 'न्यूज टाइम आसाम'ने एका अल्पवयीन मुलीचा परिचय देताना तिची ओळख सार्वजनिक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- तर 'केअर वर्ल्ड चॅनल'वर आक्षेपार्ह माहिती दिल्याचा ठपका ठेवत तब्बल ७ दिवस चॅनल बंद ठेवण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत.
- आता ९ नोव्हेंबरला एकूण तीन चॅनलवर बंदी असणार आहेत. मात्र चॅनलवर अशा प्रकारे बंदी घातल्याने सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे.
दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी भारत व चीन एकत्र
- दहशतवादाशी मुकाबला व अन्य क्षेत्रांत उच्च पातळीवर मैत्रीपूर्ण संबंध ठेवून देवाणघेवाण करण्याचा निर्णय भारत व चीनने घेतला आहे.
- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांग जियेची यांच्या हैदराबाद येथे झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.
- गेल्या दोन महिन्यांत यांग हे तिसऱ्यांदा भारत भेटीवर आले आहेत. या चर्चेत द्विपक्षीय, या प्रदेशातील तसेच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली.
- राजकीय, आर्थिक, संरक्षण व दहशतवादाशी मुकाबला या क्षेत्रांत उच्च पातळीवर माहितीची देवाणघेवाण करीत शांततेचे वातावरण ठेवण्याचे या वेळी ठरविण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा