एअरटेल या मोबाईल कंपनीने डिजीटल आणि पेपरलेस बँक सुरू केली असून देशातील ही पहिली पेमेंट बँक ठरली आहे.
११ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने एअरटेल बँकेला पेमेंट बँकेचा परवाना दिला होता. राजस्थानमधून भारती एअरटेलने प्रायोगिक तत्वावर ही बँक सुरू केली आहे.
याद्वारे ग्राहकांना एअरटेलच्या गॅलरीतून रोख रक्कम काढण्याची मुभाही देण्यात आली आहे. मोबाइल फोनच्या माध्यमातूनही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
या बँकेतील बचत खात्यातील रकमेवर ७.२५ टक्के या दराने व्याज देण्यात येणार आहे. बँकिग क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात व्याज देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राजस्थानमधील शहरे आणि ग्रामीण भागांतील नागरिकांना एअरटेल रिटेल आउटलेटमध्ये जाऊन बँकेत खाते उघडता येणार आहे.
तसेच ग्राहकांना मोबाईल फोनच्या माध्यमातूनही बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार असून बँकेत पेपरलेस खाते उघडण्यासाठी ग्राहकांना आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
एअरटेल पेमेंट बँकेच्या पहिल्या टप्प्यात बँकिंगविषयक सर्व सुविधांच्या चाचण्या सुरू असून, त्यानंतरच बँकेची सेवा देशभरात शाखांद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
नेपाळमध्ये नव्या ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांवर बंदी
नेपाळच्या केंद्रीय बँकेने भारतातील नव्या ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे.
जोपर्यंत विनिमय अंतर्गत भारताकडून काही व्यवस्था केली जात नाही तोपर्यंत भारतीय नोटा बेकायदा मानले जाणार असल्याचे नेपाळ राष्ट्र बँकेने सांगितले.
भारतीय रिझर्व्ह बँकेने फॉरेन एक्सचेंजतंर्गत जारी केलेल्या अधिसूचननेनंतरच विदेशी नागरिकांना भारतीय रूपये देण्याची परवानगी मिळते.
रिझर्व्ह बँकेबरोबर झालेल्या समजोत्यानुसार एक नेपाळी नागरिक ५०० आणि १००० रूपयांच्या जुना नोटांच्या रूपात २५ हजार रूपये जवळ ठेऊ शकतो.
केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा नेपाळवरही परिणाम झाला.
भारतातील नोटबंदीमुळे नेपाळमधील बँकिंग क्षेत्राने ३.५ कोटींचे भारतीय चलन रोखण्याचा निर्णय घेतला होता.
नेपाळमध्ये मोठ्याप्रमाणात भारतीय रूपयांचा व्यवहारात वापर केला जातो. त्यामुळे अनेक नेपाळी नागरिक जुन्या नोटा कशा बदलायच्या या चिंतेत आहेत.
नेपाळच्या राष्ट्रीय बँकेने जुन्या भारतीय नोटा बदलण्याची नियमावली तयार करण्यासाठी एका विशेष समितीचे नेमणूक केली आहे.
पुण्याच्या प्रसाद शिंदेला आयर्न मॅन किताब
पुण्यातील प्रसाद शिंदे या तरुणाने मलेशियात झालेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘ट्रायथलॉन’ शर्यत पूर्ण करून ‘आयर्न मॅन’चा किताब मिळविला.
अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण, जलतरणपटू कौस्तुभ राडकर यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे.
कौस्तुभने सलग चारवेळा हा किताब मिळविला आहे. तर अभिनेता मिलिंद सोमण याने मागील वर्षी ‘आयर्न मॅन’ किताब पटकावला होता.
काही वर्षांपूर्वी वजनाची शंभरी ओलांडलेल्या प्रसादने खडतर व्यायामातून फिटनेस मिळवला.
त्यानंतर त्याने २०१५मध्ये ४२ किलोमीटरची हैदराबाद मॅरेथॉन साडेचार तासांत, २०१६मध्ये ४२ किलोमीटरची मुंबई मॅरेथॉन ४ तास १३ मिनिटांमध्ये पूर्ण केली.
मलेशियात १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत त्याने सहभाग घेतला आणि १४ तास १२ मिनिटांमध्ये ही स्पर्धा यशस्विरीत्या पूर्ण केली.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास सलग २.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे अशा तीन प्रकारांतील २२४.८ किलोमीटर अंतर ठराविक वेळेत पूर्ण करावे लागते.
त्यात जगभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रसादने निश्चित केलेल्या वेळेपूर्वी शर्यत पूर्ण करून ‘आयर्न मॅन’ किताब पटकावला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा