वस्तू व सेवा विधेयकातील (जीएसटी) कररचनेबाबत केंद्र व राज्य सरकारांमध्ये अखेर एकमत झाले आहे.
५, १२, १८ आणि २८ टक्के अशी चारस्तरीय कररचना करण्यावर जीएसटी परिषदेने एकमताने शिक्कामोर्तब केले आहे.
मागील बैठकीमध्ये एकमत न झाल्याने निर्णय लांबणीवर टाकावा लागला होता. मात्र या वेळी एकमत घडवून आणण्यात अर्थमंत्री जेटली यशस्वी झाले.
केंद्राने ६, १२, १८ आणि २६ टक्के अशी चारस्तरीय कररचना सुचविली होती. पण चर्चेअंती ५, १२, १८ आणि २८ टक्क्यांवर सहमती करण्यात आली.
आता या कररचनेस संसदेची संमती घ्यावी लागणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात जीएसटीसंदर्भातील दोन विधेयकांना मंजुरी मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
एनडीटीव्ही इंडियावर एक दिवसाची बंदी
पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचे नियमबाह्य प्रक्षेपण केल्याप्रकरणीएनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्त वाहिनीवर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने एक दिवस वाहिनी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
एनडीटीव्ही इंडियाने ९ नोव्हेंबर रोजी दुपारी एक ते १० नोव्हेंबर दुपारी एक वाजेपर्यंत प्रसारण बंद ठेवावे असा आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केला आहे.
एखाद्या खासगी वाहिनीला अशा प्रकारचा आदेश दिला जाण्याची ही पहिलीच घटना आहे.
पठाणकोट येथे दहशतवादी हल्ल्यावेळी एनडीटीव्ही इंडियाने एअरबेसवर असणाऱ्या हत्यारांची माहिती दिली होती.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गठीत केलेल्या समितीच्या मते, अशाप्रकारची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करणे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे.
तसेच त्यावेळी दहशतवाद्यांना सूचना देणारे या माहितीचा वापर करु शकत होते, असे या समितीचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संपूर्ण देशात लागू
१ नोव्हेंबरपासून तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यामुळे आता संपूर्ण देशात हा कायदा लागू झाला आहे.
या कायद्यामुळे ८० कोटी लोकांना सवलतीत धान्य मिळणार असून, केंद्राला त्यापोटी वार्षिक १ लाख ४० हजार कोटी एवढे अनुदान द्यावे लागणार आहे.
२०१३मध्ये संसदेने संमत केलेल्या या कायद्यांतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीला केवळ एक ते तीन रुपये किलो दराने दरमहा ५ किलो धान्य पुरविणार आहे.
उपमा विरदी यांना बिझनेस वुमन ऑफ द इअर पुरस्कार
ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या उपमा विरदी यांनी यंदाच्या 'बिझनेस वुमन ऑफ द इअर' पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
व्यवसायाने वकील असलेल्या उपमा यांनी छंद म्हणून चहाचा बिझनेस सुरू केला आणि यशाची पताका फडकावली.
ऑस्ट्रेलियासारख्या कॉफीवेड्या देशात लोकांना चहाची तलफ लावण्याची किमया मेलबर्नमध्ये राहणाऱ्या या तरुणीने करून दाखवली आहे.
उपमाच्या या यशाचा इंडियन ऑस्ट्रेलियन बिझनेस अॅण्ड कम्युनिटी पुरस्कारात 'बिझनेस वुमन ऑफ द इअर' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा