गोव्यात २० नोव्हेंबरपासून ४७वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) होणार आहे.
यावर्षी त्यात ८८ देशांतील १९४ उत्तमोत्तम चित्रपट दाखविले जाणार आहेत. कोरियाच्या चित्रपटांवर यावेळी विशेष प्रकाशझोत राहणार आहे.
मात्र सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवात पाकिस्तानातील किंवा पाक कलाकारांची भूमिका असलेला एकही चित्रपट दाखविला जाणार नाही.
गोवा चित्रपट महोत्सव पोलंडचे विख्यात चित्रपट निर्माते आंद्रेज वाजदा यांना समर्पित असून, त्यांच्याच चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ होईल.
त्याचप्रमाणे ज्येष्ठ पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
या महोत्सवात उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, अभिनेत्री यांना पुरस्कार दिले जातील.
तसेच यावर्षीपासून उगवत्या दिग्दर्शकासाठी विशेष पदार्पण पुरस्कारही दिला जाईल. दहा लाख रुपये रोख व मयूर स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप असेल.
मिरोस्लाव्ह क्लोस फुटबॉलमधून निवृत्त
फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याचा विश्वविक्रम करणारा जर्मनीचा फुटबॉलपटू मिरोस्लाव्ह क्लोसने फुटबॉलमधून निवृत्ती स्विकारली आहे.
दोन वर्षांपूर्वी क्लोसने जर्मनीला विश्वविजेतेपद जिंकून दिल्यानंतर महिन्याभराच्या आत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला होता.
त्यानंतर आता क्लोसने आंतरराष्ट्रीय फुटबॉलसह क्लब फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली आहे.
पोलंडमध्ये जन्मलेल्या क्लोसने २००१मध्ये जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले.
ब्राझीलमध्ये रंगलेल्या विश्वचषकाच्या सोहळ्यात जर्मनीने अर्जेटिनाला १-० असे हरवून १९९० नंतर प्रथमच विश्वचषकावर मोहोर उमटवली होती.
या विश्वचषकात क्लोसने दोन गोल करून ब्राझीलच्या रोनाल्डोचा सर्वाधिक गोलांचा विश्वविक्रम मोडीत काढून नवा अध्याय रचला.
त्याने एकूण चार फिफा विश्वचषकात सर्वाधिक १६ गोल्स केले आहेत. याशिवाय जर्मनीकडून १३७ सामन्यांत सर्वाधिक ७१ गोल झळकावण्याच्या विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
सलग चार विश्वचषकांत गोल करणारा तो पेले, उवे सीलेर यांच्यानंतरचा तिसरा फुटबॉलपटू ठरला आहे.
जर्मनीतर्फे सर्वाधिक १३७ सामने खेळणारा तो लोथार मॅथ्यूज यांच्यानंतरचा दुसरा फुटबॉलपटू आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा नेपाळ दौरा
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्याला ३ ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे.
मागील १८ वर्षांतील भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिलाच नेपाळ दौरा आहे. यावेळी ते नेपाळमधील राजकीय नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत.
तीन दिवसांच्या दौऱ्यात मुखर्जी हे ऐतिहासिक पशुपतीनाथ आणि राम जानकी मंदिराला भेट देणार आहेत.
काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी या मुखर्जी यांचे स्वागत करतील. मुखर्जी यांच्या सन्मानार्थ भंडारी यांनी भोजन समारंभाचे आयोजित केले आहे.
नामदेव शिरगावकर यांची एएमपीसीच्या सरचिटणीसपदी निवड
भारतीय मॉडर्न पेन्टॅथलॉन फेडरेशनचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांची आशियाई मॉडर्न पेन्टॅथलॉन महासंघाच्या (एएमपीसी) सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
किरगिझीस्तान येथे नुकतीच एएमपीसीची निवडणूक झाली. यात ३४ वर्षीय शिरगावकर यांनी कोरियाचे सांकेओंग येओ यांच्यावर विजय मिळविला.
शिरगावकर यांच्या निवडीने या पदावरील कोरियाची २५ वर्षांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.
मॉडर्न पेन्टॅथलॉन या ऑलिम्पिक क्रीडाप्रकारात तलवारबाजी, पोहणे, घोडेस्वारी, धावणे व लेझर गन शूटिंग अशा ५ खेळांचा समावेश आहे.
शिरगावकर यांची सरचिटणीसपदी निवड झाल्यामुळे एएमपीसीचे मुख्यालय भारतात स्थलांतरित होणार आहे.
शिरगावकर हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा