उत्तर भारतातील आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार प्रा. राज बिसारिया यांना मध्य प्रदेश सरकारचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘कालिदास सम्मान’ प्रदान करण्यात आला.
आधुनिक नाटय़क्षेत्रात उत्तर प्रदेशातून पद्मश्री मिळालेले ते पहिलेच रंगकर्मी असून, उत्तर भारतातील कलाविष्कारात जिवंतपणा आणण्याचे श्रेय त्यांना आहे.
बिसारिया यांचा जन्म उत्तर प्रदेशात १९३५मध्ये लखीमपूर खेरी येथे झाला. लखनौ विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झाले. कालांतराने लखनौ विद्यापीठातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले.
१९६२मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी थिएटर ग्रुप स्थापन केला होता. त्यानंतर चार वर्षांनी त्यांनी थिएटर आर्ट्स वर्कशॉपची स्थापना केली.
१९७५मध्ये भारतेंदु अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स ही संस्था स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता.
नाटकाचे प्रशिक्षण त्यांना लंडनच्या ब्रिटिश ड्रामा लीग या संस्थेतून मिळाले. अनेक पाश्चिमात्य अभिजात व समकालीन नाटके त्यांनी दिग्दर्शित केली होती.
नौटंकी या लोककलेला त्यांनी नाटकात स्थान दिले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेतही त्यांनी काम केले.
भारतीय, ब्रिटिश, युरोपीय व अमेरिकी नाटककारांची किमान १०० नाटके त्यांनी दिग्दर्शित केली.
त्यांना मिळालेला कालिदास सम्मान यापूर्वी पंडित रविशंकर, चित्रकार एम. एफ. हुसेन, पंडित जसराज, शंभू मिश्रा, हबीब तन्वीर व इब्राहिम अल्काझी यांना मिळाला आहे.
भारत आणि चीनचा संयुक्त लष्करी सराव
दहशतवादाला विरोध करण्यासाठी भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यातील ‘हॅंड इन हॅंड’ या सहाव्या संयुक्त सरावाला पुण्यात सुरवात झाली.
निमशहरी भागात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात संयुक्त नियोजन करणे आणि त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा या संयुक्त लष्करी सरावाचा मुख्य उद्देश आहे.
या सरावादरम्यान एकमेकांची शस्त्रे जवानांना हाताळता येणार आहेत. दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर स्फोटकांची हाताळणी, शोधमोहीम यांचा सराव यात करण्यात येणार आहे.
यात दोन व्यूहरचनात्मक सराव करण्यात येतील. तसेच, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना मदतीचा हात देण्याबाबतही प्रात्यक्षिक होणार आहे.
पोस्ट ट्रथ २०१६चा आंतरराष्ट्रीय शब्द
पोस्ट ट्रथ हा २०१६ या वर्षांतील आंतरराष्ट्रीय शब्द ठरल्याचे ऑक्सफर्ड डिक्शनरीजने जाहीर केले आहे.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षीय निवडणुकीतील अनपेक्षित विजय व ब्रेक्झिट यासारख्या घटनांमुळे या शब्दाचा वापर दोनशे पटींनी वाढला आहे.
वस्तुनिष्ठ परिस्थिती जनमतावर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याच्या परिस्थितीत हा शब्द वापरला गेला असून, लोकांनी भावना व व्यक्तिगत श्रद्धा यांच्या आधारे त्यांचे जनमत ठरवले आहे.
गेल्या वर्षभरापासून लोकप्रिय ठरलेल्या या शब्दाचा वापर २००० टक्के वाढला असल्याचे शब्दकोश संशोधनातून दिसून आले आहे.
गेली वीस वर्षे हा शब्द अस्तित्वात असून, ब्रेक्झिट मतदानानंतर जूनमध्ये या शब्दाच्या वापरात वाढ झाली.
नंतर ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाल्यापासून या शब्दाचा वापर आणखी वाढला.
गेल्या वर्षी आनंदाश्रू असलेल्या चेहऱ्याचा उल्लेख करणारा इमोजी हा शब्द निवडला गेला होता, पण तो वादग्रस्त ठरला होता.
चीनचा तियानहू लाइट सर्वाधिक वेगवान महासंगणक
चीनचा सनवे तियानहू लाइट हा महासंगणक जगात सर्वाधिक वेगवान महासंगणक ठरला आहे.
त्याचा गणनाचा वेग सेकंदाला ९३ दशलक्ष अब्ज आकडेमोडी इतका आहे. त्याचे प्रोसेसर म्हणजे संस्कारक हे चीनमध्ये तयार करण्यात आले आहेत.
अर्धवार्षिक टॉप ५०० महासंगणकांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात चीनने लागोपाठ ८व्या वर्षी वेगवान महासंगणकाचा मान पटकावला.
तियानहू लाइट मागचा विजेता तियानहे २ पेक्षा तीनपट वेगवान आहे. तो संगणकही चीनचाच होता पण त्यात इंटेलच्या चीप आहेत.
तियानहे २ हा संगणक लागोपाठ तीन वर्षे पहिल्या क्रमांकावर आला होता. लागोपाठ आठ वर्षे चिनी महासंगणक पहिल्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेचे टायटन व सिक्वोइया हे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिले. तर अमेरिकेतील कोरी हा महासंगणक पाचव्या स्थानावर गेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा