प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांचा काळा पैसा जमा करण्यासाठी होत असलेला संशयित दुरुपयोग रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या खात्यांमधून पैसे काढण्यावर निर्बंध लागू केले आहेत.
सध्या कोणत्याही बँक खात्यातून पैसे काढण्यावर आठवड्याला २४ हजार रुपयांची कमाल मर्यादा लागू आहे.
मात्र रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशानुसार ‘केवायसी’ निकषांची पूर्णांशाने पूर्तता करणाऱ्या जन-धन खात्यांमधून आता महिन्याला जास्तीत जास्त १० हजार रुपयेच काढता येतील.
खातेदारांना याहून जास्त रक्कम काढायची असेल तर एवढ्या पैशाची कशासाठी गरज आहे हे त्यांना बँक व्यवस्थापकास पटवून द्यावे लागेल.
तसेच खातेदारास या मर्यादेहून जास्त पैसे का काढू दिले याची नोंद बँकेला आपल्या रेकॉर्डमध्ये करावी लागेल.
९ नोव्हेंबरपासून ज्या जन-धन खात्यांमध्ये बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा जमा करण्यात आल्या आहेत अशाच खात्यांना हे निर्बंध लागू असतील.
‘केवायसी’ निकषांची अजिबात पूर्तता न करणाऱ्या किंवा काही प्रमाणात पूर्तता करणाऱ्या जन-धन खात्यांवर याहून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
अशा खात्यांमध्ये बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा जमा केल्या असतील तरच त्या रकमेपैकी जास्तीत जास्त पाच हजार रुपये खात्यातून महिन्याला काढता येतील.
जन-धन खातेदार असलेले निष्पाप शेतकरी व ग्रामीण भागातील इतर लोक अशा लबाडांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी रिझर्व्ह बँकेने हे नवे निर्बंध लागू केले आहेत.
यामुळे ज्यांनी कोणी खरंच इतरांच्या जन-धन खात्यांमध्ये बेहिशेबी पैसे भरले असतील त्यांनी ते पुन्हा काढून घेऊन पांढरे करण्यावर मर्यादा येतील.
मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून देशभरातील जन-धन खात्यांमध्ये ६७ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत.
बेहिशेबी रोकड पांढरी करून घेण्यासाठी जन-धन खात्यांचा दुरुपयोग होत असल्याचा संशय असून अशी अनेक प्रकरणे उघडही झाली आहेत.
असे लबाडीचे व्यवहार करणाऱ्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा व बेनामी मालमत्ता कायद्यान्वये कारवाई करण्याचे सरकारने ठरविले आहे.
त्यानुसार लबाडीने काळ्याची पांढरी केलेली रक्कम जप्त करण्याखेरीज खातेदार आणि त्याचा दुरुपयोग करणारा अशा दोघांनाही ७ वर्षांपर्यंतची कैद होऊ शकते.
१०० प्रभावशाली छायाचित्रांत गांधींच्या छायाचित्राचा समावेश
महात्मा गांधी चरख्यावर सूतकताई करत असलेल्या १९४६मधील छायाचित्राचा समावेश कायम प्रभावशाली ठरणाऱ्या जगातील १०० छायाचित्रांत झाला आहे.
‘टाइम’ मासिकाने १८२०पासून २०१५पर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध आणि इतिहास घडवणाऱ्या छायाचित्रांचा संग्रह केला आहे. त्यात गांधीजींच्या या छायाचित्राचाही समावेश आहे.
या छायाचित्रात महात्मा गांधी खाली बसलेले असून, ते बातमी वाचत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या समोरच्या बाजूला त्यांचा चरखा आहे.
हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट छायाचित्र १९४६मध्ये छायाचित्रकार मार्गरेट बौर्के यांनी टिपलेले आहे.
भारतातील नेत्यांवरील एका लेखासाठी हे छायाचित्र घेतले होते; पण गांधी यांच्या हत्येनंतर श्रद्धांजली स्वरूपात हे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते.
‘शांतीदूत’ म्हणून गांधीजींचे नाव जगात अजरामर करण्यात या छायाचित्राचा हातभार लागला व या चित्राची नोंदही कायमस्वरूपी कोरली गेली, असे टाइमने म्हटले आहे.
ओबीसी वर्गात १५ नवीन जातींचा समावेश
केंद्र सरकारने अन्य मागासवर्गीय (ओबीसी) वर्गात १५ नवीन जातींचा समावेश केला आहे.
महाराष्ट्र, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड या राज्यांमधील जातींचा यात समावेश आहे.
याशिवाय या वर्गात आधीपासून समावेश असलेल्या १३ उपजातींमध्ये बदल करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने महाराष्ट्र, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेशसह अन्य चार राज्यांमध्ये जातीविषयक २८ बदल करण्याची शिफारस केली होती.
यात १५ नवीन जातींचा समावेश होता. याशिवाय ९ पोटजातींचा समावेश करणे आणि ४ जातींमध्ये सुधारणा करावी अशी शिफारसही आयोगाने केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शिफारशींना मंजुरी दिली आहे.
नवीन सुधारणांमुळे या जात किंवा पोटजातींमधून येणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरी, शिक्षण संस्थेमध्ये आरक्षणाचा फायदा मिळेल.
याशिवाय विविध कल्याणकारी योजना, शिष्यवृत्तींचाही त्यांना लाभ घेता येणार आहे.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशींच्या आधारे २५ राज्य आणि ६ केंद्रशासीत प्रदेशांमधील ओबीसी वर्गाच्या केंद्रीय यादीत आता एकूण २,४७९ जातींचा समावेश झाला आहे.
चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याचे सुप्रीम कोर्टाचा आदेश
देशातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
राष्ट्रगीतावेळी चित्रपटगृहाच्या पडद्यावर राष्ट्रध्वजही दाखवला गेला पाहिजे. तसेच सर्व नागरिकांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान करावा, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रगीताचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर केला जाऊ नये. राष्ट्रगीत आक्षेपार्ह वस्तुंवर छापू नये, असे कोर्टाने आपल्या निर्देशात म्हटले आहे.
एका जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिले. राष्ट्रगीत संक्षिप्त स्वरुपात वाजवू नये. ते पूर्णच वाजवावे, असेही कोर्टाने बजावले आहे.
राष्ट्रीय ओळख, अखंडत्व आणि घटनात्मक देशभक्तीबद्दलचा आदर यासाठी राष्ट्रगीत शिष्टाचार पाळणे आवश्यक असल्याचे सांगून खंडपीठाने या आदेशाची एक आठवड्याच्या आत अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्राला दिले.
फॉर्च्युनच्या यादीत चार भारतीय वंशाच्या व्यक्ती
बिझनेस मॅगझिन फॉर्च्युनने जगभरातील ५० ग्लोबल कॉर्पोरेट्स हेड्सची यादी प्रसिद्ध केली आहे.
या यादीत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, एचडीएफसीचे एमडी आदित्य पुरी, मायक्रोकार्डचे सीईओ अजय बंगा आणि एओ स्मिथचे सीईओ अजित राजेंद्र या भारतीय वंशांच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
बिझनेस मॅगझिन फॉर्च्युनच्या यादीत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे पहिल्या स्थानी विराजमान आहेत.
भारतीय वंशाचे सत्या नाडेला या यादीत पाचव्या स्थानी आहेत. अजित राजेंद्र ३४व्या, आदित्य पुरी यांनी ३६व्या व अजय बंगा हे ४०व्या स्थानावर आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा