चालू घडामोडी : २२ नोव्हेंबर
इस्त्रोचे माजी अध्यक्ष प्रा. एम. जी. के. मेनन कालवश
- प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ, इस्त्रोचे माजी अध्यक्ष प्राध्यापक एम. जी. के. मेनन यांचे २२ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
- एम. जी. के. मेनन यांनी व्ही. पी. सिंह सरकारच्या मंत्रिमंडळात विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद भूषवले होते.
- याआधी मेनन केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाचे सचिव म्हणूनही कार्यरत होते.
- १९७२मध्ये मेनन यांची इस्त्रोच्या प्रमुखपदी नेमणूक झाली होती. वयाच्या ३५व्या वर्षी ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या संचालकपदी विराजमान झाले.
- विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांचा पद्मभूषण (१९६८) आणि पद्मविभूषण (१९८५) पुरस्काराने सन्मान केला आहे.
- १९८२ ते १९८९ या कालावधीत ते नियोजन आयोगाचे सदस्य होते. तर १९८६ ते १९८९ या कालावधीत पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते.
- १९८९ ते १९९० या काळात कौन्सिल ऑफ सायन्टिफिक ऍण्ड इंडस्ट्रीयल रिसर्चचे उपाध्यक्ष आणि १९९० ते ९६ या काळात राज्यसभेचे सदस्यही होते.
- मेनन यांनी वैश्विक किरणे आणि कण भौतिक (पार्टिकल फिजिक्स) विज्ञानाच्या संशोधनात आपले अमूल्य योगदान दिले आहे.
प्रख्यात गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे निधन
- कर्नाटकी संगीताला वेगळी दिशा देणारे प्रख्यात गायक मंगलमपल्ली उर्फ एम. बालमुरलीकृष्ण यांचे २२ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
- मूळचे आंध्र प्रदेशमधील असणाऱ्या एम. बालमुरलीकृष्ण यांनी त्यांच्या जीवनातील बराच काळ चेन्नईमध्ये व्यतीत केला.
- पूर्वीच्या मद्रास इलाख्यात पूर्व गोदावरी जिल्ह्यात संगीतज्ज्ञ माता-पित्याच्या पोटी बालमुरली यांचा जन्म झाला.
- त्यांचे वडील पट्टाभीरामय्या पट्टीचे गायक होते तर आई सूर्यकांतम्मा सिद्धहस्त वीणावादक होती.
- ‘मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा’ या सरकारी जाहिरातीच्या गाण्याच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले.
- तेलुगु, संस्कृत, कन्नड आणि तामिळमध्ये बांधलेल्या ४००हून अधिक बंदिशी ही त्यांची संगीतकलेला दिलेली अजोड देन आहे.
- एक सुप्रसिद्ध गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालमुरलीकृष्ण यांनी संगीतकार आणि अभिनेता म्हणूनही भूमिका निभावल्या होत्या.
- तेलगू चित्रपट ‘भक्त प्रल्हाद’ यात त्यांनी नारदाची भूमिका साकारली होती. व्हॉयलिन, मृदंग आणि कंजिरा ही वाद्ये वाजविण्यातही ते निष्णात होते.
- भारतीय संगीत कलेमध्ये दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९७१) आणि पद्मविभूषण (१९९१) या पद्म किताबांनी बालमुरलींना गौरविले होते.
- सर्वोत्तम पार्श्वगायक व सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक म्हणून ते राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले होते.
- संगीत अकादमीने ‘संगीत कलानिधी’ या सर्वोच्च उपाधीने त्यांचा सन्मान केला होता. फ्रान्स सरकारनेही नागरी सन्मानाने त्यांच्या थोरवीची कदर केली होती.
- कर्नाटकी संगीत कलेची ख्याती जागतिक पातळीवर पोहोचवण्यामध्ये एम. बालमुरलीकृष्ण यांचा मोलाचा वाटा आहे.
अँडी मरेला एटीपी वर्ल्ड टूरचे जेतेपद
- ब्रिटनच्या अँडी मरेने सर्बियाचा नोव्हाक जोकोविचला नमवून एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या किताबावर नाव कोरले.
- या विजेतेपदासह मरेने यंदाच्या वर्षाची अखेर जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू म्हणून करणार असल्याचे निश्चित केले.
- तर दुसरीकडे जोकोविचला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून यंदाच्या वर्षाचा निरोप घ्यावा लागेल.
- अत्यंत आक्रमक खेळ केलेल्या मरेने या अंतिम सामन्यात जोकोविचचा ६-३, ६-४ असा धुव्वा उडवला.
- विशेष म्हणजे यांसह मरेने कारकिर्दीत पहिल्यांदाच एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचे जेतेपदही पटकावले.
- १ तास ४३ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मरेने जोकोवर पूर्ण वर्चस्व राखताना सलग २४वा विजय मिळविला.
- यंदाच्या वर्षी मे महिन्यात मरेने जोकोलाच पराभवाचा धक्का देत आपले पहिले इटालियन जेतेपद पटकावले होते.
इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहंमद मोर्सी यांची जन्मठेपेची शिक्षा रद्द
- इजिप्तच्या अपिलीय न्यायालयाने मुस्लिम ब्रदरहूडचे माजी अध्यक्ष मोहंमद मोर्सी यांची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे.
- त्यांच्याविरुद्ध पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, पॅलेस्टिनी गट हमाससाठी हेरगिरी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
- मोर्सी हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले अध्यक्ष होते, मात्र २०११मध्ये बंडखोरीमुळे २०१३मध्ये अब्दुल फतेह अल सीसी याने त्यांना हटविले होते.
- अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकले होते आणि त्यांच्याविरुद्ध विविध खटले दाखल करून त्याची सुनावणी सुरू करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राम नरेश यादव यांचे निधन
- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राम नरेश यादव यांचे २२ नोव्हेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
- राम नरेश यादव हे मधुमेह व फुफ्फुसाच्या विकाराने ग्रस्त होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर लखनऊ येथील संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात उपचार सुरू होते.
- रामनरेश यांनी १९७७ व १९७९ या कालावधीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा