चालू घडामोडी : ५ डिसेंबर

राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार

 • दिव्यांगजनांसाठी उल्लेखनीय कार्य करणारी देशातील सर्वोत्तम राज्य पुरस्कृत यंत्रणेचा राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाला मिळाला आहे.
 • जागतिक अपंग दिनानिमित्त (३ डिसेंबर) केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार वितरण सोहळा झाला.
 • महाराष्ट्रातील ७ व्यक्ती आणि ४ संस्थांसह ७८ व्यक्ती व संस्थांना १४ श्रेणींअंतर्गत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले.
 • राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
 महाराष्ट्रातील पुरस्कारार्थी 
व्यक्ती
 1. अल्प दृष्टी श्रेणी - गजानन बेलाले, उपसंचालक उद्योग संचालनालय, लातूर
 2. चलनवलन श्रेणी - डॉ. महंमद इर्फानूर रहीम, वैद्यकीय अधिकारी डागा स्मृती हॉस्पिटल, नागपूर
 3. सर्वोत्तम दिव्यांग व्यक्ती (बिगर व्यावसायिक) श्रेणी - राधा बोर्डे (इखनकर), नागपूर
 4. बहुदिव्यांग श्रेणी - निषाद शहा, पुणे
 5. कर्णबधिर श्रेणी - अश्विनी मेलवाने, पुणे
 6. सर्जनशील ज्येष्ठ श्रेणी - योगिता तांबे, मुंबई
 7. सर्वोत्तम दिव्यांग कर्मचारी श्रेणी - देवांशी जोशी, नागपूर
संस्था
 1. संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र, लातूर - सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त विद्यार्थ्यांवर उपचार
 2. सनराइज कॅंडल्स, महाबळेश्वर, जि. सातारा - २२८० दिव्यांगांना रोजगार
 3. भारतीय स्टेट बॅंक, विधिमंडळ शाखा, मुंबई - २८८२ दिव्यांगांना रोजगार
 4. एजीस लिमिटेड, मुंबई – (सर्वोत्तम बिगर सरकारी संस्था) ७७१ दिव्यांगांना रोजगार

लीलाधर जागुडी यांना गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार

 • कवी, शिक्षक, संपादक व पत्रकार अशी ओळख असलेले लीलाधर जागुडी यांच्या काव्यप्रतिभेला गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • ओडिशाचे कवी गंगाधर मेहेर यांच्या नावाने गेली २५ वर्षे संबळपूर विद्यापीठातर्फे हा पुरस्कार दिला जात आहे.
 • लीलाधर यांना यापूर्वी साहित्य अकादमी, रघुवीर सहाय सन्मान, शतदल व नमित पुरस्कार मिळाले आहेत.
 • गढवाल मध्ये जन्मलेल्या जागुडी यांनी हिंदीतून एम.ए. केल्यानंतर त्यांनी गढवाल रेजिमेंटमध्ये सैनिक म्हणून काम केले.
 • नंतर अनेक शाळा व महाविद्यालयांत अध्यापन केले. नंतर ते माहिती व जनसंपर्क खात्यात उपसंचालक बनले.
 • त्यांनी नऊ कवितासंग्रह लिहिले असून प्रौढ साक्षरांसाठी दोन पुस्तकेही लिहिली आहेत. ‘उत्तर प्रदेश’ या नियतकालिकाचे ते संपादक आहेत.
 • ‘अनुभव के आकाश में चाँद’ हा त्यांचा अनेक पुरस्कारविजेता काव्यसंग्रह आहे. त्यात अनेक सामाजिक प्रश्नांवर चिंता व्यक्त केली आहे.
 • नाटक जारी है, शंखा मुखी शिखारो पर, इस यात्रा में, रात अब भी मौजूद है, घबराये हुए शब्द, बाछी हुई पृथ्वी पर हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
 • त्यांच्या मुलाखतींवर आधारित ‘मेरे साक्षात्कार’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
 • त्यांच्या ‘समकालीन कवी लीलाधर जागुडी और धुमिल’ तसेच ‘समकालीन कविता और लीलाधर जागुडी’ या पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश आहे.
 • १९९७मध्ये त्यांना ‘अनुभव के आकाश में चॉँद’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
 • त्यांना २००४मध्ये हिंदी साहित्यातील कामगिरीसाठी पद्मश्री किताबही मिळाला आहे.

अवकाश तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये टीमइंडस

 • अवकाश तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये आता खासगी क्षेत्रातील ‘टीमइंडस’ या भारतीय कंपनीनेही आपले आव्हान निर्माण केले आहे.
 • चंद्रावर रोव्हर सोडण्यासाठी होत असलेल्या स्पर्धेमध्ये ही कंपनी सहभागी होत असून, इस्रोच्या सहकार्याने या प्रकल्पावर काम करण्यात येत आहे.
 • अवकाश तंत्रज्ञानामध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढावा व या तंत्रज्ञानामागील खर्च कमी व्हावा, यासाठी गुगलने ‘लुनार एक्स’ ही स्पर्धा जाहीर केली आहे.
 • तीन कोटी डॉलरच्या या स्पर्धेमध्ये ३० कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली असून, त्यातील १६ कंपन्या स्पर्धेत आहेत.
 • या १६पैकी चारच कंपन्यांनी प्रक्षेपणाचे करार अंतिम केले आहेत. यामध्ये २ अमेरिकी आणि १ इस्रायली आणि ‘टीमइंडस’ यांचा समावेश आहे.
 • या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर किमान ५०० मीटर अंतरापर्यंत प्रवास करावे आणि तेथील माहिती संकलित करावी, अशी अपेक्षा आहे.
 • तसेच, या मोहिमेच्या खर्चापैकी ९० टक्के वाटा खासगी क्षेत्रातून यायला हवा. हे प्रक्षेपण पुढील वर्षी करण्यात येणार आहे.
 • या मोहिमेसाठी ‘टीमइंडस’ ‘इस्रो’च्या ‘अँट्रिक्स’ या व्यावसायिक शाखेबरोबर काम करणार आहे.
 टीमइंडस 
 • ‘टीमइंडस’ २०१२पासून ‘इस्रो’बरोबर चांद्रमोहिमेच्या संशोधनामध्ये आहे. या मोहिमेसाठी कार्यक्षम असणारे मॉडेल सादर केल्याबद्दल ‘गुगल’ने २०१४मध्ये या कंपनीला १० लाख डॉलरचे बक्षीस दिले होते.
 • ‘टीमइंडस’च्या नियोजनानुसार, २८ डिसेंबर २०१७ रोजी या रोव्हरचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्या आधी तीन वेळा प्रायोगिक प्रक्षेपण होईल.
 • चंद्रावर रोव्हर पाठविण्याच्या या मोहिमेसाठी सहा कोटी डॉलरपर्यंत खर्च येणार आहे. यासाठी १०० जणांचा चमू कार्यरत आहे.
 • यामध्ये ‘इस्रो’तील २० निवृत्त शास्त्रज्ञही आहेत. अनेक उद्योजकांनी या मोहिमेसाठी हात दिला असून, यामध्ये रतन टाटा यांचाही समावेश आहे.

न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांचा राजीनामा

 • आठ वर्षांच्या कारकीर्दीनंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी ५ डिसेंबर रोजी कौटुंबिक कारणामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
 • पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यासोबतच त्यांनी न्यूझीलंड राष्ट्रीय पक्षाच्या नेते पदाचाही राजीनामा दिला.
 • की हे न्युझीलंडचे महान नेते व लोकप्रिय पंतप्रधान आहेत. २००८मध्ये पहिल्यांदा त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली.
 • नुकतीच त्यांनी नॅशनल पार्टीमधल्या आपल्या नेतृत्वाची १० वर्षे पूर्ण केली आहेत.
 • की यांचा राजीनामा १२ डिसेंबरला स्वीकारला जाणार असून आणि याच दिवशी न्यूझीलंड राष्ट्रीय पक्ष आपल्या नेत्याची निवड करणार आहे.
 • उप पंतप्रधान बिल इंग्लिश हे या पदासाठी इच्छुक असतील तर आपला त्यांना पाठिंबा असेल असे की यांनी जाहीर केले आहे.
 • २००१साली इंग्लिश हे न्यूझीलंडचे पंतप्रधान झाले होते. परंतु २००२मध्ये राष्ट्रीय पक्षाला निवडणुकांमध्ये मोठी हार पत्करावी लागल्यामुळे त्यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते.

आयएनएस बेटवाला अपघात

 • मुंबईतील नौदलाच्या गोदीमध्ये डागडुजीसाठी आलेल्या आयएनएस बेटवा या युद्धनौकेला समुद्रात सोडताना अपघात झाला आहे.
 • या अपघातात १४ नौसैनिकांची सुटका करण्यात आली असून २ नौसैनिकांचा यात मृत्यू झाला आहे.
 • आयएनएस बेटवा ही युद्धनौका भारतीय बनावटीची युद्धनौका आहे. मुंबईतील नौसेनेच्या गोदीत या युद्धनौकेची डागडुजी सुरु होती.
 • आयएनएस बेटवा या युद्धनौकेचे वजन ३८०० टन असून २००४मध्ये ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली.
 • १२५ मीटर लांब ही युद्धनौका ३० सागरी मैल प्रति तास या वेगाने प्रवास करु शकते.
 • या युद्धनौकेत अत्याधुनिक तंत्रज्ञान असून जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारी मिसाईल आणि मिसाईल हल्लारोधक यंत्रणाही या युद्धनौकेत आहेत.

सरकारी विभागांना ई पेमेंटची सक्ती

 • केंद्र सरकारने सर्व सरकारी विभागांना कंत्राटदार, पुरवठादार किंवा अनुदान अशा कोणताही स्वरुपातील ५००० रुपयांवरील देयकाची रक्कम अदा करण्यासाठी ई पेमेंटचा वापर करावा असे आदेश दिले आहेत.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस अर्थव्यवस्थेवर भर दिला असून त्यामुळे भ्रष्टाचार आणि काळा पैशावर निर्बंध येतील असा दावा त्यांनी केला आहे.
 • या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रायलाने ई पेमेंटची सक्ती केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा