चालू घडामोडी : ८ जानेवारी

भारताचे अणुवैज्ञानिक प्रा. बलदेव राज यांचे निधन

 • भारताचे अणुवैज्ञानिक प्रा. बलदेव राज त्यांचे ६ जानेवारी रोजी पुणे येथे एका परिषदेसाठी आले असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
 • त्यांचा जन्म काश्मीरमध्ये झाला पण नंतर ते बंगलोरला स्थायिक झाले. रायपूर येथील पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठातून त्यांनी पदवी व नंतर बंगलोरच्या आयआयएससी या संस्थेतून पीएचडी केली.
 • त्यांचे बहुतांश संशोधन अणुक्षेत्रात असले तरी पदार्थ विज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान व विज्ञानविषयक धोरणे यांवरही त्यांनी बरेच काम केले होते. वैज्ञानिक राजनय व वैज्ञानिक धोरण यात त्यांनी सरकारला मोठी मदत केली.
 • अणुशक्ती विभागात ते ४५ वर्षे कार्यरत होते. त्यांनी एकूण ८० पुस्तके, १३०० शोधनिबंध व १०० लेख लिहिले आहेत.
 • सध्याच्या काळात ऊर्जा, पाणी, आरोग्य सुविधा, उत्पादनक्षमतेत वाढ अशा बहुअंगी आव्हानांचा वेध त्यांच्या संशोधनाने घेतला.
 • सोडियम फास्ट रिअ‍ॅक्टर्स व त्याच्याशी संबंधित इंधनचक्र याचे संशोधन त्यांनी केले. तसेच वेल्डिंग करोजन, फेरोफ्लुइड्स व सेन्सर्स हेदेखील त्यांचे संशोधनाचे विषय होते.
 • कलपक्कम येथील इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटॉमिक रीसर्च या संस्थेत त्यांनी काम केले होते. सध्या ते नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज या संस्थेचे संचालक होते.
 • इंटरनॅशनल न्यूक्लियर एनर्जी अ‍ॅकॅडमी, इंटरनॅशनल अमेरिकन सोसायटी ऑफ मेटल्स, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ वेल्डिंग इंटरनॅशनल अशा अनेक संस्थांवर त्यांनी काम केले.
 • कलपक्कम येथे संशोधन करताना त्यांनी फास्ट ब्रीडर टेस्ट रिअ‍ॅक्टर व फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर या दोन्ही प्रकारच्या अणुभट्टय़ांची प्रारूपे तयार करण्यात यश मिळवले.
 • अणुसाहित्य, यांत्रिकी, नॅनोसायन्स (अब्जांश तंत्रज्ञान), रोबोटिक्स या क्षेत्रात अनेक संस्था उभ्या करण्यात त्यांचा वाटा होता.
 • पद्मश्री, होमी भाभा सुवर्णपदक, एच के फिरोदिया पुरस्कार, ओमप्रकाश भसीन पुरस्कार, वासविक पुरस्कार, इंडियन न्यूक्लियर सोसायटीचा जीवनगौरव, गुजरमल मोदी पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.

समुद्रमार्गानेही हज यात्रा शक्य होणार

 • भारतातून जाणाऱ्या हजयात्रेकरूंसाठी स्वस्तातील समुद्रमार्ग उपलब्ध करून देण्याच्या भारत सरकारच्या मागणीला सौदी अरेबियाने मान्यता दिली आहे.
 • यामुळे जेद्दाहला जाणारा हा समुद्र मार्ग २३ वर्षांनंतर खुला होणार आहे. सध्या हज यात्रेला जाण्यासाठी फक्त हवाई मार्गाचा पर्याय यात्रेकरूंना आहे. 
 • केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि सौदीचे हज मंत्री मोहम्मद सालेह बिन ताहेर बिन्तीन यांनी मक्केतील यात्रेबाबतच्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
 • आता उभय देशांनी याबाबतच्या अन्य तांत्रिकतेची जुळवाजुळव पूर्ण केल्यानंतर येणाऱ्या काळात समुद्रमार्ग लवकरच उपलब्ध होईल.
 • मुंबईतील यलो गेटपासून जेद्दाहपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्वी १२-१५ दिवस लागत आता आधुनिक बोटींमुळे हा प्रवास ३-४ दिवसांपर्यंत कमी होऊ शकतो.
 • तसेच या सागरी मार्गामुळे हज यात्रेकरूंना बऱ्यापैकी स्वस्त प्रवासाचा मार्ग आता उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा गरीब यात्रेकरूंना होईल.
 • मुस्लिम महिलांसाठी सरकारने नव्या धोरणात विशेष तरतूद केली आहे. महिलांना पुरूष सहकाऱ्याशिवायही (मेहरम) यात्रा करता येणार आहे.
 • त्यांच्यासाठी राहण्याची आणि प्रवासाची स्वतंत्र व्यवस्था केली जाईल इतकेच नव्हे तर, त्यांच्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी असतील.

अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचे निधन

 • ‘लगान’ चित्रपटामध्ये ‘ईश्वर काका’ची भूमिका साकारणारे अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचे ७ जानेवारी रोजी जयपूर येथे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते.
 • जवळपास ६० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या व्यास यांना काही वर्षांपूर्वी एका भोजपुरी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अर्धांगवायूचा झटका आला होता.
 • त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे २००८नंतर ते रुपेरी पडद्यापासून दूर होत गेले.
 • ‘लगान’ मध्ये त्यांनी साकारलेला ‘ईश्वर काका’ आणि केतन मेहतांच्या ‘सरदार’ चित्रपटामधील मोहम्मद अली जिन्ना या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.
 • त्याशिवाय ‘सरफरोश’, ‘अभय’, ‘आन- मेन अॅट वर्क’, ‘शूल’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस- द फॉरगॉटन हिरो’ आणि ‘संकेत सिटी’ या चित्रपटांमध्ये काम केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा