चालू घडामोडी : ३ मार्च

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुका

 • फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल ३ मार्च रोजी जाहीर झाले.
 • यापैकी त्रिपुरा व नागालँड या दोन राज्यात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी बाजी मारली आहे. तर मेघालयमध्ये कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
 • त्रिपुरामध्ये मागील २५ वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या डाव्या पक्षांना पराभूत करत भाजपने तेथे भगवा फडकावला. तर नागालँडमध्ये प्रबळ असलेल्या नागा पीपल्स फ्रंटवर मात करून तिथेही सत्ता काबीज केली.
 • आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर या राज्यांमध्ये आधीच भाजपची सत्ता होती. त्यात त्रिपुरा आणि नागालँडची भर पडणार आहे.
 • मेघालयमध्ये भाजपची अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी झाली असली तरीही मित्रपक्षांच्या मदतीने भाजप तिथे बिगरकाँग्रेस सरकार स्थापन करू शकते.
 त्रिपुरा 
 • त्रिपुरात भाजपाने ३५ जागा जिंकत ३१ हा बहुमताचा आकडा सहज पार केला व ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
 • डाव्या पक्षांना त्रिपुरात १६ जागांवर विजय मिळाला आहे तर आयपीएफटीने ८ जागांवर विजय मिळवला आहे.
 • मुख्यमंत्री माणिक सरकार यांची स्वच्छ प्रतिमा आणि डाव्यांची मतदान यंत्रणा लक्षात घेता त्रिपुरामध्ये भाजपला सोपे आव्हान नव्हते.
 • मात्र त्रिपुरात आदिवासींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडिजिनीअस पीपल्स फ्रण्ट ऑफ त्रिपुरा’ (आयपीएफटी) या पक्षाशी भाजपाने युती करून जोरदार मुसंडी मारली.
 • भाजपच्या या विजयाचे सर्व श्रेय भाजपचे राष्ट्रीय सचिव व त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर आणि प्रदेशाध्यक्ष विप्लब कुमार देव यांना जाते. विप्लब कुमार देव हे कदाचित त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असू शकतील.
त्रिपुरा (एकूण जागा : ६०)
पक्ष विजय
भाजप + आयपीएफटी ३५ + ८ = ४३
डावे १६
काँग्रेस
इतर
 नागालँड 
 • नागालँडमध्ये सत्तारूढ नागा पीपल्स फ्रंटमध्ये भागीदार असलेल्या भाजपने निवडणुकीच्या तोंडावर नव्याने स्थापन झालेल्या ‘एनडीपीपी’सोबत आघाडी करत सत्ता काबीज केली.
 • नागा पीपल्स फ्रंटनेही आता भाजपला तिथे स्वत:हून पाठिंबा देऊ केला आहे. ‘एनडीपीपी’चे प्रमुख व माजी मुख्यमंत्री नेफू रिओ नागालँडचे हे नवे मुख्यमंत्री असतील.
नागालँड (एकूण जागा : ६०)
पक्ष विजय
नागा पीपल्स फ्रंट २९
भाजप + एनडीपीपी २९
काँग्रेस
इतर
 मेघालय 
 • गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला यावेळी मेघालयमध्ये एकहाती सत्ता मिळविण्यास अपयश आले आहे.
 • काँग्रेस येथे २१ जागा जिंकत मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना बहुमत गाठता न आल्याने येथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
 • मेघालयमध्ये भाजपला फक्त २, नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) १९ तर अन्य छोटे पक्ष व अपक्षांना १७ जागा मिळाल्या आहेत.
 • बहुमतासाठी आवश्यक ३१ हा आकडा गाठताना काँग्रेसची दमछाक होणार आहे. काँग्रेसने अहमद पटेल व कमल नाथ या दोन ज्येष्ठ नेत्यांना लगेचच शिलाँगला वाटाघाटीसाठी पाठविले आहे.
 • भाजपानेही हिमांता बिस्वा सर्मा यांना शिलाँगला पाठविले आहे. सर्मा हे एके काळी काँग्रेसमध्ये होते आणि सध्या भाजपाच्या ‘नेडा’ (नॉर्थ ईस्ट डेमॉक्रेटिक अलायन्स - ईशान्य लोकशाही आघाडी)चे प्रमुख आहेत.
मेघालय (एकूण जागा : ६०)
पक्ष विजय
काँग्रेस २१
एनपीपी १९
भाजप
यूडीपी
इतर १०
 देशातील २० राज्यांमध्ये भाजपची सत्ता 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता. त्यांनी केलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसते आहे.
 • २०१४मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देशातील ७ राज्यांमध्ये भाजपाची तर १३ राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती.
 • आता झालेल्या ३ राज्यांच्या निवडणुकांनंतर भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या २०वर पोहोचली आहे. मेघालयमध्येही भाजप सरकार स्थापन करू शकल्यास ही संख्या २१ होईल.
 • २० राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजपा हा देशातील पहिलाच पक्ष ठरला आहे.
 • २०१४मध्ये देशातील ३५ टक्के लोकसंख्येवर यूपीएचे राज्य होते. तर २२ टक्के लोकसंख्येवर एनडीएचे राज्य होते. मात्र सध्याचा विचार करता सुमारे ७० टक्के लोकसंख्येवर भाजपा आणि एनडीएचे राज्य आहे.
 • पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुका जिंकण्याचा दावाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.
 • भाजपकडील २० राज्ये : उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, झारखंड, आसाम, हरियाणा, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा.
 • काँग्रेसची सत्ता असलेली पाच राज्ये : कर्नाटक, पंजाब, मेघालय, मिझोरम, पाँडेचरी
 • अन्य पक्षांकडील राज्ये : पश्चिम बंगाल (तृणमूल कॉंग्रेस), तामिळनाडू (अण्णा द्रमुक), ओडिशा (बिजू जनता दल), तेलंगण (तेलंगण राष्ट्र समिती), केरळ (मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी), दिल्ली (आम आदमी पार्टी).
 निवडणुकानंतरची सद्यस्थिती 
 • भाजपच्या व मित्रपक्षांच्या ताब्यात आता २९ पकी २० राज्ये. मेघालयमध्येही भाजपचे सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू असून तसे झाल्यास ते २१वे राज्य ठरेल.
 • त्रिपुरा व नागालँड या २ राज्यांत काँग्रेसला एकही जागा जिंकण्यात यश आले नाही.
 • ईशान्येतील सात राज्यांपैकी या क्षणाला पाच राज्ये (आसाम, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड) भाजपकडे. मेघालय भाजपकडे गेल्यास फक्त मिझोरामचा अपवाद ठरेल.
 • भाजपचे प्रदेशाध्यक्ष विप्लब कुमार देव हे त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असतील, तर एनडीपीपीचे प्रमुख नेफू रिओ हे नागालँडचे मुख्यमंत्री होतील.
 • २५ वर्षांपासून असलेली त्रिपुरातील सत्ता संपुष्टात आल्याने डाव्यांकडे आता फक्त केरळची सत्ता उरली आहे.
 • मेघालयमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही तर काँग्रेसकडे फक्त तीन राज्ये (कर्नाटक, पंजाब, मिझोराम) व पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेशाची सत्ता उरेल.
 व्यक्तिविशेष : सुनील देवधर 
 • त्रिपुरामध्ये भाजपाने शून्यातून थेट ४४ जागांची गरुडझेप घेतली. ही किमया साकारणारे भाजपच्या विजयाचे शिल्पकार आहेत मुंबईचे सुनील देवधर.
 • देवधर यांचा जन्म पुण्यात झाला. मुंबईत अंधेरीमध्ये त्यांचे घर होते. ते अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करीत आहेत.
 • सुनील यांनी एम.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतले आहे. बी.एड. केल्यानंतर ३ वर्षे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले.
 • त्यांनी १९९१साली संघ कार्याला वाहून घेतले. त्रिपुराच्या निवडणुकीआधी त्यांना राज्याचे प्रभारी बनवण्यात आले होते.
 • मेघालयमध्ये सलग ९ वर्षांच्या काळात त्यांनी खासी व जयंतिया या जमातींमध्ये संघाच्या कामाचा विस्तार केला. या काळात त्यांची ईशान्येतील राज्यांशी नाळ जुळली.
 • ईशान्येतील राज्यांत शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने तेथील मुलांना शिक्षणासाठीअन्य राज्यांत पाठवण्याचे काम त्यांनी सुरू केले.
 • त्यासाठी त्यांनी ‘माय होम’ ही संस्था २००५मध्ये सुरू केली. या मुलांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून छात्रावासही सुरू केले.
 • २०१४सालच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात देवधर यांच्यावर प्रचार व्यवस्थापकाची जबाबदारी होती. 
 • त्रिपुरातील निवडणुकांपूर्वी डावे पक्ष, काँग्रेस व तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजपामध्ये आले. त्यातही देवधर यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
 • कामात गती यावी यासाठी देवधर यांनी त्रिपुरा व मेघालयातील स्थानिक जमातींच्या भाषाही शिकून घेतल्या. यामुळेच देवधर यांच्याबद्दल स्थानिकांना आस्था वाटते. देवधर सफाईदारपणे बंगालीही बोलतात.
 • आपण त्रिपुराचे मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही हे सुनील देवधर यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.    

नोबेल विजेते अमेरिकी जीवशास्त्रज्ञ गुंथर ब्लोबेल यांचे निधन

 • नोबेल विजेते अमेरिकी जीवशास्त्रज्ञ गुंथर ब्लोबेल यांचे १८ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
 • पेशींच्या अंतर्गत भागांमध्ये प्रथिनांच्या हालचालींशी संबंधित संशोधनासाठी १९९९मध्ये त्यांना नोबेल मिळाले होते.
 • त्यांचा जन्म १९३६साली तेव्हा जर्मनीमध्ये आणि आता पोलंडमध्ये असेलेल्या वॉल्टर्सडॉर्फ शहरात झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते जर्मनीतून अमेरिकेत आले.
 • ब्लोबेल यांनी टुबिनगेन विद्यापीठातून एमडी केली व नंतर मॅडिसनमधील विस्कॉन्सिन विद्यापीठात आले.
 • रॉकफेलर विद्यापीठातून त्यांनी दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पेशी जीवशास्त्रातील कारकीर्द सुरू ठेवली.
 • पेशीतील प्रथिनांच्या हालचालींवर आधारित सिग्नल हायपोथेसिस त्यांनी पेशी जीवशास्त्रज्ञ डेव्हिड डी साबातिनी यांच्याबरोबर काम करताना मांडले.
 • रेणवीय झिपकोड या पेशीतील रेणूंच्या हालचालींच्या संकेतावलीचा उलगडा त्यांनी केला. त्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांची कारणमीमांसा करणे शक्य झाले.
 • त्यांच्या संशोधनातून पुढील काळात सिस्टीक फायब्रॉसिस, ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग), स्किझोफ्रेनिया (व्यक्तिमत्त्व दुभंग), एड्स, कर्करोग व इतर आनुवंशिक रोगांवर मोठी प्रगती झाली.
 • १९९९मध्ये त्यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल मिळाले तेव्हा त्यांनी ते पैसे फ्रेंड्स ऑफ ड्रेसडेन या संस्थेच्या पुनर्उभारणीसाठी दिले.
 • त्यांना १९९३मध्ये मूलभूत वैद्यकीय संशोधनासाठी अल्बर्ट लास्कर पुरस्कार मिळाला होता. १९९७मध्ये त्यांना विज्ञान संशोधनात न्यूयॉर्कच्या महापौराचा पुरस्कार मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा