चालू घडामोडी : १७ मार्च
प्रा. मार्गारेट मुरनन यांना सेंट पॅट्रिक विज्ञान पदक प्रदान
- जगातील सर्वात वेगवान लेसरची निर्मिती करणाऱ्या लेसर तंत्रज्ञ प्रा. मार्गारेट मुरनन यांना आर्यलडचे सेंट पॅट्रिक विज्ञान पदक प्रदान करण्यात आले.
- अमेरिकेत काम करत असतानाही त्यांना आयर्लंडमध्ये गौरवण्यात येण्याचे कारण म्हणजे त्या जन्माने आयरिश आहेत. आयर्लंडमध्ये संशोधनासाठी वेगळे वातावरण निर्माण करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.
- प्रा. मुरनन अमेरिकेतील सर्वोत्तम भौतिकशास्त्रज्ञ व तंत्रज्ञांपैकी एक आहेत. लेसर अभियांत्रिकीत त्यांनी मोठे काम केले आहे. अतिशय वेगवान प्रकाशीय व क्ष-किरण विज्ञान हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
- जगातील सर्वात वेगवान लेसर शलाका त्यांनी तयार केल्या. त्यांनी तयार केलेले लेसर रासायनिक अभिक्रियांतील अणूंची गती मोजू शकतील इतके वेगवान आहेत.
- त्यांनी तयार केलेल्या काही लेसर शलाका या १२ फेमटोसेकंदात (सेकंदातील दहाचा उणे पंधराव्या घाताएवढा भाग) निर्माण होणाऱ्या आहेत.
- वैज्ञानिक संशोधनात नेक पदार्थाच्या रचना, शरीररचनेचा अभ्यास करण्यासाठी प्रतिमाचित्रणाला महत्त्व आहे. हे चित्रण अधिक सुस्पष्ट करणारे लेसर किरण तयार करण्यात डॉ. मुरनन यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
- वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन व युनिव्हर्सिटी ऑफ कोलॅरॅडो येथे त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे.
- अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या त्या फेलो असून यापूर्वी त्यांना मारिया गोपर्ट मेयर पुरस्कार मिळाला होता.
- युनिव्हर्सिटी ऑफ कोलॅरॅडोच्या त्या मानद सदस्या तर अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस या प्रख्यात संस्थेच्या त्या फेलो आहेत.
प्रशासक समिती व बीसीसीआय पदाधिकारी यांच्यातील मतभेद तीव्र
- विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासक समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी अध्यक्ष सी के खन्ना, हंगामी सचिव अमिताभ चौधरी व खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचे सर्व कार्यालयीन अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यामुळे बीसीसीआयची द्विसदस्यीय प्रशासकीय समिती आणि त्रिसदस्यीय पदाधिकारी यांच्यातील मतभेद आणखी तीव्र झाले आहेत.
- विनोद राय यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय समितीने प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना, प्रभारी सचिव अमिताभ चौधरी आणि कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांचे सर्व
- गेल्याच आठवड्यात प्रशासक समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या आपल्या अहवालात या पदाधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी केली होती. यापुढे जात आता या पदाधिकाऱ्यांचे सर्वाधिकार समितीने काढून घेतले आहेत.
- आता प्रशासकीय समितीच्या परवानगीशिवाय या पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यांचा आणि निवासाचा खर्च केला जाणार नाही.
- यापुढे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना लोढा समिती संदर्भातील खटल्यासाठी कायदेशीर खर्च करण्याचा अधिकारसुद्धा राहणार नाही.
टीटीव्ही दिनकरन यांच्या नव्या पक्षाची स्थापना
- अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी झालेले नेते टीटीव्ही दिनकरन यांनी दिवंगत जयललिता यांच्या नावाने ‘अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम’ नावाचा पक्ष स्थापन केला आहे.
- त्यांनी आपल्या नव्या पक्षाच्या झेंड्याचेही अनावरण केले. त्यावर माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे हसरे छायाचित्र आहे.
- दिनकरन यांना अण्णा द्रमुक पक्षातील असंतुष्ट कार्यकर्ते आणि नेते यांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
- तामिळनाडूमध्ये आतापर्यंत द्रमुक, अण्णा द्रमुक, काँग्रेस, भाजपा हे प्रमुख पक्ष होते. याशिवाय रामदास यांचा पीएमके, वायको यांचा एमडीएमके हे पक्षही सक्रिय आहेत. दोन्ही डाव्या पक्षांची काही ठिकाणी ताकद आहे.
- कमल हसन व रजनीकांत हेही आता राजकारणात सक्रिय झाले आहे. दिनकरन यांनीही नवा पक्ष स्थापन केला. एकूणच तामिळनाडूमध्ये पक्षांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.
- सध्या तुरुंगात असलेल्या शशिकला यांचे दिनकरन हे भाचे आहेत. डिसेंबर महिन्यात झालेल्या चेन्नईतील आरके नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.
लोकेश राहुल वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू : विस्डेन इंडिया
- विस्डेन इंडिया अल्मनॅकच्या सहाव्या आवृत्तीमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून भारताच्या लोकेश राहुलची निवड करण्यात आली आहे.
- या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर भारतीय महिला क्रिकेट संघाचे वर्ल्ड कपदरम्यान जल्लोष करतानाचे छायाचित्र वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
- भारताचा कर्णधार विराट कोहलीला नियतकालिकाने सर्वांत यशस्वी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरवले आहे.
- महिला क्रिकेटमध्ये भारताच्या दीप्ती शर्माचा समावेश वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये करण्यात आला आहे.
- भारताच्या इरापल्ली प्रसन्ना आणि शांता रंगस्वामी या अनुक्रमे माजी पुरुष व महिला क्रिकेटपटूंचा समावेश विस्डेन इंडियाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा