चालू घडामोडी : १६ मार्च

तेलगु देसम पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर

  • चंद्राबाबू नायडू यांचा तेलगु देसम पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडला आहे.
  • आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन मोदी सरकार विरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्न सुरु असताना चंद्राबाबू नायडू यांनी देखील भाजपाला धक्का दिला आहे. 
  • आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी मोदी सरकारने मान्य न केल्यामुळे आंध्र प्रदेशमधील राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.
  • आंध्र प्रदेशमधील विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तर भाजपाचा मित्रपक्ष आणि आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलगू देसम पक्षानेही मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
  • ८ मार्च रोजी तेलगू देसम पक्षाचे नेते अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचे राजीनामे दिले होते.
  • लोकसभेत तेलगू देसमचे १६ तर राज्यसभेत ६ खासदार आहेत. त्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
  • रालोआतून बाहेर पडताच तेलगू देसम पक्षानेही मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडणार, असे स्पष्ट केले आहे.
  • सद्यस्थितीत ५४३ सदस्यांच्या लोकसभेत ५३६ खासदार आहेत. त्यात एकट्या भाजपाचेच २७३ खासदार आहेत. ही संख्या बहुमतापेक्षाही जास्त आहे.
  • टीडीपीने पाठिंबा काढून घेतल्यानंतर रालोआचे संख्याबळ ३१२वर आले आहे. त्यामुळे अविश्वास ठराव आला तरी तो मंजूर होणार नाही, हे स्पष्ट आहे.

मानव तस्करी प्रकरणात गायक दलेर मेहंदीला दोन वर्षे तुरुंगवास

  • पंजाब मधील पटियाला न्यायालयाने २००३सालच्या मानव तस्करी प्रकरणात प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदीला दोषी ठरवून दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
  • दलेर मेहंदीचा भाऊ शमशेर सिंग यालाही या प्रकरणात दोषी ठरवले आहे. सध्या दलेर पंजाब पोलिसांच्या कोठडीत आहे. 
  • दलेर मेहंदी आणि शमशेर सिंग यांच्यावर बेकायदेशीररित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप होता. मानवी तस्करीसंदर्भात दलेर मेंहदीवर ३१ गुन्हे आहेत. 
  • हे दोघे सामान्य नागरिकांना आपल्या म्युझिक ट्रुपचे सदस्य असल्याचे दाखवून परदेशात पाठवायचे. अवैधरित्या मानव तस्करी करण्यासाठी ते घसघशीत रक्कमही आकारायचे.
  • मेहंदी बंधु १९९८ आणि १९९९ साली दोन ट्रुप घेऊन परदेशात गेले होते. त्यावेळी ट्रुपचे सदस्य असल्याचे दाखवून ते बेकायदेशीररित्या १० जणांना अमेरिकेत घेऊन गेले.
  • बशिक्ष सिंग यांच्या तक्रारीवरुन २००३साली दलेर आणि शमशेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या दोघांविरोधात घोटाळयाच्या अनेक तक्रारी समोर आल्या.
  • पटियाला पोलिसांनी नवी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील दलेर मेहंदीच्या ऑफीसवर छापा मारुन कागदपत्रेही जप्त केली होती.

आशा बगे यांना पहिला साहित्यव्रती पुरस्कार जाहीर

  • प्रख्यात मराठी लेखिका आशा बगे यांना प्रथमच दिला जाणारा ‘प्रा. राम शेवाळकर स्मृती साहित्यव्रती पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
  • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिला जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
  • विदर्भ साहित्य संघाचे व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेल्या व आयुष्यभर साहित्याची व्रतस्थपणे सेवा करणाऱ्या राम शेवाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.
  • स्त्रीकेंद्री जाणिवेच्या प्रभावी लेखिका अशी ओळख असलेल्या आशा बगे यांनी परंपरा आणि आधुनिकता याची सांगड घालत त्यांनी सुमारे चार दशके कथा, कांदबरी, ललित असे चौफेर लेखन केले आहे.
  • त्यांच्या ‘भूमी’ या कांदबरीला २००६साली साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे. ‘दर्पण’ या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
  • साहित्य क्षेत्रातील त्यांचे हे योगदान डोळ्यापुढे ठेवून महामंडळाने त्यांना या पुरस्कारासाठी निवडले आहे.

नेपाळ क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा

  • विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये नेपाळने पपुआ न्यू गिनी संघाला सहा विकेट राखून हरवले. त्यामुळे नेपाळ क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे.
  • दीपेंद्र सिंग ऐरीच्या अष्टपैलू खेळाने नेपाळच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या पराभवामुळे गिनीने आपला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा गमावला आहे.
  • संदीप लॅमिचाने आणि दीपेंद्र यांनी प्रत्येकी चार बळी घेत पपुआ न्यू गिनीचा डाव २४.२ षटकांत ११४ धावांत गुंडाळला. 
  • त्यानंतर नेपाळने चार फलंदाजांच्या मोबदल्यात २३ षटकांत विजयी लक्ष्य पार केले. दीपेंद्रने ५८ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारासह नाबाद ५० धावा काढल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा