देशात आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात पळ काढणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा अधिकार देणाऱ्या ‘फ्युजीटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स बिल २०१८’ या विधेयकास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. (फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक)
या विधेयकामुळे मोठे आर्थिक गैरव्यवहार करून पळून जाणाऱ्या उद्योजकांची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळणार आहे.
अशा व्यक्तींची देशाबाहेर असलेली संपत्तीही जप्त करण्याचा अधिकार या विधेयकामुळे मिळणार आहे. परंतु परदेशातील संपत्तीवर कारवाई करण्यासाठी त्या देशाचे सहकार्य आवश्यक असेल.
यासंदर्भातील मसुदा कायदा मंत्रालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मंजूर केला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात आले होते.
या विधेयकामध्ये आर्थिक गैरव्यवहार करून पळ काढणाऱ्यांची स्पष्ट करण्यात आलेली व्याख्या : अशी व्यक्ती जिच्याविरोधात अटक वॉरंट निघाले आहे आणि त्या व्यक्तीने देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला किंवा गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई टाळण्यासाठी देशाबाहेर निघून गेली असेल आणि या कारवाईला सामोरे जाण्यासाठी भारतात परतण्यास नकार देत असेल.
या विधेयकामध्ये मुद्दाम कर्ज थकविणे, आर्थिक फसवणूक करणे, ठेवी परत न देणे अशा विविध आर्थिक गैरव्यवहारांचा समावेश करण्यात आला आहे.
अशा प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारांमध्ये यापुढे आणि यापूर्वी पळून गेलेल्यांवर या अधिकारांतर्गत कारवाई करता येऊ शकेल.
विजय मल्ल्या, ललित मोदी, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीसारखे उद्योजक भारतात आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आली आहेत.
रॉजर फेडररला प्रतिष्ठेचा लॉरियस क्रीडा पुरस्कार
दुखापतीतून सावरून गेल्यावर्षी पुनरागमन केलेल्या दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा लॉरियस क्रीडा पुरस्कार पटकावला आहे.
वर्षातील ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ आणि ‘सर्वोत्तम पुनरागमन’ असे दोन पुरस्कार मिळविणाऱ्या फेडररच्या एकूण लॉरियस पुरस्कारांची संख्या सहा झाली आहे.
सर्वोत्तम खेळाडूसाठी फेडररला राफेल नदाल या टेनिसपटूबरोबरच ख्रिस्तियानो रोनाल्डो या फुटबॉलपटूचे आव्हान होते. त्यांना मागे टाकून फेडररने हा मान मिळवला.
त्याने या यशाचे श्रेय आपला कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाल याला देतानाच ‘नदालमुळे मी चांगला खेळाडू बनू शकलो,’ असे मत व्यक्त केले.
फेडररने दुखापतीचे चक्र भेदून जानेवारी २०१७सालच्या ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवत साडेचार वर्षांचा ग्रँडस्लॅम जेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर त्याने २०१७ची विम्बल्डन स्पर्धाही जिंकत पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केले होते.
महिलांमध्ये सेरेना विल्यम्सला लॉरियस पुरस्कार देण्यात आला. तिने गतवर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकून कारकीर्दीमधील २३व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाची नोंद केली होती.
याशिवाय सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा मान १८ वर्षीय गोल्फपटू सर्जी गार्सियाला मिळाला.
how can i download this page?????
उत्तर द्याहटवा