ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांचे मुंबईतील लीलावती रूग्णालयात १० मार्च रोजी निधन झाले.
अडचणींवर मात करून काँग्रेस पक्षात स्वतःचे स्थान निर्माण करणारे नेते अशी पतंगराव कदम यांची ख्याती होती.
सांगली जिल्ह्यातील एका लहान शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पुण्यात ते द्विपदवीधर आणि शिक्षकही झाले. त्यांच्या नावापुढे डॉक्टरेटही लागली.
१९६८मध्ये त्यांच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात झाली. यशवंत राव मोरे आणि शंकरराव मोरे या दोघांनाही पतंगराव कदम गुरुस्थानी मानत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिवर्तनासाठी पतंगराव कदम यांनी पावले उचलली.
रयत शिक्षण संस्थेत महिना ७० रुपये पगाराची नोकरी करून आयुष्य सुरु करणारे पतंगराव कदम सध्याच्या घडीला १८४ संस्थांचे संचालक होते.
१९६४मध्ये पुण्यातील कसबा पेठ भागात असलेल्या एका दहा बाय दहाच्या खोलीत त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली.
या विद्यापीठाने सुवर्ण महोत्सवी वर्षाचा टप्पा गाठला असून, १९९६पासून या विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जाही प्राप्त झाला.
या विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. तर सेवकांची संख्या हजारांच्या घरात आहे. या विद्यापीठामुळे अनेकांना शिक्षण तर मिळालेच पण अनेकांच्या रोजगाराचाही प्रश्न सुटला.
शिक्षण प्रसाराचे कार्य सुरु असतानाच १९८०च्या सुमारास त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत ते पराभूत झाले.
त्यांनी १९८५मध्ये पुन्हा लढत दिली आणि आमदार झाले. तेव्हापासून १९९५चा अपवाद वगळला तर सहावेळा निवडून आले.
१९९९मध्ये उद्योग आणि जलसंधारण खात्याचे मंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली. मुख्यमंत्रीपदासाठीही पतंगराव कदम यांच्या नावाची चर्चा झाली होती.
सहा वेळा आमदार म्हणून ते निवडून आले आणि १८ वर्षे ते मंत्री होते. वन खाते, उद्योग, मदत आणि पुनर्वसन अशी खाती त्यांनी सांभाळली.
त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक उत्तम राजकारणी आणि एक चांगला शिक्षण प्रसारक गमावला आहे.
भारत व फ्रान्स दरम्यान १४ करार
भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये यावेळी दोन्ही देशांमध्ये एकूण १४ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.
यामुळे संरक्षण, अवकाश आणि उच्च तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक वाढणार आहे.
चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या मॅक्रॉन यांचे ९ मार्च रोजी रात्री दिल्लीत आगमन झाले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळावर उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले.
नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत अंजुम मुद्गीलला रौप्यपदक
मेक्सिको येथे सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अंजुम मुद्गीलने ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे.
अंजुमचे विश्वचषकातील हे पहिलेच पदक ठरले आहे. चीनच्या रुईजीओ पेईने ४५५.४ गुणांसह सुवर्णपदक, तर चीनच्यात टिंग सूनने ४४२.२ गुणांसह कांस्यपदक मिळवले. अंजुमने ४५४.२ गुणांची कमाई केली.
३ पोझिशनमध्ये गुडघ्यावर बसून (नी), पोटावर झोपून (प्रोन) आणि उभे राहून (स्टँडिंग) अशा तीन प्रकारांत प्रत्येकी १५ शॉट्स मारायचे असतात.
या स्पर्धेतील भारताचे हे आठवे पदक आहे. आतापर्यंत भारतीय नेमबाजपटूंनी ३ सुवर्ण १ रौप्य आणि ४ कांस्यपदकांची कमाई केली आहे.
८ पदकांसह भारत सध्या नेमबाजी विश्वचषकाच्या पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.
सुरेश प्रभू यांच्याकडे हवाई वाहतूक मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे हवाई वाहतूक मंत्रालयाचीही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तेलुगू देसम पक्षाचे अशोक गजपती राजू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवरून तेलुगू देसम पक्षाचे एनडीए सरकारमधील मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी या दोघांनी राजीनामे दिले होते. त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले होते.
राजू हे हवाई वाहतूक मंत्री होते. त्यांनी राजीनामा दिल्याने या खात्याचा तात्पुरता कार्यभार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच होता. आता या मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी प्रभू सांभाळणार आहेत.
आरएसएसच्या सरचिटणीसपदी पुन्हा भैय्याजी जोशी
भैय्याजी जोशी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरचिटणीसपदी (सरकार्यवाहक) निवड करण्यात आली.
पुढील तीन वर्षांसाठी ते या पदावर कार्यरत असणार आहेत. सलग चौथ्यांदा जोशी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा