स्थापत्य विशारद बाळकृष्ण दोशी यांना प्रित्जकर पुरस्कार
स्थापत्य विशारद बाळकृष्ण दोशी स्थापत्यशास्त्रातील नोबेल समजला जाणारा अत्यंत मानाचा ‘प्रित्जकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
हा मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय स्थापत्य विशारद ठरले आहेत. १ लाख डॉलर्स (६५ लाख रुपये) व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दोशी यांचा जन्म १९२७ मध्ये पुण्यात झाला. मुंबईतील जे जे महाविद्यालयात शिक्षण घेतलेले दोशी आज ९० वर्षांचे आहेत.
१९४७च्या सुमारास त्यांनी स्थापत्य कलेचा अभ्यास सुरू केला. कोरबिझियर हे स्वीस-फ्रेंच स्थापत्य विशारद त्यांचे गुरू.
चंदीगढ शहराच्या स्थापत्यरचनेत त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. लुईस कान यांच्यासमवेत त्यांनी अहमदाबादच्या दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेची इमारत सुंदर पद्धतीने साकारली.
कमकुवत वर्गासाठी चांगली घरे बांधण्याच्या उद्देशाने त्यांनी अरण्य लो कॉस्ट हाऊसिंग डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इंदोर येथे साकार केला. त्यासाठी त्यांना आगाखान पुरस्कार मिळाला होता.
मध्यप्रदेश वीज मंडळाची इमारत, बेंगळूरुतील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेची इमारत त्यांनी साकारल्या.
त्यांच्या वास्तू या भारतीय स्थापत्य, इतिहास, संस्कृती, स्थानिक परंपरा व बदलता काळ यांची सांगड घालणाऱ्या आहेत.
१९५६मध्ये त्यांनी वास्तुशिल्प ही संस्था स्थापन केली. तीच आता वास्तुशिल्प कन्सल्टंट म्हणून काम करीत आहे.
अहमदाबाद येथे त्यांनी दी स्कूल ऑफ आर्किटेक्चर ही संस्था सुरू केली तीच आता सेंटर फॉर एन्व्हरॉन्मेंट प्लानिंग अँड टेक्नॉलॉजी या नावाने प्रसिद्ध आहे.
शहर रचनाकार, शिक्षक, स्थापत्य विशारद अशा अनेक भूमिकांतून त्यांनी काम करत आधुनिक स्थापत्यकलेत त्यांनी भारताला मानाचे स्थान मिळवून दिले आहे.
अखिल शेरॉनला विश्वचषक चषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक
मेक्सिकोत सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक चषक नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये भारताच्या अखिल शेरॉनने सुवर्णपदकावर नाव कोरले.
शेरॉनने अंतिम फेरीत ४५५.६ गुण मिळवताना ऑस्ट्रियाच्या बर्नार्ड पिकेलवर मात केली. बर्नार्डने ४५२ गुणांची नोंद केली.
यासह अखिल विश्वचषक स्पर्धेच्या पदार्पणात सुवर्ण पदक पटकावणारा चौथा भारतीय नेमबाज ठरला.
याआधी शहजर रिझवी, मनू भाकर, मेहुली घोष यांनी गेल्या आठवड्यात सुवर्ण पदकाची कमाई केली होती.
या शानदार कामगिरीच्या जोरावर पहिल्यांदाच भारत विश्वचषक स्पर्धेच्या पदकतालिकेत अखेरपर्यंत प्रथम स्थानी राहिल हे निश्चित झाले आहे.
जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग सुकर
चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा २ कार्यकाळांची निर्धारित मर्यादा संपुष्टात आणली आहे.
त्यामुळे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग सुकर झाला आहे. सध्या त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे, जो २०२३ मध्ये संपणार आहे.
चीनच्या राज्यघटनेत राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष यांच्या पदांना प्रत्येकी पाच वर्षांच्या सलग दोन कालावधींची कमाल मर्यादा होती.
राज्यघटनेतील ही कमाल मर्यादा काढून टाकण्याचा प्रस्ताव कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने (सीपीसी) ठेवला होता.
राष्ट्रीय पीपल्स काँग्रेस या चीनच्या संसदेने तो २,९७३ विरुद्ध २ अशा बहुमताने मंजूर केला. सातत्याने पक्षाच्या प्रस्तावांचे समर्थन करत असल्यामुळे चीनच्या संसदेला रबर स्टँम्प संसद म्हटले जाते.
यापूर्वी माओ व डेंग शियाओ पिंग हे चीनचे सर्वशक्तिमान नेते म्हणून ओळखले गेले. परंतु त्यांच्या सत्तेलाही राज्यघटनेचे कमाल १० वर्षांचे बंधन होते.
अनिश्चित काळापर्यंत एखाद्याकडून सत्ता मिळवण्याचा धोका ओळखून ज्येष्ठ नेते डेंग शियाओ पिंग यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी २ कार्यकाळ म्हणजेच १० वर्षांपर्यंत सत्तेत राहण्याची मर्यादा निश्चित केली होती.
मोठ्या कर्जदारांच्या पारपत्राचे तपशील घेणे बँकांना बंधनकारक
५० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज घेणाऱ्या ऋणकोंच्या पारपत्राचे तपशील घेणे बँकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
घोटाळा झाल्यास कर्जदार घोटाळेदारांना देशातून पळून जाण्यास अटकाव करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कर्जदाराच्या पारपत्राचे तपशील जवळ असल्याने, घोटाळेबाजांनी पळून जाऊ नये यासाठी वेळेवर कृती करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवणे बँकांना शक्य होणार आहे.
पारपत्राचे तपशील उपलब्ध नसल्यामुळे विशेषत: स्वेच्छेने कर्ज बुडवणाऱ्यांना देशातून पळून जाण्यापासून रोखण्याबाबत वेळेवर कृती करण्यास बँका असमर्थ होत्या.
यामुळेज नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्या व जतिन मेहता यांच्यासारखे प्रचंड रकमेची कर्जे बुडवणारे लोक देशातून पळून गेले आहेत. यामुळे त्यांच्याकडून कर्जवसुली करणे अवघड बनले आहे.
सर्व बॅंकांनी ५० कोटी रुपयांवरील कर्ज घेणाऱ्या कर्जदारांच्या पारपत्राचे तपशील ४५ दिवसांत द्यावेत, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
स्वच्छ आणि जबाबदार बँकिंगसाठी हे पुढचे पाऊल आहे.
ब्रिटनचे महान धावपटू रॉजर बॅनिस्टर यांचे निधन
एक मैलाच्या धावण्याची शर्यत चार मिनिटांच्या आत पूर्ण करून विश्व विक्रमाला सर्वप्रथम गवसणी घालणारे ब्रिटनचे महान धावपटू रॉजर बॅनिस्टर यांचे १० मार्च रोजी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
६ मे १९५४ रोजी ऑक्सफर्ड येथे झालेल्या एक मैलाच्या शर्यतीत त्यांनी तीन मिनिटे ५९.४ सेंकदाची विक्रमी वेळ दिली होती.
एक मैलाचे अंतर चार मिनिटांच्या आत सर्वप्रथम पार करण्याचा रॉजर यांनी पराक्रम केला होता.
१९५४च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या जॉन लँडी यांना पराभूत करून त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते.
बॅनिस्टर यांनी अॅथलेटिक्स सोडून वैद्यकीय व्यवसायाला प्राधान्य दिले. चेताविकारतज्ज्ञ म्हणून ते अधिक नावारूपाला आले.
पण ‘वन माइल अंडर फोर’ हा बहुमान त्यांच्याच नावावर राहिला आणि आता त्यांच्या पश्चातही बॅनिस्टर या नावाशीच निगडित राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा