ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन
ब्रिटनचे ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे १४ मार्च रोजी वयाच्या ७६व्या वर्षी केंब्रिजमध्ये निधन झाले.
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हाकिंग यांनी आपल्या दुर्धर अशा आजारपणावर मात करत विज्ञान विषयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे अनेकांसाठी ते एक आदर्श होते.
विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये विश्वाची उत्पत्ती आणि कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांनी मांडलेले सिद्धांत वैज्ञानिक जगतात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात.
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग हे जीवशास्त्राचे संशोधक होते. तर त्यांची आई वैद्यकीय संशोधन सचिव होती.
ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्रात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी केली.
विश्वाची निर्मिती कशी झाली, आकाशातील कृष्णविवरे कशी तयार होतात, अशा अनेक गूढ न उकललेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
वयाच्या २१व्या वर्षी ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ने त्यांना ग्रासले होते. ते फार फार तर दोन वर्षे जगू शकतील अशी भीती डॉक्टरांनी वर्तवली होती.
परंतु असामान्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या आजारपणावर मात करत आधुनिक काळातील न्यूटन अशी ख्याती जगभर मिळवली.
वयाच्या ३५व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात ल्यूकॅशियन प्रोफेसर झाले. केंब्रिज विद्यापीठात हे पद महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेच मानले जाते. न्यूटन देखील ल्यूकॅशियन प्रोफेसरच होते.
हॉकिंग एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातले अत्यंत मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.
२००९मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते. कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर या पुरस्कारानेही त्यांना गौरवले होते.
२००१साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईतील संशोधन संस्थेने आयोजीत केलेल्या ‘स्ट्रींग’ या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केले होते.
त्या परिषदेत हॉकिंग यांनी दिलेले व्याख्यान प्रसिद्ध आहे. टीआयएफआरने त्यांना सरोजिनी दामोदरन फेलोशिपही दिली आहे.
त्यांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र हे क्लिष्ट विषय सामान्यांनाही समाजावेत, यादृष्टीने लिखाण केले.
त्यांचे 'ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकात त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर विवेचन केले होते.
याशिवाय द ग्रँड डिझाईन, युनिव्हर्स इन नटशेल, माय ब्रीफ हिस्ट्री, द थिअरी ऑफ एव्हरीथिंग, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस ही हॉकिंग यांची पुस्तके जगप्रसिद्ध आहेत.
‘क्षयरोगमुक्त भारत’ मोहिमेची सुरुवात
देशातून २०२५पर्यंत क्षयरोग पूर्णपणे नष्ट करण्याच्या ‘क्षयरोगमुक्त भारत’ मोहिमेची १३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली.
जागतिक आरोग्य संघटनेने २५ वर्षांपूर्वी क्षयरोगाबाबत भाष्य केले होते आणि तेव्हापासून अनेक देशांनी या रोगाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले.
मात्र अजूनही क्षयरोगाचा पूर्ण नायनाट झालेला नाही, त्यामुळे क्षयरोगमुक्त भारत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भूमिकेत बदल करण्याची गरज असल्याचे मोदी यांनी सांगितले.
गाव, पंचायत, जिल्हा आणि राज्य क्षयरोगमुक्त करण्यासाठी विविध घटकांनी प्रत्येक स्तरावर सहभाग आणि त्या योगदान द्यावे, असेही मोदी म्हणाले.
क्षयरोगाला नष्ट करण्यासाठी भारतासह इतर देशांनी प्रमुख प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारतामध्ये क्षयरोगामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
२०१६मध्ये क्षयरोगाचे २६ लाख नवे रुग्ण आढळून आले. तसेच यामध्ये ४ लाख लोकांना क्षयरोग आणि एचआयव्हीची लागण झाली आहे.
बॅडमिंटनच्या नियमांमध्ये बदल
बॅडमिंटन खेळाची लोकप्रियता वाढावी, यासाठी जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने काही नवे नियम केले आहेत.
यापैकी काहींची अंमलबजावणी झाली आहे, तर काही बदल प्रास्तावित आहेत. या नियम बदलांवर प्रमुख बॅडमिंटनपटूंनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
१९ मे रोजी बँकॉकला जागतिक बॅडमिंटन फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यात इतर नियम बदलांवर शिक्कामोर्तब होईल.
यापैकी सर्व्हिसचा महत्वपूर्ण नियम १४ मार्चपासून सुरू झालेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेपासून अंमलात येणार आहे.
सौरमालेजवळ १५ नवीन बाह्यग्रहांचा शोध
टोकियो इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने सौरमालेजवळ १५ नवीन बाह्यग्रह सापडल्याची घोषणा केली असून, त्यातील एका ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच द्रवरूपात पाणी असण्याची शक्यता आहे.
तांबड्या लहान बटू ताऱ्यांभोवती हे ग्रह फिरत असून या संशोधनामुळे ग्रहांच्या निर्मिती प्रक्रियेवर नवा प्रकाश पडणार आहे.
लालबटू ताऱ्यांपैकी के २-१५५ हा तारा पृथ्वीपासून दोनशे प्रकाशवर्षे दूर आहे. त्याच्या भोवती महापृथ्वीसारखे तीन ग्रह फिरत असून ते पृथ्वीपेक्षा मोठे आहेत.
ताऱ्याभोवती सर्वात बाहेरच्या कक्षेत असलेल्या ग्रहाचे नाव के २-१५५डी असे ठेवण्यात आले आहे. तो गोल्डीलॉक झोन म्हणजे वसाहतयोग्य पट्टय़ात आहे.
तेरुयुकी हिरानो यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले असून, नासाच्या केप्लर दुर्बिणीच्या साह्याने हे पंधरा ग्रह शोधण्यात आले आहेत.
या संशोधकांनी स्पेनमधील नॉर्डिक ऑप्टिकल टेलिस्कोप व हवाई येथील सुबारू टेलिस्कोप यांच्या मदतीने पृथ्वीवरून निरीक्षणे केली.
नासाने एप्रिलमध्ये टेस (ट्रान्सिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे) नावाचा उपग्रह सोडण्याचे ठरवले आहे.
या उपग्रहाच्या मदतीने बाह्यग्रह असलेले संभाव्य उमेदवार ग्रह सापडू शकतील. त्यानंतर पृथ्वीवरून निरीक्षणांच्या मदतीने त्यांची खातरजमाही करता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा