कर्नाटक सरकार लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणार
कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरण लक्षात घेऊन कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची केंद्र सरकारकडे लिखित मागणी करण्यात येईल असा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
कर्नाटक राज्याच्या अल्पसंख्य आयोगाने या दर्जा देण्याच्या विषयाबाबत सात सदस्यांची समिती स्थापन केली होती. त्या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एच एन नागमोहन दास हे होते.
कर्नाटक अल्पसंख्याक कायद्याच्या कलम २ (डी) अंतर्गत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मान्यता देण्याचा विचार व्हावा असे नागामोहन दास समितीने म्हटले होते.
नागामोहन दास समितीने दिलेल्या या अहवालाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला.
कर्नाटकच्या एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के लोकसंख्या लिंगायत असून भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे माजी मुख्यमंत्री असणारे बी एस येडीयुरप्पा देखिल लिंगायत आहेत.
हा समाज १२व्या शतकातील समाज सुधारक बसवेश्वरांचा पाईक आहे. गेल्या काही वर्षांपासून लिंगायतांनी वेगळ्या धर्माचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा मिळाला तर कलम २५, २८, २९ आणि ३० अंतर्गत फायदे मिळतील.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी रांची न्यायालयाने चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही दोषी ठरवले. न्यायालयाने यापूर्वी चारा घोटाळ्याच्या तीन प्रकरणांमध्ये लालूंना दोषी ठरवले होते.
लालूप्रसाद यांच्यावर डिसेंबर १९९५ ते जानेवारी १९९६दरम्यान झारखंडमधील दुमका कोषागारमधून १३.१३ कोटी रुपये बेकायदेशीररित्या काढल्याचा आरोप आहे.
या सुनावणीदरम्यान न्यायालयाने १२ जणांना दोषी ठरवले तर १९ जणांची निर्दोष मुक्तता केली.
चारा घोटाळ्याच्या पहिल्या प्रकरणात लालूंना २०१३मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दुसऱ्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना दोषी ठरवत २३ डिसेंबर २०१७ रोजी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली.
याशिवाय चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणात न्यायालयाने २४ जानेवारी २०१८ ला लालूंना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. लालूप्रसाद यादव सध्या बिरसा मुंडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
विदर्भाने प्रथमच इराणी करंडकावर नाव कोरले
प्रथमच रणजी करंडक जिंकणाऱ्या विदर्भाच्या संघाने इराणी करंडकाच्या रूपाने स्थानिक क्रिकेट मोसमातील दुसरे जेतेपद पटकावले.
नागपूरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या लढतीत विदर्भाने शेष भारतावर मात करून प्रथमच इराणी करंडकावर नाव कोरले.
शेष भारतविरुद्धची लढत अखेरच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत संपली, पण पहिल्या डावातील आघाडीच्या आधारवर विदर्भाने चषकावर नाव कोरले.
विदर्भातर्फे २८६ धावांची खेळी करणारा अनुभवी फलंदाज वसीम जाफर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
विदर्भाने जाफरच्या द्विशतकी खेळीव्यतिरिक्त गणेश सतीश (१२०) व अपूर्व वानखेडे (नाबाद १५७) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पल्यिा डावात ७ बाद ८०० धावांची दमदार मजल मारली होती.
प्रत्युत्तरात शेष भारत संघाचा पहिला डाव ३९० धावांत संपुष्टात आला. विदर्भाने पहिल्या डावात ४१० धावांची निर्णायक आघाडी घेतली.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा व्लादिमीर पुतिन
रशियामध्ये अध्यक्ष निवडीसाठी पार पडलेल्या मतदानात रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.
गेली दोन दशके रशियातील राजकारण व जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या पुतिन यांनी ७५.९ टक्के मते मिळवत विरोधकांवर एकतर्फी विजय मिळवला.
त्यामुळे आता पुढील आणखी ६ वर्षांसाठी ते रशियाचे अध्यक्ष असतील. २०२४पर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदी राहणार आहेत.
२०२४मध्ये जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर दीर्घकाळ रशियाचे नेतृत्व केल्याचा मान पुतीन यांना मिळणार आहे. २०००पासून ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान आहेत.
गेल्या २० वर्षांमध्ये पुतीन यांनी आर्थिक आघाडीसह लष्कराचा विस्तार आणि परराष्ट्र धोरणांमध्येही ठसा उमटविला होता. देशांतर्गत राजकारणामध्येही त्यांनी पकड निर्माण केली आहे.
हुकुमशाह म्हणून ओळख असलेल्या पुतिन यांची कार्यशैली आणि नेतृत्व याला रशियातील जनतेने कौल दिला आहे.
मल्याळम लेखक एम. सुकुमारन यांचे निधन
सुप्रसिद्ध मल्याळम लेखक एम सुकुमारन यांचे १६ मार्च २०१८ रोजी निधन झाले आहे. ते ७६ वर्षांचे होते.
कट्टर कम्युनिस्ट असूनही त्यांना माकपमधील उणिवा दिसल्या व त्या उणिवा दाखवण्यासाठी त्यांनी १९७९ मध्ये ‘शेषक्रिया’ ही कादंबरी लिहिली होती.
त्यांना ‘मरिचितिल्लावरुदे समराकांगल’ या पुस्तकासाठी १९७६मध्ये व ‘जनीथाकम’ पुस्तकासाठी १९९४ मध्ये असा दोनदा केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
त्यांना ‘चुवना चिहनांगल’ या लघुकथा संग्रहासाठी २००६मध्ये राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
त्यांच्या ‘संगागनाम’ आणि ‘उनर्थपट्टू’ या लघुकथांवर चित्रपट निर्मिती करण्यात आलेली आहे.
गिलानी यांचा हुर्रियत कॉन्फरन्स पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
काश्मीरमधील दहशतवाद्यांना फंड पुरविल्याप्रकरणी एनआयएच्या रडारवर आलेले फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी अखेर तहरीक-ए- हुर्रियत कॉन्फरन्स पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
२००१मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून सलग १८ वर्ष त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते मुहम्मद अशरफ सेहराई यांची हुर्रियतचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
टेरर फंडिंग प्रकरणात नाव आल्यानंतर तपास यंत्रणेच्या कारवाईच्या भीतीने गिलानी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.
गिलानी यांच्या कुटुंबीयांकडे एकूण १४ मालमत्ता असून त्याची किंमत १५० कोटी एवढी आहे.
त्यांचा मोठा मुलगा सर्जन असून दुसरा मुलगा जम्मू-कश्मीर सरकारमध्ये नोकरीला आहे. टेरर फंडिंग प्रकरणी तपास यंत्रणेने गिलानी यांच्या दोन्ही मुलांची चौकशी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा