चालू घडामोडी : १२ मार्च

कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लाँग मार्च

  • अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च ११ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला.
  • शेतकऱ्यांचे हे वादळ विधानभवनावर धडकणार होते. मात्र, सरकार आणि शेतकरी शिष्टमंडळ यांच्यात बैठक झाली.
  • या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले असल्याचे सांगितले.
  • बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आझाद मैदानाकडे जाऊन आंदोलक शेतकऱ्यांसमोर सरकारने दिलेले निवेदन वाचून दाखविले. त्यानंतर हा लाँग मार्च मागे घेण्यात आला.
  • या मोर्चात ७ दिवसात १८० किलोमीटर अंतर चालून सुमारे ३५ हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.
  • या मोर्चेकऱ्यांच्या १२-१३ मागण्या होत्या. त्यापैकी बहुतेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.
 मान्य करण्यात आलेल्या मागण्या... 
  • वनजमिनीच्या हक्काबाबत जे दावे प्रलंबित आहेत ते सहा महिन्यांत निकाली काढले जातील.
  • नदीजोड प्रकल्पाला राज्य सरकार गती देईल.
  • आदिवासी भागातील रेशन कार्डाची तीन महिन्यात होणार दुरुस्ती.
  • जीर्ण रेशनकार्ड सहा महिन्यांत बदलून देणार.
  • गायरान जमिनीवरचे अतिक्रमण नियमित होणार.
  • देवस्थान, इनामी जमिनींबाबत लवकरच निर्णय घेणार.
  • संजय गांधी निराधार योजेनअंतर्गत मिळणारे मानधन वाढवणार.
  • दूधदर निश्चित करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेणार.
 कर्जमाफीबाबत आश्वासने... 
  • कर्जमाफीच्या जाचक अटी शिथील करणार
  • ३० जून २०१७पर्यंतचे कर्ज माफ करणार.
  • पती-पत्नी दोघांच्याही नावावरील प्रत्येकी दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार.
  • २००९ऐवजी २००१ पासूनचे शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार.
  • इमूपालन, शेती सुधारणेसाठी घेतलेले कर्जही माफ होणार.

  • या शेतकरी वादळामागे जीवा पांडू गावित, अशोक ढवळे, अजित नवले या तीन प्रमुख नेत्यांनी मुख्य भूमिका बजावली आहे.
  • हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांना संघटित करून त्यांचा शांततापूर्ण मोर्चा मुंबईत आणण्यामागे या त्रिकूटाने मोलाची कामगिरी केली. त्यांच्याबद्दल थोडी माहिती...
जीवा पांडू गावित (जेपी गावित)
  • नाशिकच्या कळवण येथे सात वेळा निवडून आलेले आमदार जीवा पांडू गावित भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) नेते आहेत.
  • राज्यातील विधानसभेत डाव्या पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव नाव म्हणून आमदार गावित यांच्याकडे पाहिले जाते.
  • या मोर्चात सहभागी होण्यासाठी हजारो आदिवासींना संघटित करण्यामागे त्यांनी मुख्य भूमिका बजावली आहे.
अशोक ढवळे
  • डॉ. अशोक ढवळ हे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
  • १९९३पासून गोदावरी परुळेकर यांच्या प्रेरणेतून ढवळे यांनी ठाणे-पालघर जिल्ह्यात किसान सभेचे काम करण्यास सुरुवात केली.
  • कर्जमुक्ती, रास्त भाव, स्वामिनाथन आयोग, वनाधिकार, दुष्काळ, पीक विमा, सिंचन, वीज, अन्याय्य भूमी अधिग्रहण, महामुंबई एसईझेड, बुलेट ट्रेन अशा प्रश्नांवर ढवळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य किसान सभेने जोरदार स्वतंत्र आणि संयुक्त लढे दिले आहेत.
अजित नवले
  • जून २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनामागे महत्त्वाची भूमिका बजावणारे अजित नवले अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव आहेत.
  • २०१७मधील या आंदोलनाने मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यास भाग पाडले.

आंध्रा बँकेच्या माजी संचालकाविरोधात ईडीकडून आरोपपत्र

  • ईडीकडून ५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात आंध्रा बँकेच्या माजी संचालकाविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
  • आंध्रा बँकेचे माजी बँक संचालक अनुप प्रकाश गर्ग यांच्याविरोधात पीएमएलए कायद्यातील विविध कलमातंर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
  • २०११मध्ये आयकर खात्याने एक डायरी जप्त केली होती. त्यामध्ये स्टर्लिंग बायोटेकचे संचालक चेतन आणि नितीन सांदेसरा यांनी गर्ग यांना १.५२ कोटी रुपये दिल्याचा उल्लेख होता.
  • २००८-०९मध्ये गर्ग यांनी नऊवेळा पैसे स्वीकारल्याचा उल्लेख आहे. ही रक्कम १.५२ कोटींच्या घरात आहे.
  • गर्ग यांना ईडीने १२ जानेवारीला अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात सीबीआयने स्टर्लिंग बायोटेकच्या संचालकांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल भाजपमध्ये

  • समाजवादी पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या नरेश अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
  • काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अग्रवाल यांना डावलून जया बच्चन यांची पक्षाच्या राज्यसभेच्या उमेदवार म्हणून घोषणा केली होती.
  • राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने आणि अखिलेश यादव यांनी जया बच्चन यांच्यासाठी तिकीट कापल्यामुळे अग्रवाल नाराज होते.

हसीब द्राबू यांची जम्मू-काश्मीरच्या अर्थमंत्रीपदावरुन हकालपट्टी

  • जम्मू-काश्मीरच्या विषयावर वादग्रस्त विधान केले म्हणून हसीब द्राबू यांना राज्याच्या अर्थमंत्रीपदावरुन हटवण्यात आले आहे.
  • काश्मीर समस्या राजकीय मुद्दा नसून तो एक सामाजिक विषय आहे, असे विधान द्राबू यांनी रविवारी दिल्लीत एका कार्यक्रमात केले होते.
  • जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी द्राबू यांचा राजीनामा घेतला आहे. हा निर्णय राज्य सरकारने राज्यपाल एन एन व्होरा यांनाही कळवला आहे.
  • जम्मू-काश्मीरमध्ये सध्या भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार आहे. हसीब द्राबू हे पीडीपीचे वजनदार नेते म्हणून ओळखले जातात.
  • त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल पीडीपीने द्राबू यांना नोटीसही बजावली होती. द्राबू यांनी त्यांचे विधान तात्काळ मागे घ्यावा असे पक्षाकडून त्यांना सांगण्यात आले होते.
  • २०१५साली जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हसीब द्राबू यांना राज्याचे अर्थमंत्री बनवण्यात आले.
  • २००५ ते २०१० दरम्यान जम्मू-काश्मीर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद भूषवलेल्या द्राबू यांनी अर्थमंत्री म्हणून अनेक महत्वाचे निर्णय घेतले.
  • द्राबूंच्या कार्यकाळातच जम्मू-काश्मीरमध्ये जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा