चालू घडामोडी : २५ मार्च
गोरखा जनमुक्ती मोर्चा रालोआमधून बाहेर
- भाजपाच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तारूढ असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (रालोआ) गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) पक्ष बाहेर पडला आहे.
- या महिन्यात रालोआ सोडणारा हा दुसरा पक्ष ठरला आहे. यापूर्वी तेलुगू देसम पार्टीने (टीडीपी) रालोआतून बाहेर पडत भाजपावर आश्वासने न पाळल्याचा आरोपही केला होता.
- जीजेएमचे नेते एल एम लामा यांनी आमच्या पक्षाचा आता भाजपा आणि रालोआशी कुठलाही संबंध नाही असे जाहीर केले.
- भाजपाचे लोक गोरखा लोकांच्या समस्या आणि त्यांच्या संवेदनांप्रती सजग नसल्याचा आरोप त्यांनी केला.
चेंडू छेडछाडप्रकरणी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ अडचणीत
- दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटीत चेंडूबरोबर छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
- याचसोबत डेव्हिड वॉर्नरनेही उप-कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, आता यष्टीरक्षक-फलंदाज टीम पेन ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करेल.
- दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा चेंडू एका पिवळसर वस्तूशी घासत असल्याचे टेलिव्हिजन चित्रिकरणात स्पष्ट दिसले.
- या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मीडियासमोर चेंडूशी छेडछाड चुकीने नाही तर रणनितीचाच भाग होता असे मान्य केले.
- यानंतर ऑस्ट्रेलिया सरकारने स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने काढून टाका असा आदेश क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला. पण त्यापूर्वीच स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला.
- या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा चांगलीच डागाळली असून क्रिकेटविश्वातून ऑस्ट्रेलियावर टीकेचा भडीमार होत आहे.
- याप्रकरणी आयसीसीने स्मिथला एका कसोटी सामन्यासाठी निलंबित केले. तसेच त्याला मॅच फी इतकाच म्हणजेच १०० टक्के दंडही ठोठावण्यात आला.
- क्रिकेटपटू बॅनक्राफ्टला आयसीसीने ३ डिमेरिट अंक दिले आहेत. त्यालाही मॅच शुल्काच्या ७५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
- आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका दोन्ही खेळाडूंवर ठेवण्यात आला आहे.
पंकज अडवाणीला आशियाई बिलीअर्ड्स स्पर्धेचे विजेतेपद
- पंकज अडवाणीने अंतिम फेरीत बी. भास्करवर ६-१ अशा फरकाने मात करत आशियाई बिलीअर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. आशियाई पातळीवर पंकज अडवाणीचे हे अकरावे सुवर्णपदक ठरले.
- महिलांच्या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अमी कमानीने थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला ३-०ने पराभूत केले.
महाराष्ट्राच्या कांची आडवाणीला मिस इंडियाचा बहुमान
- महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने ११व्या मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेच्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून मिस इंडियाचा बहुमान पटकावला.
- नऊ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या कांचीने ऐतिहासिक कामगिरी करीत महिला शरीरसौष्ठवात मणिपूरच्या वर्चस्वाला धक्का दिला.
- मणिपूरच्या ममता देवी यमनमवर मात करीत कांचीने या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. हरयाणाची गीता सैनी या स्पर्धेत तिसरी आली.
- महिलांच्या स्पोर्टस् मॉडेल प्रकारात उत्तर प्रदेशची संजू विजेती ठरली. पश्चिम बंगालच्या सोनिया मित्राने रूपेरी कामगिरी करण्यात यश मिळविले.
- पुरुषांच्या स्पर्धेत महाराष्ट्राचा ‘होल्ड मॅन’ आणि मि. वर्ल्ड नितीन म्हात्रे याने ६० किलो वजनी गटात जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले.
- नितीनच्या सुवर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राने ११व्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत आपले पहिले सुवर्ण पदक पटकावले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा