नॅशनल हेराल्ड प्रकरणी यंग इंडियनला १० कोटी जमा करण्याचे आदेश
नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने सोनिया गांधी व राहुल गांधी हे भागधारक असलेल्या यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडला १० कोटी रुपये दोन टप्प्यात प्राप्तीकर विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
निम्मी रक्कम ३१ मार्चपर्यंत आणि उर्वरित रक्कम १५ एप्रिलपर्यंत प्राप्तिकर विभागाकडे जमा करावी, असे हायकोर्टाच्या आदेशात म्हटले आहे.
यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने प्राप्तीकर खात्याने २४९.१५ कोटी रुपये जमा करण्याच्या दिलेल्या आदेशास स्थगिती मिळावी, अशी विनंती न्यायालयास केली होती.
ही रक्कम भरल्यास प्राप्तीकर विभागाने २०११-१२ या वर्षासाठी कंपनीकडून २४९.१५ कोटी रुपयांच्या मागणीचा आग्रह करु नये, असे महत्त्वपूर्ण निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने सोनिया व राहुल गांधी यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांना समन्स पाठवून हजर राहण्यास सांगितले होते. त्यांनतर हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात पोहोचले.
सागरी जीवशास्त्रज्ञ प्रा. एन. आर. मेनन यांचे निधन
सागरी जीवशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एन. आर. मेनन यांचे १८ मार्च रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी कोची येथे निधन झाले.
मच्छीमारीपासून ‘मत्स्योद्योगा’कडे जाण्याचा भारताचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आणि त्या मार्गात प्रदूषक यांत्रिकीकरणाची धोंड नसावी यासाठीही ते हातभार लावत होते.
सागरी पर्यावरणाची हानी करणाऱ्या घटकांचा अभ्यास त्यांनी केलाच, पण समुद्रालगतच्या मानवी वसाहतींना उपयुक्त ठरणारे संशोधनही त्यांनी केले.
काही सागरी जीव हे किनाऱ्याच्या आसपासच्या खडकांची तसेच घरे अथवा मानवनिर्मित साहित्याचीही हानी करतात. त्या जीवांच्या जीवनक्रमाचा अभ्यास प्रा. मेनन यांनी केला.
माशांना खाद्य म्हणून उपयोगी पडणाऱ्या वनस्पतींत काही विषारी वनस्पतीही आढळतात, त्यांच्या विशेष अभ्यासासाठी प्रा. मेनन ओळखले जातात.
एकंदर १५० शोधनिबंध प्रा. मेनन यांच्या नावावर आहेत. त्याहून किती तरी अधिक त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. गेली ४० वर्षे प्रा. मेनन विविध संस्थांमधून सागरशास्त्रज्ञ घडवीत होते.
कोचीमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठाची (क्युसॅट) स्थापना झाल्यानंतर, या विद्यापीठात सागरी अभ्यास केंद्राच्या स्थापनेपासून ते प्रमुखपदी राहिले.
पुढे याच विद्यापीठाचे हंगामी रजिस्ट्रार, हंगामी प्रकुलगुरू अशी पदेही त्यांनी सांभाळली. त्यांचे निधन ही एका अर्थाने सागरी जीवसृष्टीच्या अभ्यासकांची हानी आहे.
शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचे निधन
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या आणि अण्णाद्रमुकमधून बडतर्फ करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचे २० मार्च रोजी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.
अनेक अवयव निकामी झाल्याने एम. नटराजन यांचे निधन झाले. तसेच, गेल्या वर्षी त्यांच्यावर किडनी आणि यकृत प्रत्यारोपण करण्यात आले होते.
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी शशिकला यांना न्यायालयाने ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून सध्या त्या बंगळुरुमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
नटराजन यांच्या अंत्यविधीसाठी शशिकला यांना १५ दिवसांचा पॅरोल मंजूर होण्याची शक्यता आहे.
नटराजन हे देखील अण्णाद्रमुकच्या दिवंगत नेत्या जयललिता यांचे निकटवर्तीय होते. १९८९च्या सुमारात तिकीट वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.
डेल पोट्रोला इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद
अर्जेंटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या रॉजर फेडररला पराभूत करून इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत सहाव्या मानांकित पोट्रोने अग्रमानांकित फेडररला ६-४, ६-७ (८), ७-६ (२) असे नमविले.
हे त्याचे सलग दुसरे एटीपी विजेतेपद ठरले. या महिन्याच्या सुरुवातीला पोट्रोने मेक्सिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.
पोट्रोचे हे कारकिर्दीतील २१वे विजेतेपद ठरले. त्याने फेडररला कारकिर्दीत सातव्यांदा पराभूत केले. तर फेडररचा यंदाच्या मोसमातील हा पहिलाच पराभव ठरला.
वीरधवल खाडेला सुवर्णपदक
भारताचा आघाडीचा जलतरणपटू वीरधवल खाडे याने सिंगापूर येथे सुरू असलेल्या नॅशनल एज ग्रुप जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक पटकाविले.
आंतरराष्ट्रीय जलतरणपटूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत २३.०२ सेकंद अशी वेळ देत वीरधवलने ही कामगिरी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा