फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल ३ मार्च रोजी जाहीर झाले.
यापैकी त्रिपुरा व नागालँड या दोन राज्यात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी बाजी मारली आहे. तर मेघालयमध्ये कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
त्रिपुरामध्ये मागील २५ वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या डाव्या पक्षांना पराभूत करत भाजपने तेथे भगवा फडकावला. तर नागालँडमध्ये प्रबळ असलेल्या नागा पीपल्स फ्रंटवर मात करून तिथेही सत्ता काबीज केली.
आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर या राज्यांमध्ये आधीच भाजपची सत्ता होती. त्यात त्रिपुरा आणि नागालँडची भर पडणार आहे.
मेघालयमध्ये भाजपची अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी झाली असली तरीही मित्रपक्षांच्या मदतीने भाजप तिथे बिगरकाँग्रेस सरकार स्थापन करू शकते.
नोबेल विजेते अमेरिकी जीवशास्त्रज्ञ गुंथर ब्लोबेल यांचे निधन
नोबेल विजेते अमेरिकी जीवशास्त्रज्ञ गुंथर ब्लोबेल यांचे १८ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
पेशींच्या अंतर्गत भागांमध्ये प्रथिनांच्या हालचालींशी संबंधित संशोधनासाठी १९९९मध्ये त्यांना नोबेल मिळाले होते.
त्यांचा जन्म १९३६साली तेव्हा जर्मनीमध्ये आणि आता पोलंडमध्ये असेलेल्या वॉल्टर्सडॉर्फ शहरात झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते जर्मनीतून अमेरिकेत आले.
ब्लोबेल यांनी टुबिनगेन विद्यापीठातून एमडी केली व नंतर मॅडिसनमधील विस्कॉन्सिन विद्यापीठात आले.
रॉकफेलर विद्यापीठातून त्यांनी दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पेशी जीवशास्त्रातील कारकीर्द सुरू ठेवली.
पेशीतील प्रथिनांच्या हालचालींवर आधारित सिग्नल हायपोथेसिस त्यांनी पेशी जीवशास्त्रज्ञ डेव्हिड डी साबातिनी यांच्याबरोबर काम करताना मांडले.
रेणवीय झिपकोड या पेशीतील रेणूंच्या हालचालींच्या संकेतावलीचा उलगडा त्यांनी केला. त्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांची कारणमीमांसा करणे शक्य झाले.
त्यांच्या संशोधनातून पुढील काळात सिस्टीक फायब्रॉसिस, ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग), स्किझोफ्रेनिया (व्यक्तिमत्त्व दुभंग), एड्स, कर्करोग व इतर आनुवंशिक रोगांवर मोठी प्रगती झाली.
१९९९मध्ये त्यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल मिळाले तेव्हा त्यांनी ते पैसे फ्रेंड्स ऑफ ड्रेसडेन या संस्थेच्या पुनर्उभारणीसाठी दिले.
त्यांना १९९३मध्ये मूलभूत वैद्यकीय संशोधनासाठी अल्बर्ट लास्कर पुरस्कार मिळाला होता. १९९७मध्ये त्यांना विज्ञान संशोधनात न्यूयॉर्कच्या महापौराचा पुरस्कार मिळाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा