चालू घडामोडी : ९ मार्च

इच्छा मरणाला सर्वोच्च न्यायालयाची सर्शत परवानगी

 • इच्छा मृत्यूबाबत (पॅसिव्ह इथुनेशिया) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला असून इच्छा मरणाला सर्वोच्च न्यायालयाने सर्शत परवानगी दिली आहे.
 • सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निर्णय दिला. या निकालामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्यांना इच्छा मृत्यूचा अधिकार मिळाला आहे.
 • शेवटचा श्वास कधी घ्यावा, हे ठरविण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे. त्याला सन्मानाने मरण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगत न्यायालयाने इच्छा मरणाला परवानगी दिली आहे.
 • केवळ श्वास चालू आहे. म्हणून एखाद्या मरणासन्न व्यक्तीला जिवंत ठेवणे योग्य ठरणार नसल्याचेही न्यायालयाने या निकालात नमूद केले.
 • त्यामुळे अंथरुणाला खिळलेले अर्थात जे मरणासन्न आहेत, अशा व्यक्तींना त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हेंटिलेटरवर ठेवता येणार नाही.
 • जर त्यांनी इच्छा मरणाची मागणी केली, तर तत्कालिन परिस्थिती पाहून त्याबाबत निर्णय घेता येणार असल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.
 • संविधानाच्या अनुच्छेद २१ अनुसार नागरिकांना जगण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर इच्छा मृत्यूचाही अधिकार देण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
 • जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी वेगळ्या करता येऊ शकत नाहीत. मृत्यू हा जीवनाच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे, असे नमूद करत न्यायालयाने ‘लिव्हिंग विल’ आणि ‘पॅसिव्ह यूथेनेशिया’ अर्थात निष्क्रिय इच्छामरणाला सशर्त मंजुरी दिली.
 • या निर्णयाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून इच्छा मरणाबाबतचे निकष ठरविण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
 • इच्छा मृत्यूपत्र मॅजिस्ट्रेट समोरच केले जावे. त्यासाठी दोन साक्षीदार असावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
 • त्याचप्रमाणे या तऱ्हेचे मृत्यूपत्र अमलात आणून इच्छा मरण द्यायचे असेल तर हा अधिकार कोणाला आहे याचे स्पष्ट निर्देश असायला हवे.
 • तसेच रुग्ण उपचारापलीकडे गेला आहे का, त्याला परिस्थितीचे कुठलेही भान नसून तो पुन्हा बरा होऊ शकत नाही का आदी गोष्टींची खातरजमा वैद्यकीय मंडळाने करणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने सांगितले.
 इच्छा मृत्यू व इच्छा मृत्यूपत्र 
 • एखादी मरणासन्न व्यक्ती मृत्यूच्या दारात पोहचल्यास त्याच्यावरील उपचार बंद केले जातात. त्याला इच्छा मृत्यू (पॅसिव्ह इथुनेशिया) असे म्हटले जाते.
 • मरणासन्न स्थितीत पोहचल्यावर किंवा शरीर उपचाराला साथ देत नसेल तर कोणत्या पद्धतीने उपचार केले जावेत अथवा करू नयेत, याबाबत एखादी आजारी व्यक्ती त्याची इच्छा मृत्यूपत्रात नमूद करू शकते.

१२ वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास राजस्थानमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा

 • बारा वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा कायदा राजस्थान विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे.
 • ध्यप्रदेशनंतर असा कायदा करणारे राजस्थान हे दुसरे राज्य ठरले आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये मध्यप्रदेशमध्ये अशा प्रकारचा कायदा करण्यात आला होता.
 • या कायद्यामुळे बारा वर्षांपर्यंतच्या महिलेवर बलात्कार केल्यास गुन्हेगार कुणीही असला तरी त्याला मृत्यूदंडाची किंवा किमान १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येईल.
 • तुरुंगवासाची शिक्षा, जन्मठेपेपर्यंत म्हणजे व्यक्ती नैसर्गिकरीत्या मरण पावेपर्यंत वाढवता येईल. शिवाय आरोपीला दंडही ठोठावता येईल.

सूफी गायक प्यारेलाल वडाली यांचे निधन

 • सूफी संगीत क्षेत्रात आपल्या अनोख्या गायनशैलीने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या वडाली ब्रदर्स या जोडीतील उत्साद प्यारेलाल वडाली यांचे ९ मार्च रोजी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले.
 • प्यारेलाल वडाली उस्ताद पूरणचंद वडाली यांचे धाकटे बंधू होते. पंजाबी सूफी संगीतामध्ये त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे.
 • वडाली ब्रदर्स प्रामुख्याने काफियाँ, गझल आणि भजन या प्रकारच्या गायनासाठी ओळखले जातात.
 • संगीत क्षेत्रात अदबीने पाहिल्या जाणाऱ्या वडाली ब्रदर्स यांनी जालंधर येथील हरबल्लाह मंदिरातून आपल्या गायनाची सुरुवात केली होती.
 • त्यांच्या गायनशैलीत एक वेगळ्याच प्रकारचा साज असून, हीच वेगळी शैली त्यांना या क्षेत्रात लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्यात महत्त्वाची ठरली होती.
 • या सुरेल जोडीने प्रामुख्याने बुल्ले शाह, कबीर, अमीर खुसरो आणि सूरदास यांसारख्या संतकवींच्या रचना सादर करण्याला प्राधान्य दिले होते.
 • वडाली बंधूंनी हिंदी चित्रपटसृष्टीतही गाणे गायले आहेत. वडाली बंधूंना २००५साली ‘पद्मश्री’ देवून सन्मानित करण्यात आले होते.

कर्नाटक राज्यध्वजाचे अनावरण

 • कन्नड अस्मितेचे प्रतीक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कर्नाटक राज्याच्या ध्वजाचे ८ मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अनावरण केले.
 • यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 • पिवळा, पांढरा व लाल असा हा तिरंगा राज्यध्वज असून, मध्य भागातील पांढऱ्या रंगावर दोन शीर असलेल्या पौराणिक पक्ष्याची मुद्रा आहे.
 • कर्नाटकच्या सर्व क्षेत्रांतील कन्नड मान्यवरांच्या सूचनांनुसार हा ध्वज तयार करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा