जीसॅट-६ए या दळणवळण उपग्रहाचे इस्त्रोद्वारे यशस्वी प्रक्षेपण
भारताच्या आजवरच्या सर्वात मोठया स्वदेशी बनावटीच्या जीसॅट-६ए या दळणवळण उपग्रहाचे इस्त्रोने २९ मार्च रोजी यशस्वी प्रक्षेपण केले.
आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन जीएसएलव्ही रॉकेटमधून जीसॅट-६ए उपग्रह अवकाशात झेपावला.
इस्रोच्या या अभूतपूर्व यशामुळे लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार असून, संपर्काचं जाळ विस्तारण्यासाठी याची मदत होणार आहे.
२०६६ किलो वजनाच्या या उपग्रहाच्या बांधणीसाठी २७० कोटी रुपये खर्च आला आहे. या उपग्रहाचे आयुर्मान १० वर्षे आहे.
जीसॅट-६ए या दळणवळण उपग्रहाकडे सर्वात मोठी अँटिना असून इस्त्रोने या अँटिनाची निर्मिती केली आहे. उपग्रह अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर ६ मीटर व्यासाचा हा अँटिना छत्रीसारखा उघडेल.
जीसॅट-६ए हा उपग्रह तीन वर्षांपूर्वी अवकाशात पाठवण्यात आलेल्या जीसॅट-६ या उपग्रहाला मदत करणार आहे.
जीसॅट-६ए मुळे सॅटलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्युनिकेशन सेवा अधिक प्रभावी होईल.
जीसॅट-६ए मुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होईल.
जीसॅट-६एच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात आलेल्या जीएसएलव्हीत शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. या इंजिनाचा चांद्रयान-२ मोहिमेतही वापर केला जाण्याची शक्यता आहे.
इस्रोचे नवे अध्यक्ष के. सिवन यांनी जानेवारी २०१८मध्ये सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचे हे पहिलेच यशस्वी मिशन आहे.
अण्णा हजारे यांचे उपोषण मागे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात दिवसांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्यांना तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी सरकारला ६ महिन्यांची मुदत दिली आहे.
लोकपालची मागणी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडूणक प्रक्रियेतील महत्त्वाच्या बदलांना संमती या मागण्यांसाठी अण्णा हजारे मागील सात दिवसांपासून दिल्लीतील रामलीला मैदानावरील उपोषणाला बसले होते.
त्यानंतर सातव्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.
कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णा हजारेंनी केलेल्या मागण्यांपैकी मान्य झालेल्या मागण्यांचे पत्र वाचून दाखवले.
या पत्रात कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. मात्र या मागण्यांना तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा