चालू घडामोडी : २ मार्च

साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर कंबार

 • भारतीय भाषांचे संवर्धन करणाऱ्या साहित्य अकादमी या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार यांची निवड झाली आहे.
 • यूआर अनंतमूर्ती यांच्यानंतर सुमारे २५ वर्षांनी अकादमीच्या अध्यक्षपदी पुन्हा एक कन्नड साहित्यिक विराजमान झाला आहे.
 • विनायक कृष्णा गोकाक (१९८३) आणि यू आर अनंतमूर्ती (१९९३) यांच्यानंतर साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झालेले कंबार हे तिसरे कन्नड साहित्यिक आहेत.
 • ओडिया लेखिका प्रतिभा राय आणि ‘कोसला’कार महाराष्ट्रीयन साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा पराभव करीत त्यांनी अध्यक्षपदावर आपले नाव कोरले. तर उपाध्यक्षपदी हिंदी कवी माधव कौशिक निवडून आले.
 • कवी, लेखक, दिग्दर्शक असे प्रा. चंद्रशेखर कंबार यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते.
 • अकादमीच्या नियामक मंडळाचे गेल्या दहा वर्षांपासून सदस्य आहेत. २०१३-२०१८ कालावधीत त्यांनी अकादमीचे उपाध्यक्षपद भूषविले.
 • पद्मश्री, ज्ञानपीठ पुरस्कार, कबीर सन्मान, कालिदास सन्मान यांसारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.

आशियाई कुस्ती स्पर्धेत नवज्योत कौरला सुवर्णपदक

 • आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या नवज्योत कौरने ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
 • एकतर्फी झालेल्या अंतिम फेरीत नवज्योतने जपानच्या मिया इमेईला ९-१ असे सहज हरवले. यापूर्वी तिने २०१३मध्ये आशियाई स्पर्धेत रौप्य व २०१४मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
 • याशिवाय ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला ६२ किलो गटात कांस्यपदक, तर विनेश फोगटने ५० किलो गटात रौप्यपदकावर नाव कोरले.
 • या दोन पदकांमुळे भारताच्या खात्यावर १ सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्य अशी ६ पदके जमा झाली आहे.
 • साक्षीने कांस्यपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या अयाल्यिम कासीमोवाला १०-७ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले.
 • राष्ट्रकुल क्रीडा विजेती खेळाडू विनेशला चीनच्या चुआन लेईने अंतिम लढतीत ३-२ असे पराभूत केले.
 • भारताच्या संगीता कुमारीनेही ५९ किलो गटांत कांस्यपदक मिळवले. तिने कांस्यपदकाच्या लढतीत कोरियन खेळाडू जिऊन उमला पराभूत केले.

एमआयटी जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ

 • ‘क्वॅकक्वॅरेली सायमंड (क्यूएस)’ या संस्थेने २०१८मधील जागतिक पातळीवरील उत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे.
 • अमेरिकेतील मॅसॅच्युसेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एमआयटी) या यादीत सलग सहाव्या वर्षी प्रथम स्थान मिळविले आहे.
 • जगातील ९५० उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये एमआयटी यंदाही प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या यादीतील पहिली चारही विद्यापीठे अमेरिकेतील आहेत.
 • दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या जागेवर अनुक्रमे स्टॅनफर्ड विद्यापीठ, हावर्ड विद्यापीठ व कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्था आहेत.
 • ब्रिटनमधील विद्यापीठांची घसरण सुरूच असल्याचे यावर्षीही दिसून येते. यात ब्रिटनमधील केवळ कॅब्रिज विद्यापीठाचा समावेश पहिल्या पाचामध्ये असून, त्याचा क्रमांक पाच आहे.
 • भारतातील नऊ विद्यापीठांना या यादीत स्थान मिळाले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी (आयआयटी) दिल्लीतील तंत्रशिक्षण संस्थेला १७२वे स्थान मिळाले आहे.
 • आयआयटी मुंबई १७९, आयआयएस्सी बंगळूर १९०, तर आयआयटी मद्रासचा २६४वा क्रमांक आहे. दिल्ली विद्यापीठ ४८१-४९० या स्थानावर आहे.

चंद्रावर पहिले फोर जी नेटवर्क सुरू करण्याची व्होडाफोनची योजना

 • २०१९मध्ये चंद्रावर पहिले फोर जी नेटवर्क सुरू करण्याची योजना व्होडाफोन या ब्रिटिश टेलिकॉम कंपनीने जाहीर केली आहे.
 • पीटी सायंटिस्टच्या खासगी चांद्रमोहीमेत ही सुविधा दिली जाणार आहे. या मोहिमेत नोकिया कंपनीला तंत्रज्ञान भागीदार करण्यात आले आहे.
 • पीटी सायंटिस्ट ही जर्मनीची कंपनी असून व्होडाफोन जर्मनी व ऑडी कंपनीबरोबर त्यांचे सहकार्य आहे.
 • पीटी सायंटिस्टचे संस्थापक रॉबर्ट बोहमी यांच्या मते पुढील वर्षी केप कॅनव्हरॉल येथून स्पेस एक्सच्या फाल्कन ९ अग्निबाणाच्या मदतीने अवकाशयान सोडले जाईल.
 • चंद्रावर फोर जी सेवा १८०० मेगाहर्टझ्ला सुरू होणार असून, त्याच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाची एचडी चित्रे पृथ्वीवर पाठवली जातील.
 • हा प्रकल्प ११ दिवसांचा असून चंद्रावर तापमान बदल होत असल्याने फोर जी सेवा ऊर्जा सक्षम राहील. नोकिया बेल लॅब्स या फोर जी सेवेसाठी लागणारे उपकरण तयार करणार आहे.
 • बेस स्टेशन व ऑडी ल्युनर क्वाट्रो रोव्हर्स यांच्यात त्यामुळे फोरजी सेवेतून संपर्क असणार आहे. त्यातून एचडी म्हणजे हाय डेफिनेशन चित्रेही पाठवली जाणार आहेत.
 • अपोलो सतरा मोहिमेच्या वेळी वापरण्यात आलेल्या रोव्हिंग वाहनाचे निरीक्षणही या मोहिमेत केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा