चालू घडामोडी : ७ मार्च

ईशान्येकडील तीनही राज्यात भाजपा सत्तेत

 मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी कॉनरॅड संगमा 
 • मेघालयात काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष असूनही बहुमतापर्यंत पोहोचता न आल्याने नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) अध्यक्ष कॉनरॅड संगमा यांनी मेघालयच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
 • मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी संगमा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
 • संगमा यांच्या एनपीपी पक्षाला ६० पैकी १९ जागांवर यश मिळाले होते. तर २१ जागांसह काँग्रेस मेघालयातील सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष ठरला होता.
 • एनपीपी (१९), भाजपा (२), यूडीपी (६), पीडीएफ (४), एचएसपीडीपी (२) व अपक्ष (१) अशा ३४ आमदारांनी कॉनरॅड संगमा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
 • ही आघाडी स्थापन करण्याचे काम भाजपानेच केले. मात्र ही आघाडी सांभाळणे सोपे नाही.
कॉनरॅडचा संगमा यांच्याबद्दल
 • कॉनरॅड संगमा हे माजी लोकसभाध्यक्ष पी ए संगमा यांचे पुत्र आहेत. कॉनरॅड यांची बहिण अगाथा संगमा याही विधानसभेवर निवडून आल्या आहेत.
 • यूपीएच्या काळात डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अगाथा राज्यमंत्री होत्या. त्यांचे नावही यंदा मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात होते.
 • ४० वर्षीय कॉनरॅड प्रथम २००८साली मेघालय विधानसभेवर निवडून गेले आणि अर्थमंत्री झाले. मेघालयचे सर्वांत युवा अर्थमंत्री अशी त्यांची ओळख आहे.
 • २००९ ते २०१३ या काळात ते विरोधी पक्ष नेते होते. २०१४साली ते लोकसभेवर निवडून गेले. आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी त्यांना आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल.
 • कोनराड हे सामाजिक कार्यातही पुढे असतात. त्यांनी वडील पी ए संगमा यांच्या नावाने फाउंडेशनही सुरू केले आहे. या संस्थेमार्फत मेघालयच्या ग्रामीण भागात शाळा आणि महाविद्यालये चालवली जातात.
 • पर्यावरणावरही ते काम करतात. त्याचबरोबर मेघालय क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्षही आहेत.
 • त्यांचे वडील पी ए संगमा काँग्रेसमध्ये होते. नंतर शरद पवार यांच्यासमवेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
 • कॉनरॅड व अगाथा हेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र पी ए संगमा यांना २०१२साली राष्ट्रवादीमधून दूर करण्यात आल्यानंतर त्यांनी एनपीपीची स्थापना केली आणि कॉनरॅड व अगाथाही त्या पक्षाचा भाग बनले.
 • भाजपाने ईशान्येतील राज्यांमध्ये नॉर्थ ईस्ट डेमॉक्रेटिक अलायन्स (नेडा) स्थापन केल्यावर एनपीपीही त्याचा भाग बनले.
 त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी विप्लव देव 
 • २५ वर्षे सलग त्रिपुरावर राज्य करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची (सीपीएम) सत्ता उलथवण्यात यश आल्यानंतर भाजपाचे विप्लव देव त्रिपुराचे मुख्यमंत्री झाले आहेत.
 • तर उपमुख्यमंत्री म्हणून जिष्णू देव शर्मा यांच्यासह भाजपच्या अन्य ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांना गोपनियतेची शपथ दिली.
 • त्रिपुरा विधानसभेत ६० जागापैकी भाजपला ३५ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपचे मित्रपक्ष जनजाती पार्टी इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराला (आयपीएफटी) ८ जागा मिळाल्या आहेत.
 • सीपीएमला १६ जागा मिळाल्या असून काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही.
 • डाव्यांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच भाजपचे दोन तृतियांश बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे.
विप्लव देव यांच्याबद्दल
 • गोमती जिल्ह्यातील राजेंद्रनगर येथे २५ नोव्हेंबर १९७१ रोजी जन्मलेल्या विप्लब यांनी उदयपूर महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
 • त्यांचे वडील हरधन देव हे जनसंघाचे नेते असल्याने त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी संघविचारांची होती.
 • पदवी घेतल्यानंतर ते दिल्लीला गेले. तिथे त्यांनी गोविंदाचार्य व कृष्णगोपाल शर्मा या ज्येष्ठ संघनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ वर्षे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले. त्यांनी काही काळ जिम इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केले.
 • जानेवारी २०१६मध्ये त्यांच्यावर त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. उत्तम संघटनकौशल्य व वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अगदी स्थानिक पातळीवर पक्षाची उभारणी केली.
 • त्रिपुरामध्ये भाजपाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्यानेत्यांमध्ये सुनील देवधर यांच्याबरोबरच विप्लव देव यांचाही समावेश आहे.
 नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी चौथ्यांदा नैफियू रियो 
 • नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) मुख्यमंत्री पदाचे प्रमुख उमेदवार नैफियू रियो चौथ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत.
 • नागालँडचे राज्यपाल पी बी आचार्य यांनी १० अन्य आमदारांसह रियो यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 • या विधानसभा निवडणुकीत एनडीपीपीचे नेते असलेले रियो हे बिनविरोध निवडून आले आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
 • ६० सदस्यसंख्या असलेल्या नागालँड विधानसभेत एनडीपीपी (१७) व भाजप (१२) आघाडीला २९ तर एनपीएफ आघाडीला २९ जागा मिळाल्या आहेत.
 • दोन्ही आघाड्यांच्या समान जागा असल्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना १६ मार्च रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.
नैफियू रियो यांच्याबद्दल
 • रियो हे ६७ वर्षांचे असून, त्यांनी ११ वर्षे नागालँडचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. ते पहिल्यांदा २००३साली नॅशनल पीपल्स फ्रंटतर्फे निवडून आले.
 • त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते आणि तेथून फुटून त्यांनीच नॅशनल पीपल्स फ्रंटची स्थापना केली होती. त्यानंतर २००८ व २०१३ सालीही ते निवडून आले आणि मुख्यमंत्री बनले.
 • त्यांच्यावर २०१४ साली भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. त्यानंतर जनमत आपल्या विरोधात असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्याचवर्षी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
 • त्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते निवडून आले आणि तेव्हापासून आतापर्यंत ते खासदार होते.
 • नैफियू रियो यांची संपत्ती ३६.४० कोटी रुपये इतकी आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घेतल्याने रियो बिनविरोध निवडून आले.

सिंधुताई सपकाळ आणि उर्मिला आपटे यांना नारीशक्ती पुरस्कार

 • देशातील महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जाणारा ‘नारीशक्ती पुरस्कार’ केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले.
 • जागतिक माहिला दिनाच्या (८ मार्च) पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांमध्ये देशभरातील ३० महिला आणि संघटनांचा समावेश आहे.
 • महिला सक्षमीकरणात योगदान देणाऱ्या देशभरातील महिलांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येतो. या महिला इतर महिलांसह सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.
 • महाराष्ट्रातील अनाथांची आई डॉ. सिंधुताई सपकाळ आणि ‘भारतीय स्त्री शक्ती’ या संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला बळवंत आपटे यांचाही यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
 • जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या मान्यवर महिलांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
 डॉ. सिंधुताई सपकाळ 
 • अनाथांची आई म्हणून व्रत स्वीकारलेल्या ज्येष्ठ समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत आपले आयुष्य व्यतीत करून शेकडो अनाथांना आईची माया दिली.
 • त्यांच्या या संघर्षाची दखल घेत त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
 • सिंधुताई सपकाळ उपाख्य माई म्हणूनच त्या सर्व परिचित आहेत. सिंधुताईंचा जन्म हा वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथील आहे.
 उर्मिला आपटे 
 • उर्मिला बळवंत आपटे या मुंबई येथील ‘भारतीय स्त्री शक्ती’ स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा आहेत.
 • ही संस्था महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, मानसिक आणि शारिरिक आरोग्य, स्वाभीमान, आर्थिक स्वातंत्र्य व लिंग समानता या पंचसुत्रीवर सर्वेक्षण, संशोधन, कार्यशाळा, प्रशिक्षणांच्या माध्यमातून समुपदेशनाचे कार्य करते.
 • त्यांच्या संस्थेच्यावतीने महिलांच्या सर्वांगिन विकासासाठी केलेल्या कामाच्या योगदानबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

तेलुगू देसम पक्ष अखेर एनडीएमधून बाहेर

 • विशेष राज्याच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) अखेर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
 • टीडीपीचे अशोक गजपती राजू आणि वाय एस चौधरी हे केंद्रात मंत्री असून ते राजीनामा देणार आहेत, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केले आहे.
 • चंद्राबाबूंचा हा निर्णय भाजपसाठी मोठा झटका असून दक्षिणेतील सर्वात मोठा मित्र भाजपने गमावला आहे.
 • विभाजनानंतर आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरुन केंद्र सरकार आणि आंध्र प्रदेशच्या सरकारमध्ये तणावाचे वातावरण होते.
 • केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पाळले गेले नाही. त्यामुळेच टीडीपी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले.
 • पूर्वीच्या आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन होऊन तेलंगणा हे नवे राज्य अस्तित्वात आले. मात्र, त्यामुळे आंध्र प्रदेशला सध्या मोठ्या आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे.
 • त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रातील एनडीए सरकारकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी लावून धरली होती.
 • यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले होते की, १४व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार, आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देता येणे शक्य नाही. मात्र, राज्याला आम्ही विशेष पॅकेज देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. या विशेष पॅकेजमधील फायदे हे विशेष राज्याच्या दर्जाप्रमाणेच असतील.

अब्जाधीशांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर

 • फोर्ब्जने जाहीर केलेल्या जगातील अब्जाधीशांच्या या यादीत भारत पहिल्यांदाच तिसऱ्या स्थानावर झळकला आहे.
 • भारतात एकूण १२१ अब्जाधीश असून ही संख्या मागील वर्षीपेक्षा १९ अंकांनी वधारली आहे.
 • अमेरिकेत सर्वाधिक ५८५ तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत.
 • या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज १०० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत ठरले आहेत.
 • अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स असून त्यांची संपत्ती ९० अब्ज डॉलर्सची आहे.
 • गुंतवणूक गुरू अशी ओळख असलेले वॉरन बफेट ८४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
 • बर्नार्ड अरनॉल्ट चौथ्या (७२ अब्ज डॉलर्स) व फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग पाचव्या (७१ अब्ज डॉलर्स) स्थानावर आहेत.
 • भारतात मुकेश अंबानींची संपत्ती सर्वाधिक ४०.१ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या संपत्तीत मागील वर्षीपेक्षा १६.९ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.
 • त्यांचे भारतातल्या सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानी कायम असून, जागतिक पातळीवर त्यांनी ३३व्या क्रमांकावरून १९व्या क्रमांकावर भरारी घेतली आहे.
 • अझीम प्रेमजी यांनी लक्ष्मी मित्तल यांना यंदा मागे टाकत भारतातले सर्वाधिक श्रीमंतांचे दुसरे स्थान पटकावले आहे.
 • जिंदाल स्टील अँड पावरच्या सावित्री जिंदाल या सर्वाधिक श्रीमंत भारतीय महिला ठरल्या आहेत. जागतिक क्रमवारीत त्या ८.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १७६ व्या स्थानावर आहेत.
 • पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा १.७ अब्ज डॉलर्ससह जागतिक यादीतले सर्वात कमी वयाचे भारतीय अब्जाधीश ठरले आहेत.
 • एचसीएलचे संस्थापक शीव नाडर चौथे तर सन फार्माचे दिलीप संघवी पाचवे श्रीमंत भारतीय ठरले आहेत.
 • या यादीत जगातल्या एकूण २२०८ अब्जाधीशांची नावे आहेत. या सर्वांची एकूण संपत्ती ९.१ लाख कोटी (ट्रिलिअन) आहे. मागील वर्षीपेक्षा या संपत्तीत १८ टक्के वाढ झाली आहे.
 • यंदा फोर्ब्जच्या यादीत २५९ उद्योगपतींचा नव्याने समावेश झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा