चालू घडामोडी : ६ मार्च
भारतासह जगभरात बालविवाहांच्या संख्येत घट : युनिसेफ अहवाल
- जगभरात बालविवाहांच्या संख्येत झपाट्याने घट झाली असून मागच्या दशकात ही संख्या वेगाने कमी झाल्याचे युनिसेफने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
- गेल्या दशकात २.५ कोटी बालविवाहांवर प्रतिबंध घालण्यात यश आल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे.
- हे प्रमाण कमी होण्यामध्ये दक्षिण आशियातील देशांमध्ये भारत आघाडीवर असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे.
- मागील दशकात १८ वर्षाच्या आधी लग्न होणाऱ्या मुलींचे प्रमाण भारतात जवळपास ४७ टक्के होते. हे प्रमाण आता कमी झाले असून २७ टक्क्यांपर्यंत आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- बालविवाहामुळे महिलांचे शिक्षण, आरोग्य, सामाजिक स्थान या सगळ्यांवर गदा येत असल्याचेही अनेक अभ्यासातून समोर आले आहे.
- भारतात लग्नासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ आहे. बालविवाहाच्या संदर्भात कडक कायदेही आहेत.
- भारतात बालविवाह लावल्यास त्या मुलाच्या किंवा मुलीच्या पालकांना १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो.
- मात्र भारतीय समाजात बालविवाह मोठ्या प्रमाणात रुढ झालेला असल्याने कायद्याचा विचार न करता सर्रास बालविवाह लावले जातात. परंतु याचे प्रमाण मागील काही काळात कमी झाले आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे.
श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी जाहीर
- श्रीलंकेतील कँडी भागात मुस्लीम आणि बौद्ध धर्मीयांमध्ये झालेल्या वादामुळे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
- दोन धर्मीयांमधील वाद भडकू नये त्यावर नियंत्रण मिळवता यावे, तसेच निरपराध लोकांचा बळी जाऊ नये म्हणून श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- हिंसा पसरवणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करणे हाच आणीबाणी लागू करण्याचा मुख्य उद्देश आहे असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.
- म्यानमारमध्ये उसळलेल्या संघर्षानंतर काही रोहिंग्या मुस्लिमांनी श्रीलंकेत आश्रय घेतला होता. मात्र याबाबतही काही बौद्ध धर्मीयांनी विरोध दर्शवला होता. तसेच त्यांना आश्रय दिला जाऊ नये म्हणून आंदोलनही केले होते.
- फेब्रुवारी २०१७मध्ये श्रीलंकेतील पूर्व भागात असलेल्या अंपारा या ठिकाणी हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारानंतर दोन धर्मीयांमधील संघर्ष सुरु झाला.
- बौद्ध आणि मुस्लीम धर्मीयांमध्ये गेल्या वर्षभरापासून संघर्ष आणि वाद सुरु आहे. बौद्ध धर्मीयांना जाणीवपूर्वक मुस्लीम धर्मांतर करण्यास भाग पाडत आहेत असा आरोप बौद्ध धर्मीयांनी केला आहे.
- तसेच बौद्ध धर्माचा वारसा असलेली धार्मिक स्थळे उद्धवस्त केली जात असल्याचाही आरोपही होत आहे.
- हा सगळा वाद चिघळल्यामुळे आणि शिगेला पोहचल्यामुळे श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
- श्रीलंकेत सिंहली बौद्ध समाजाचा एक मोठा जनसमुदाय आहे. हा समुदाय अल्पसंख्याक मुस्लीम आपल्यासाठी धोकादायक असल्याचे मानतात.
- २०१४मध्येही श्रीलंकेत मोठ्या दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत २ हजार पेक्षा जास्त बौद्ध धर्मीयांना तर ८ हजारापेक्षा जास्त मुस्लीम नागरिकांना विस्थापित व्हावे लागले.
- श्रीलंकेत एकूण लोकसंख्येच्या १० टक्के मुस्लिम आहेत, ७५ टक्के बौद्ध आणि १३ टक्के हिंदू आहेत.
इस्त्रायलला जाणाऱ्या विमानांना सौदीवरून उड्डाण करण्यास मंजुरी
- भारतातून इस्त्रायलला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानांना सौदी अरेबियावरून उड्डाण करण्यास मंजुरी दिल्याचे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जाहीर केले आहे.
- सौदी अरेबियाची इस्त्रायल या देशाला मान्यता नसून गेली ७० वर्षे इस्त्रायलला जाणाऱ्या विमानांना सौदी अरेबियावरून जाण्यास बंदी आहे.
- ही बंदी उठवण्यात आली असेल, तर याचा अर्थ इस्त्रायलचे व सौदीचे संबंध सुधारत असल्याचेही द्योतक आहे.
- भारतातून इस्त्रायलला जाणारी विमाने सौदी अरेबियावरून गेल्यास प्रवासाच्याचा वेळेत सुमारे अडीच तासांची बचत होईल. यामुळे प्रवासाचा वेळ तसेच तिकिटाची किंमत दोन्ही कमी होईल अशी अपेक्षा आहे.
- सध्या इस्त्रायलची विमान कंपनी ईल अल एअरलाइन्स आठवड्यातून चार वेळा मुंबईला विमानसेवा देते. सौदी टाळून इथियोपियावरून वळसा घालून ही विमाने भारतात येतात.
जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जेराल्ड रीव्हन यांचे निधन
- टाइप २ मधुमेहावर पायाभूत संशोधन करणारे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जेराल्ड रीव्हन यांचे १२ फेब्रुवारी २०१८ रोजी निधन झाले.
- इन्शुलिनला आपल्या शरीरात प्रतिरोध झाला तर त्यामुळे टाइप २ मधुमेह होतो व त्यामुळे इतर अनेक रोग उद्भवतात हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले होते.
- १९८८मध्ये त्यांनी इन्शुलिन प्रतिरोध व चयापचयातील अनेक दोष यांचा संबंध जोडून दाखवला; यातून हृदयविकारही बळावतो हे त्यांनी सांगितले. या सगळ्या विकारसमुच्चयाला त्यांनी ‘सिंड्रोम एक्स’ असे नाव दिले होते.
- १९५०मध्ये त्यांनी संशोधक म्हणून काम सुरू केले. इन्शुलिनच्या अभावी होणारा मधुमेह एवढा एकच प्रकार तेव्हा माहिती होता, पण ते त्यापलीकडे गेले.
- १९८८मध्ये एका व्याख्यानात त्यांनी सिंड्रोम एक्सची संकल्पना मांडली. त्यात रक्तदाब, रक्तशर्करा व अनियमित एचडीएल कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइडची रक्तातील पातळी यांचा समावेश होता.
- टाइप २च्या मधुमेहातील उपचारात आज जी काही प्रगती झाली आहे त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
- एकूण आठशे शोधनिबंध त्यांच्या नावावर होते. त्यांचे ‘सिंड्रोम एक्स’ हे पुस्तक विशेष गाजले.
- मिडलटन पुरस्कार, बँटिंग मेडल, फ्रेड कॉनरॉड कॉख पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा